Friday, February 28, 2014

आज मामाच्या घरीच जाऊ या

२०,शांताराम चाळ,माझगाव,मुंबई

मित्रानो हा जो पत्ता वर दिलाय न तो माझ्या मामाच्या घरचा पत्ता आहे आणि तो माझ्या हृद्यात अगदी खोलवर जाऊन रुजला आहे.ह्या पत्याशी १९५४ सालापासून माझे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे.मी नुसते मामाच्या गावाला जाऊ या म्हणत नाही तर मामाच्या घरीसुद्धा जाऊ या असे म्हणतो.माझ्या आयुष्यातले बरेच दिवस ह्याच चाळीतल्या भव्य आणि दिव्य ख...ोलीतून गेले आहेत.ह्या संदर्भात लेखक व.पु.काळे ह्यांचे एक वाक्य पहा "ज्यांची घरे मोठी असतात त्यांची मने लहान असतात आणि ज्यांची मने मोठी असतात त्यांची घरे लहान असतात."हे मला नेहमीच पटते.आणि तुम्हा सर्वांनाही पटेल ह्याची खात्री आहे.मध्यंतरी "दै.लोकसत्ता"मध्ये चाळीतल्या जीवनाविषयी अनेक लोकांनी आपल्या आठवणी कथन केल्या होत्या.त्या वाचून मलाही एकदम ह्या विषयावर लिहिण्याची सणक आली आणि काही लिहिलेपण.पुढे काय झाली हकीगत मलाही समजले नाही.मी कालच सांगितले की माझे दोन्ही मामा बर्याच वर्षापासून मुंबईतच होते म्हणून.पण आमचा मामाच्या घरी जाण्याचा योग १९५४ साली दिवाळीमध्ये आला.माझा आणि कोणत्याही चाळीचा कधीच संबंध आला नाही.कसा येणार?मी "घाटी "माणूस (त्यावेळी मुलगा) त्यात पुन्हा सातारा /कोरेगाव् कडचा राहणारा." मुंबई "फक्त इ.४ च्या धड्यातच पाहिली आणि वाचली ."जीवाची मुंबई "ह्या धड्यात. दिवाळीच्या सुमारास आम्ही दोघे बहिणभाऊ आईसह अक्षरशः जीव मुठीत घेऊनच आगगाडीने मुंबईला मामाकडे चाललो होतो.वाटेत पुण्याजवळील फुरसुंगी स्टेशनजवळ कितीतरी वेळ गाडी थांबली होती.काय झाले होते हे( अजुनहि)कळले नाही.शेवटी कसेबसे आम्ही किंग्ज सर्कलला एका परिचितांकडे गेलो आणि त्यांनी धाकट्या मामाला बोलाविले.संध्याकाळी मामा तेथे आल्यावर आमचा जीव भांड्यात पडला आणि सर्व पालखी डॉकयार्द स्टेशनकडे निघाली.त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास वरील पत्यावर अगदी सुखरूप पोहोचलो.आमचे चरण लागले एकदाचे चाळीला.मामाच्या घरात गेल्याबरोबर प्रथम लक्ष गेले ते रेडिओवर आणि त्याच आनंदाने मी बेहोष झालो.कारण कोणाच्याही घरी रेडीओ असणे हे त्या काळी अत्यंत श्रीमंतीचे,चैनीचे वाटे.आपल्या मामाकडेसुद्धा रेडीओ आहे ही आजची साधी बाब त्याकाळी मला लाख लाख मोलाची वाटली.हा माझा चाळीतील/ मामाच्या घरचा पहिला दिवस होता.

माझगाव ह्या मुंबईच्या भागात शांताराम चाळ ही अनेक मराठी कुटुंबे रहात असणारी एकमेव चाळ,आहेअसे वाटते .चाळीसमोरच एक मोठी विहीर बंदिस्त अवस्थेत ठाण मांडून आहे.आणि रात्री अनेकांचे हेच शयन गृह आहे.माझगावबावडी म्हटलं की पाठोपाठ शांताराम चाळहि आलीच.तेथे आजूबाजूला मात्र ख्रिस्ती लोकांची वस्ती होती.मामाच्या शेजारी एकूण चार कुटुंबे होती.वर्षानुवर्षे एकत्र सर्व रहात असल्याने त्या मजल्यावरचे वातावरण अगदी कौटुंबिक स्वरूपाचे असे.सर्वजण एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होत आजचा"सामाजिक बांधिलकी "हा गुळगुळीत झालेला शब्द प्रयोग तेंव्हा जन्मालाही आला नव्हता.तरीही एकजूट,आधार,प्रेम जिव्हाळा माणुसकी शेजारधर्म ही मंडळी नेहमी ह्याच मजल्यावर रहात.मी ह्याचा अनेक वर्षे अनुभव घेतला आहे.मामाच्या घराचे माप मला भूमितीच्या मार्गाने नक्की सांगता येणार नाही.पण आनंदी सुखासमाधानाचे,बेहोषीने जीवन जगणार्यांसाठी ते एक मोठे स्टेडीयमच होते.माझी सर्व मामेभावांडे संगीतप्रेमी असल्याने त्याच खोलीत नव्हे त्याच विस्तृत जागेत अनेक लहानमोठ्या संगीताच्या बैठका झाल्या.तिथे सर्व संगीतप्रेमी चाळकरी मंडळी जमत.गायन वादन नकला,करमणुकीचे अन्य कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडले जायचे.पण अडीअडचणीच्या वेळी ,संकटकाळी,दुखाच्या प्रसंगीसुद्धा हेच सर्व शेजारी मदती साठी एकमेकांकडे धावूनही जात असत.घराच्या ह्या सुखीसमाधानी अवस्थेला माझ्या मामाप्रमाणे मामीचाही मोठा वाटा.आहे.आहे त्या परीस्थित मोठ्या आनंदाने जीवाची मुंबई केली ती मामीमुळेच.ट्रामचा प्रवास,राणीचा बाग,राजाभाई टोवेर, महालक्ष्मि, वीरकर वेलणकर हॉटेल्स,हंगिंगगार्डन,इ.इ. हे सर्व मामीने मोठ्या हौसेने आम्हा सर्वांना दाखविले.नाहीतर आम्हाला कोण दाखविणार होते त्या काळात? Nostalgik झाल्याने काही सुचत नाही.चाळीतील बरेच शेजारी आता आपापल्या खोल्या विकून उपनगरात राहायला गेलेत.तरीपण सर्व मंडळींचा कोणत्या न कोणत्या प्रसंगी एकमेकांशी संपर्क आहेच.मुंबईला मी होतो त्यावेळी चाळीचे दर्शन घेण्यास जात असे.पण आता तेही संपले.ज्या दिवशी विक्रीचा व्यवहार झाल्याचे मला समजले त्या दिवशी काळजाचा ठोकाच चुकला.मामामामीने आम्हाला जेंव्हा अपोलो बंदरावर नेऊन समुद्र आणि त्याच्या लाटा दाखविल्या अशाच अनेक सुखदुखाच्या स्मृतींच्या लाटा आता उसळ्या मारताहेत.

वेळेअभावी आणि जागेअभावी थांबावे लागतंय.अजूनही सांगण्यासारखे /लिहिण्यासारखे बरेच आहे.पुन्हा केंव्हातरी मामाच्या घरी जावे लागणारच आहे.त्या आधी मला उद्या पुन्हा माझ्या मुलाच्या घरी सनीवेल USA येथे जायला हवे.

शुभप्रभात :

No comments:

Post a Comment