Wednesday, February 26, 2014

ब्रश : दाढेचा आणि दाढीचा

दात, दाढ आणि दाढी हे त्रिकुट माझा पिच्छा सोडत नाही.काही दिवसापूर्वीच दाढेला का दाताला चांगलाच ठणका लागला होता.चुकून एकदा ठणक्याने असा काही दणका दिला की "ठो ठो"करायचेच बाकी होती.त्याच्या दुस-याच दिवशी येथील दंतवैद्यीणीकडे जाऊन हा विषयच मुळासकट उपटून काढल्याने हायसे वाटले.पण ह्या किरकोळ वाटणा-या दुखण्याचे कवित्व मात्र बरेच दिवस लांबत चालले आहे.मलाही... फारच चुकल्यासारखे झाले आहे.पण मित्र आणि हित चिंतक मात्र खुश आहेत.काही का असेना आपल्यामुळे दुसरा कोणीतरी खुश होतोय ही आजकालच्या जमान्यात काही कमी समाधानाची बाब नाही.ज्या दिवशी हे कर्मकांड पार पडले त्याच दिवशी माझा चेहराही पडला होता.कारण त्या दिवशी सकाळी फक्त एका ब्रशचाच वापर झाला.अस कधीही होत नाही.गेली अनेक वर्षे तिन्हीही क्रतुमध्ये न चुकता,न विसरता मी दात/दाढेचा आणि दाढीचा ब्रश वापरतो.हा कार्यक्रम माझ्या मंगल प्रभात मधला महत्वाचा आहे.कारण सकाळी एकदा चहाचे गरम पाणी घेतले की लगेच दुसरे गरम पाणी घेऊन स्वहस्ते स्वतःची स्वतः दाढी करण्याचे मोठे काम उरकले म्हणजे आपल्याला बरे असते.त्यामुळे बिनपाण्याने कार्य सिद्धीस नेल्याचे भाग्य दिवसभरात दुस-या कोणालाही लाभत नाही.

"त्या" दिवशी अगदी नाईलाजच झाला म्हणून खाडा झाला.पण दुस-या दिवशी अवस्था फारच खरखरीत झाली.आरसेही बदलून पाहिले पण तीच परीस्थिती असायची.मग मनात विचार आला की दाढी न करता तरी आपण बरे दिसतोय का हे पहावं.नाहीतरी इकडे येताना ज्याच्या ताब्यात माझे डोके दर दोन तीन महिन्यांनी देतो त्यानेही मला हा मौलिक सल्ला दिला होता.आणि "साहेब तुम्हाला(सुद्धा) दाढी छानच दिसेल "असे certificate देऊन मला हरभ-याच्या झाडावर चढविले होते.नेमकी हीच आठवण मला आली आणि मनाशी घोर प्रतिज्ञा केली के चालू फेब्रुवारी महिना हा सायबाचा श्रावण मास म्हणून आपण पाळायचा.आणि ह्या मुळेच दिवसेंदिवस चेहरा 'पांढरा' दिसू लागला.आता काळ्या रंगाची मजा गेलीच.ह्यामुळे रोजची १५ /२० मिनिटे माझी वाचू लागली.पण ह्या फायद्यामुळे मी काही' ही ' (घन )दाट ठेव कायमस्वरुपात चेह-यावर बाळगणार नाही." दाढीवाढ " हा प्रयोग हौसेखातर केल्याने सध्या उगीचच दाढी कुरवाळण्याचे किरकोळ काम मात्र वाढले आहे.नव्याची नवलाई दुसरे काय?
कॅमेराचे सध्या फुल utilization आहे.अनेक मित्रांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या.कोणी म्हणाले डाय करून फोटो काढा तर कोणाला' ह्या आणि असल्या 'रुपात माझ्यातला (म्हणजे माझ्या दाढीतला )कवी दिसला पण लेखक नाही दिसला.(कसा दिसेल?बहुधा तो ही आपले क्षुराकर्मच उरकायला गेला असणार)एकाने तर सध्या अमेरिकेत दाढीकटींगचे दर वाढलेत की काय अशी चौकशीसुद्धा केली आहे.थोडक्यात माझी दाढी आणि तमाम जनतेच्या शंका कुशंका ह्या दोन्हीतही लक्षणीय वाढ होत आहे.यथावकाश परिस्थिती निवळून निर्मळ वातावरण होईल अशी मी ग्वाही देतो.

मागे एकदा नेहमीच्या गडबडीमुळे डोईजड झालेला विपुल केशसंभार उतरवायला वेळच न मिळाल्याने केस का जुल्फे म्हणतात ते माझ्या भाळी - कपाळी येऊ लागले आणि इतरांच्या डोळ्यावर येऊ लागले. माझी ही आठवणही अशीच अविस्मरणीय आहे.

आता पु.लंचा एक किस्सा ह्याच विषयाशी निगडीत

एकदा एका प्रसिद्ध चित्रकाराने पु.लं.ना त्याचे चित्र प्रदर्शन पाहण्यास मोठ्या सन्मानाने बोलाविले होते.ते पाहून झाल्यावर लगेचच भाईच्याच अध्यक्षतेखाली चित्रकाराचा सत्कार होता.सत्कार समारंभात आपल्या कलेचे ,रंगाचे आणि विविध ब्रशचे महात्म्य सांगत असतानाच हे महाशय म्हणाले की" आपल्या पाहुण्यांनीसुद्धा
कधीही कोणताच ब्रश हातात धरला नसेल .....असेच काहीतरी होते "हे ऐकताच पु.ल.हातवारे करीत म्हणाले "रोज धरतो की हो ब्रश ...दाढी करताना"हे ऐकताच तो चित्रकारही इतराप्रमाणे हसू लागला.

शुभप्रभात

No comments:

Post a Comment