Wednesday, February 26, 2014

ठ्ठल - क्षेत्र विठ्ठल:
(संगीत पंढरीतील विठ्ठलाचे स्मरण )

आज रथसप्तमी.भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचा म्हणजेच अनेकांच्या भीमाणणचा तिथीने येणारा वाढदिवस.पण सर्वांच्या लक्षात ४ फेब्रुवारीच असते.त्या दिवशी माझे सध्याचे जिवलग मित्र श्रीयुत फेसबुकराव दहा वर्षाचे झाल्याने एक वेगळेच महत्व ह्या तारखेला प्राप्त झाले. त्यामुळे आज अण्णांच्या बद्दल चार स्मृतीचे शब्द लिहित आहे.वा...स्तविक मी काही कोणी खास माणूस नाही.अण्णांचे असंख्य चाहते दुनियेत पसरले आहेत त्यापैकीच मी पण एकजण.पण आचार्य अत्रे आणि भीमसेन जोशी ह्या दोन विभूती म्हणजे साहित्य आणि संगीतातील माझी दैवते आहेत. माझ्या लहानपणी १९५४/५५ साली सातारच्या' आनंद ' चित्रपटगृहात 'बसंत बहार "हा शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट मी गाण्यातले 'ओ' किंवा 'ठो 'माहित नसताना पाहिला तेंव्हापासून 'भीमसेन जोशी 'हे नाव मला माहित झाले.पुढे' गुळाचा गणपती 'मधील 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी' हा अत्यंत लोकप्रिय अभंग भीमसेन जोशी ह्यांनीच गायला आहे हे कळल्यावर मला त्यांच्या बद्दल फार आदर आणि प्रेम-भक्ती निर्माण झाली.पण त्यांच्या शास्त्रीय संगीताची काही ओळख नव्हती.

१९७१ किंवा १९७२ साली त्यांना जेंव्हा' पद्मश्री 'मिळाली तेंव्हा सातारच्या रसिक संगीतप्रेमी जनतेने न्यू इंग्लिश स्कूल मध्ये राजमाता सुमित्राराजे भोसले ह्यांच्या हस्ते पंडित भीमसेन जोशींचा सत्कार केला.त्यावेळी अण्णांचे नेहमीप्रमाणे छोटे पण खुसखुशीत भाषण झाले.उतरार्धात त्यांची संगीत मैफिल झाली.हा दुग्धशर्करा योग मी आवर्जून पाहिला आणि ऐकला'.मारुबिहाग ' आणि त्यातील 'रसिया आओ न'ही बंदिश ऐकून तर मी मंत्रमुग्ध झालो आणि पंडितजींचा निस्सीम चाहता म्हणा भक्त म्हणा बनलो.१९७४ पासून बहुतेक सवाई गंधर्व महोत्सवास अण्णांच्या प्रेमामुळे हजेरी लावली आहे.अधूनमधून मी अण्णांना भेटत ही असे.त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या 'कलाश्री'त जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन करण्याचा, पद्मभूषण,पद्मविभूषण आणि भारतरत्न हा सर्वोच्च मान मिळाल्यावर त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले.अनेक प्रसंग आणि सहवासाचे क्षण मी कॅमेरात बंदिस्त करून ठेवले आहेत.त्यांच्या मैफिली तर किती ऐकल्या हे सांगता येणार नाही.सातारा कराड कोल्हापूर औंध कोरेगाव आणि पुण्या मुंबईत ब-याच कार्यक्रमाना मी हजेरी लावली.त्यांच्यावरील भक्तीने मी झपाटलो गेल्याने त्यांच्याविषयीचे आलेले सर्व वृत्तपत्रीय लिखाण,कात्रणे,लेख ह्यांचा मी गेली कित्येक वर्षे संग्रह केला आहे.त्यांची बहुतेक सर्व पुस्तकेही मी विकत घेऊन वाचली आहेत.त्यांच्याविषयीचा सर्व संग्रह त्यांनाच मी देण्याचे ठरविले होते.पण ..........

अनेक केसेटस,सीडीज डी व्ही डिज ,रेकॉर्ड्स मधून पंडितजींचा घनगंभीर पहाडी आवाज माझ्या घरात आहे पण आता हा महान गायक आपल्यात नाहीये ही खंत मनाला सारखी बोचत असते.सवाई गंधर्व कार्यक्रमातील त्यांचे गायन आणि भैरवी ऐकल्यावर असंख्य श्रोते त्यांच्या भोवताली जमत.मी पण अनेकदा ह्याच गर्दीत असायचो.अण्णांचा निरोप घेताना मात्र डोळे भरून यायचे.त्यांचे मोजकेच पण खुमासदार बोलणे,त्यांच्या मित्रपरिवारातील हालचाली,हास्यविनोद हे सर्व मी नजरेत टिपून ठेवत असे.आणि पुढच्या वर्षीच्या महोत्सवापर्यंत हा आनंद पुरवीत असे.शेवटी नोकरीच्या गावाला जाताना गाडीत सारखी अण्णांची "तीर्थ विठ्ठ क्षेत्र विठ्ठल " हा अभंग आणि "जो भजे हरी को सदा "भैरवी म्हणणारी मूर्ती असे.पंढरपूरच्या वारीला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याचे भाग्य मला अद्याप लाभले नाही तरी संगीत पंढरीच्या वारीला येऊन" ह्या" विठ्ठलाचे मात्र नियमितपणे मनसोक्त दर्शन "ह्या" वारक-याने घेतले आहे.

शुभप्रभात

No comments:

Post a Comment