Wednesday, February 26, 2014

ठणका आणि दणका :दाढेचा

आज दिवसभर दाढदुखीने हैराण झालो आहे.काहीच सुचत नव्हते.खरतर आज काहीच लिहायला नको असे वाटत होते पण दातखीळ बसली तरी हाताला थोडा व्यायाम म्हणून थोडेसे चमचाभर लिहितो. उजवा गाल सुजल्याने चांगलाच बाळसेदार झाला आहे.आज सकाळी उठल्यावरच मला माझ्या रुपाची दया आली.आरशात पाहिले तेंव्हा तर "आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी "हेच सारखे आठवायला लागले.आज खाणे पिणे (म्हणजे... चहा कोफी वगैरे )करताना फारच कुतरओढ करावी लागली.चेह-याचे व्यायाम/ योगासने सर्व करावे लागले.तेव्हा कुठे थोडे बरे वाटले.आता उद्या दंतवैद्याकडे जाणार असून त्यांना संपूर्ण बत्तीशीच (म्हणजे खायची आणि दाखवायची ) दाखवणार आहे.ही खरी कथा असून दंतकथा नाहीये.

पण मला एका गोष्टीचे सारखे नवल वाटते की माझ्या बत्तीशीचे आणि परदेश/परप्रांताचे काही वाकडे आहे का ?ही तिसरी वेळ आहे.मागे बँकेत असताना हैदराबाद येथे एका कोर्सला गेलो होतो.पहिले दोनतीन दिवस चांगले गेले. नंतर "आक्काबाई" ठणकायला लागल्याने एका तेल्गुदेसम दंतवैद्याकडे गेलो.तपासल्यावर ते म्हणाले "You are getting wisdom tooth" बाप रे म्हणजे अक्कलदाढ येत आहे.वाजतगाजत.म्हणजे आपल्याकडे हा दुर्मिळ दात अजुनपर्यंत नव्हता कि काय?ह्या विचाराने मी चक्रावलो.पण अक्कलदाढ महाराष्ट्रात का नाही आली?तेवढ्यासाठी आंध्रात का यावे लागले? हा मौल्यवान ठेवा मी अजून बाळगून आहे ही आनंदाची बाब आहे.असो.1999 मी BMM अधिवेशनाच्यावेळी प्रथम San Jose USA मध्ये आलो होतो.८ दिवस मजेत गेले पण जायच्या दिवशी हेच नाटक सुरु झाले.तळहाताचा आधार देत एका गालाला दिवसभर थोपवून धरले होते.SFO विमानतळाच्या वेटिंग रुममध्ये असाच खिन्न अवस्थेत बसलो होतो.एकाद्या गवयाच्या मागे ता नपु-यावर बसणारा माणूस जसा हाताच्या पंजावर चेहरा ठेऊन गात असतो त्याच स्थितीत मी पण तेथील सोफ्यावर लवंडलो होतो.दाढदुखीने सर्व आनंदावर बोळा फिरवला होता. योगायोगाने SBI चाच एका मित्र मला तेथेच भेटला म्हणून थोड बऱ वाटलं. आणि आता ही तिसरी वेळ .इजा बिजा तिजा.बघू या उद्या दंतवैद्याकडे "आ"वासून बसणार/बघणार आहेच.

हे लिहित असतानाच दोन विनोद किस्से आठवले.ते पण विषयाला धरूनच असल्याने सांगण्याचा मोह होतोय,
1)एका चित्रपट गृहाच्या डोअरकीपरचा कुठलातरी दात खूप दुखु लागल्याने तो दाताच्या डॉक्टरकडे गेला.तपासणीच्या वेळी डॉक्टरने विचारले "कोणता दात दुखतोय "तेंव्हा हे महाशय ताडकन म्हणाले "बाल्कानीतील चौथा ".

2) एक आज्जीबाई दाताच्या डॉक्टरकडे गेल्या असताना डॉक्टर सारखे त्यांना मोठा "आ"करा म्हणत होते.कितीही वेळा "आ"केला तरी" पुन्हा पुन्हा मोठा "आ "करा काही संपेना.शेवटी आजीबाई ओरडल्या "आर तू काय माझ्या तोंडात बसून दात काढणार हैस व्हय?" तेव्हा डॉक्टरच आजीबाईकडे"'आ"वासून पाहू लागले.

शुभप्रभात :

No comments:

Post a Comment