Wednesday, February 26, 2014

हजरजबाबी/ समयसूचक इ.(अत्रे आणि पु.ल.)

आपल्या मराठी साहित्यामध्ये 'विनोद 'विषयाला मोठे स्थान आहे.श्रीपाद कृष्ण कोल्हटकर,राम गणेश गडकरी,आचार्य प्र.के.अत्रे,पु.ल.देशपांडे ही विनोदाची नामवंत घराणी माहित नसलेला मराठी माणूस विरळाच.अलीकडच्या काही दशकात मात्र अत्रे आणि पु.ल.ह्या जोडीने महाराष्ट्राला खदखदून हसवले.असं म्हणतात अत्र्यांनी मराठी माणसाला हसायला शिकविले आणि पु.लंनी हसवीत ...ठेवले.ह्याचे मुख्य कारण म्हणजे दोघांच्याही जवळ असलेले दोन मोठे गुण /वैशिष्ट्ये. प्रचंड हजरजबाबीपणा आणि समयसूचकता.दोघांच्याही भाषणाला खच्चून गर्दी होत असे.हंशा आणि टाळ्यांचा वर्षाव होत असे.ह्याचे कितीतरी किस्से आणि आठवणी अनेक मराठी माणसाकडे "कायम स्वरूपी ठेव"ह्या सदरात आहेत.समाजातील सर्व घटना, हालचाली ,वैगुण्ये ,माणसांच्या एकेक त-हा,स्वभाव वैशिष्ट्ये इ.इ. त्यांनी आपल्या नजरेने अचूक टिपली होती.आणि तीच आपल्या भाषणातून सर्वांना उलगडून दाखविली आणि सांगितली.मग अनेकांना असे वाटे "अरे हे तर काय साधेसुधे आहे आपल्या लक्षात कसं आलं नाही?इतकी साधी घटना असूनदेखील कुणालाच कशी कळाली नाही?"इ.इ.हाच तर मोठा फरक सर्वसामान्य जनता आणि विनोदी लेखक ह्यांच्या मध्ये आहे.आचार्य अत्र्यांच्या हजर जबाबी पणाचे किस्से तर महाराष्ट्र वर्षानुवर्षे ऐकत आला आहे.हजरजबाबीपणा म्हणजे ताबडतोब उत्तर,तत्काळ फटदिशी आपली प्रतिक्रिया व्यक्त करणे.अत्रे म्हणायचे "प्रश्न दिला की लगेच उत्तर"त्यासाठी वेळ लावायचा नाही.उत्स्फूर्तपणाचे दर्शन घडवायचे.असे झाले की श्रोत्यांना खदखदून हसण्याशिवाय पर्यायच नसतो.वरील दोन्ही गुणांचे दोन्हीही विनोद्वीरांचे दोनच किस्से.:

1) १९६२ साली मी SSCला असताना सातारा येथे भरलेल्या .अ .भा.मराठी साहित्य संमेलनात काव्य गायन होते.प्रत्येक कवींनी आपल्या दोन कविता म्हणायच्या असे ठरले होते.हा कार्यक्रम सुरु झाल्यावर कवी केशवकुमार म्हणजेच अत्रे तेथे आले.रसिकांनी अत्र्यानाही दोन कविता म्हणायचा खूप आग्रह केला.कारण प्रत्येकी दोन कविता हा ठराव होता.शाळेच्या वाचनालयातून "झेंडूची फुले "हा विडंबन काव्य संग्रह मुद्दाम अत्र्यांसाठी मागविला होता.सुरवातीला नेहमीप्रमाणे माईक हातात घेऊन अत्रे म्हणाले "लोक हो, प्रत्येकांनी दोन कविता म्हणायच्या असे ठरले असले तरी मी फक्त माझी एकच कविता म्हणणार आहे" हे ऐकताच एकदम श्रोत्यांनी गलगा/गोंधळ सुरु केला आणि "नाही नाही" दोन दोन......तुम्हीपण दोन कविता म्हणायला पाहिजेत
तेंव्हा अत्रे फटदिशी म्हणाले" एकाचे दोन करायची सवय नाही मला" हे ऐकल्याबरोबर मंडपात नेहमीसारखा प्रचंड हशा झाला आणि अत्र्यांनी आपली "प्रेमाचा गुलकंद "ही कविता सादर केली.श्रोते खुश झाले.ह्या कार्यक्रमाला मी हजर होतो म्हणून तर तुम्हाला सांगता आले ही भाग्याचीच गोष्ट आहे.आता असेच माझे दुसरे भाग्य वाचा.

2)१९८६ किंवा १९८७ साली कोल्हापूरच्या देवल क्लब शताब्दीच्या मुख्य समारंभाला पु.ल.देशपांडे प्रमुख पाहुणे होते.त्यांच्या साहित्य आणि संगीत प्रेमाबद्दल कितीही लिहिले तरी कमीच आहे.नेहमीप्रमाणे पु.लंचे भाषण टेप करायचे म्हणून मी टेप घेऊन वेळेआधीच पद्माराजे हायस्कुलमध्ये गेलो होतो.कोल्हापुरातील अनेक दिग्गज आणि बुजुर्ग मंडळी पु.लंचे भाषण ऐकण्यासाठी आली होती देवल क्लबच्या अनेक आठवणी सांगत असताना भाषणाच्या ओघात पु.लंना ठसका लागला.आणि थोडा व्यत्यय आला.तेव्हा बिसलरी बाटलीचा जन्म न झाल्याने टेबलावरील तांब्याभांडेकडे सर्वांचे लक्ष गेले.कोल्हापूरचे तत्कालीन कलेक्टर व्यासपीठावर पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी सवयीप्रमाणे सद्य परिस्थितीचा अंदाज/आढावा घेऊन लगेच स्वतः भांड्यात पाणी ओतून ते पु.लंना पिण्यास दिले.पाणी प्याल्यावर काही क्षणातच भाईनी आपले भाषण सुरु केले आणि पहिलेच वाक्य उच्चारले "कलेक्टर लोक पाणी पाजतात असे ऐकले आहे.पण असे पाणी पाजणारा कलेक्टर कोल्हापूरला मिळाला हे करवीरकरांचे भाग्य "हे वाक्य ऐकताच हंशाटाळ्यांचा पाऊस पडला आणि त्या ओघातच पु.ल.पुढे बोलू लागले.त्यादिवशी अक्षय तृतीया होती.समारोपाच्या वेळीही भाईनी ह्याचा उल्लेख केला आणि शेवटी म्हणाले" देवल क्लबमधील तंबोरे असेच अक्षयपणे वाजत राहोत."ही सदिच्छा व्यक्त करून ते थांबले.(वरील आठवण नंबर 25 "कोट्याधीश पु.ल." मध्ये आहे.

शुभप्रभात

1 comment: