Thursday, February 27, 2014

बिनाका गीत माला .......आणि अमीन सयानी .......

काही दिवसापूर्वी सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी ह्यांच्या विषयीचे (बहुधा सत्कार सोहोळा असावा ) वृत्त मी येथे इंटरनेटवर वाचले. आणि डोक्यात एकदम "तो" आवाज फिरू लागला.वास्तविक अमीन सयानी हा वाचण्याचा किंवा पाहण्याचा माणूस नसून तो
सारखा ऐकतच रहावा असा माणूस आहे.टी.व्ही. चुकलो दूरदर्शनच्या आधीच हा माणूस रेडीओ असणार्या मोजक्या मंडळीं...च्या घराघरातून पोचला होता आणि त्याचा सुमधुर वैशिष्टपूर्ण आवाज ऐकण्यासाठी सर्वजण रेडीओ असणाऱ्याच्या घरी एकद्या व्रताप्रमाणे दर बुधवारी नियमितपणे जमत. मी पण अशा मंडळीमधलाच एकजण आहे.हो,उगीच लपवायचे कशाला?

अमीन सयानीचे वृत्त वाचल्यावर मला बालपणीचे सातारचे दिवस आठवले.काही वेळ मी सनीवेल मधून माजगावकर वाडा,सोमवार पेठ सातारा येथेच घुटमळत होतो.१९५६ आणि १९५७ मध्ये बिनाकाने मलाही वेडे केले होते.पण रेडीओ ही तत्कालीन अत्यंत श्रीमंत वर्गात मोडणारी वस्तू आमच्यापैकी कुणाकडेही नव्हती. पण पेठेतच असणारे शिवदे फ्रेम मेकर्स ह्यांच्या घरी मोठा रेडीओ असल्याने गल्लीतील बालगोपाल मंडळी दर बुधवारी सायंकाळपासूनच बिनाका गीतमाला ऐकण्यासाठी रांग लाऊन उभी असत.कारण फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर लवकर येणाऱ्या मुलांना झोपाळ्यावर बसायला मिळत असे.शिवदे कुटुंबानेही कुणाही मुलाची निराशा केली नाही.शेवटचे पहिल्या क्रमांकाचे गीत सुरु होण्याआधी निवेदक अमीन सयानी ह्याची मिठ्ठास रसवंती सुरु झाली की उत्साहाने मुलांचा जल्लोष सुरु होत असे.कृष्ण धवल चित्रपटातील अनेक गीतांनी" आखरी बदानपर"मध्ये मानाचे स्थान पटकावले होते.चोरी चोरी,आवारा इ.इ.महमद रफीचे "जरा सामने तो आओ चलिये" ह्या "जनम जनम के फेरे "चित्रपटातील गीताला जेंव्हा पहिला क्रमांक मिळाला तेंव्हा आम्ही सर्व आनंदाने बेहोष झालो होतो.आता एकेक आठवायला लागलं म्हणजे मन अस्वस्थ होते.किती साधे आणि बाळबोध जीवन होते.बिन पैश्यात देखील सर्वांनी भरपूर आनंद उपभोगला.पुढे आमच्याही घरी मोठ्या रेडिओचे आगमन झाले.पण त्या आनंदाने मात्र पाठ फिरवली.आमच्या रेडिओवर मात्र अमीन सयानीचा आवाज ऐकल्याचे आठवत नाही.
शिवदे ह्यांच्या रेडिओत नक्कीच काहीतरी जादू होती असे वाटते.असो.

आज ही आठवण येण्याचे आणखी एक कारण म्हणजे माझा फेसबुक वरील मित्र रवींद्र शिवदे हा पण एक सातारकर असल्याने आमचे गोत्र लगेच जुळले.बर्याच वर्षात भेट नव्हती पण फेसबुकमुळे ह्या आठवणीना,जुन्या साध्यासुध्या दिवसांना थोडी झळाळी मिळाली.एवढे मात्र खरे.

शभप्रभात.

No comments:

Post a Comment