Wednesday, February 26, 2014

फेसबुकरावांचे अभीष्टचिंतन

प्रिय श्री फेसबुकराव

सप्रेम नमस्कार वि.वि.

आज तुमचा १० वा वाढदिवस असल्याचे मला सकाळीच कळले.खरतर ४ फेब्रुवारीला भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ह्यांचाच वाढदिवस असतो हेच मला कित्येक वर्षापासून मला माहित आहे.पण तुमचाही वाढदिवस आजच आल्याने हा दिवस
सुरेल झाला आहे.काही का असेना ह्या निमित्ताने तुमचे हार्दिक अभिनंदन केलेच पाहिजे. फेसबुक राव अहो तुम्ही... काय साधेसुधे गृहस्थ आहात का?सर्व दुनिया दारीत तुमचा मुक्त संचार सुरु असतो.आणि म्हणे 1 अब्ज २० कोटी लोक तुमच्या सानिध्यात आहेत.ग्रेटच आहात तुम्ही".हा हा म्हणता "तुम्ही १० वर्षाचे झाला की राव.पण माझी तुमची ओळख गेल्या २/३ वर्षापासूनच झाली आहे.तरीसुद्धा मी अमेरिकेत आल्यापासून म्हणजे गेल्या ५ महिन्यातच आपली जानी दोस्ती झाली.तुम्ही मला भावले नसता तर मी येथे काय केले असते?तुमच्या प्रमाणेच आमचे पुण्याचे मराठीकाका.तुम्ही दोघे मला अगदी वेळेवर भेटलात म्हणून तर मी माझ्या मित्रांना,नातेवाईकांना,आणि हितचिंतकांना तुमच्या माध्यमातून बहुतेक रोज भेटत असतो.नाहीतर मला येथे वेळ घालविणे कठीण झाले असते.तुमच्यामुळे तर मी माझ्या जुजबी ज्ञानावर समर्थ रामदास स्वामींचा आदेश काटेकोरपणेपाळून "दिसामाजी काहीतरी ते " लिहित असतो.

मी येथे आल्यापासूनच तुम्हाला भेटायला यायचे म्हणतोय पण तुमच्या देशातील ह्या थंडीनेच मी अक्षरश: गार पडलोय आणि परावलंबी म्हणजे मनात आले की लगेच बाहेर जाता येत नाही पुण्यासारखे.पण अमेरिकेला अलविदा करण्यापूर्वी उभ्याउभ्या का होईना मी तुमच्याकडे येऊन जाणार आहे.तुमचे बरेच भाऊबंद म्हणजे गुगलराव,याहूअण्णा,नोकियाजी तुमच्या आसपासच रहात असल्याचे मला समजले.गुगलरावांचे साम्राज्य नेत्रदीपक आहे अस म्हणतात सगळेजण.बघू जमले तर.पण फेसबुकराव तुम्ही अनेकजणांवर मोहिनी घातली आहे ह्यात शंका नाही.लहानापासून ते थोरांपर्यंत (थोर म्हणजे किती तर वयवर्षे 106असलेल्या आजीबाई सुद्धा तुमच्या खातेदार असल्याचे नुकतेच वाचले आहे) सर्वाचे पान तुमच्याशिवाय हलत नाही.तरुणवर्ग तर काय अगदी झपाटला आहे बघा.तुमचे नाव काढले की अनेकांचा चेहरा प्रफुल्लीत होतो आणि काहींचा चेहरा म्हणजे फेस अगदी पडतोच.का बर असं?

अहो मी एकाशी फेसबुक बद्दल बोलायला लागलो तर त्याने असा काही चेहरा केला आणि 'छे छे आपण तसलं काही करत नाही "असे एकदम झटकून टाकले.मला वाटले आपल्या तोंडून गेलेला "फेसबुक "हा शब्द महाशयांना "झुरळ "असा ऐकू गेला की काय ?
इतकी त्वरित आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्याबद्दल. जाऊ दे.शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरे.पण सध्यातरी मला तुम्ही चांगलीच सोबत करताय ह्यात शंका नाही.तुमचे उपकार सर्व जगावर आहेत हे विसरता येणार नाही.प्रत्येक बाबतीत चांगले वाईट आणि गुणदोष असतातच त्यात काय मोठे?असो ,पुन्हा एकदा तुमचे हार्दिक अभिनंदन आणि भावी काळासाठी शुभेच्छा कळावे.लोभाबद्दल काय लिहावयाचे?त्या शिवाय का झालाय हा पत्रप्रपंच.

आपला असाच एक मित्र

शुभप्रभात

No comments:

Post a Comment