Wednesday, February 26, 2014

खरीखुरी दंतकथा:

परवापासूनच मला दात/दाढेच्या ठणक्याने अगदी जेरीस आणले होते.म्हणून कालच सकाळी ९.३० च्या शुभ मुहुर्तावर मी माझ्या मुलाबरोबर घराजवळच असलेल्या एका दंत वैद्याकडे अक्षरश:'दात काढायला 'च गेलो होतो.म्हणजे appointment घेऊनच.सर्व काही रीतसर.जवळअसलं म्हणून काय झालं,अमेरिका आहे ही म्हटलं. एका मोठ्या कमर्शियल व्यापार संकुलात असलेल्या posh दंत मंदिरात वेळेवर पोहोचताच एक...ा अमेरिकन स्वागतिकेने आमचे हार्दिक स्वागत केले.चष्मा लावलेला "असला "माणूस' हा 'सुहास'नावाचा नक्कीच नसणार ह्या ठाम विश्वासामुळेच त्या गौरवर्णीय युवतीने येथील रूढीपरंपरेनुसार 'हाय सुहास म्हणत माझ्या मुलाशीच सुसंवाद सुरु केला तेंव्हा मात्र मी ' छातीवर हात ठेऊन 'मी मी myself"असे पुटपुटलो.नंतर तिने नजरेने "हो"म्हणत माझा पंचनामा सुरु केला आणि केसपेपर नामक कुंडलीतले रकाने भरायला सुरवात केली.ते झाल्यावर "you hav tea, coffee,water?" ह्या प्रश्नाचे "no plz."हे उत्तर ऐकताच आम्हाला समोरील स्वागतकक्षेत बसण्याची गोड विनंती केली.मी डोक्यावरील मुगुट काढून समोर ठेवलेले "SAN FRANSISCO THEN AND NOW"हे चित्रमय स्वगत चाळत बसलो. मी पण आपण SFO गावचेच मुळ रहिवासी असल्यासारखे ते पुस्तक मोठ्या उत्सुकतेने पहात होतो.आणि दंतमंदिरात नसून वाचन मंदिरातच आहोत असे समजून पुढच्या ऑर्डरची वाट पहात होतो इकडे मुलगा व्यवहाराच्या वाटाघाटीत बिझी होता.

"Please come"हे फर्मान ऐकताच मी" वधस्तंभाकडे" गेलो.पण प्रमुख डॉक्टर कोण हे कळले नाही म्हणून चिंता आणि उत्सुकता.कारण अमेरिकेत बरेच चिनी डॉक्टर दाताचे,डोळ्याचे आणि अक्युपंक्चरचे आहेत. शिवाय नुकतेच एका चिनी अक्काबाईला सलूनमध्ये मी माझे डोके तिच्या ताब्यात दिले होते.आणि आता दाताची डॉक्टरीणहि जर" चिनीण" असेल तर तिलाही तोंड द्यावे लागेल (म्हणजे खायचे आणि दाखवायचे दात तपासण्यासाठी) ह्या विचाराने मी ग्रासलो.नंतर कळाले की प्रमुख डॉक्टरचे नाव "किरण"आहे.पुन्हा डोक्यात "तो " असेल का "ती असेल.?आलेच.शेवटी ती भारतीय पण अमेरीकेचीच सुकन्या निघाली.दुस-या एका कनिष्ट डॉक्टरने प्राथमिक चाचण्या आणि चौकश्या केल्यावर थोड्या वेळात" प्रमुख( डॉक्टर) भूमिका "वठविणाऱ-या डॉक्टरीणबाई आल्या.मी "आ"वासून बघू लागलो.माझ्याशी अमेरिकन पद्धतीने बोलत होत्या.पण मुलगा दुभाष्याचे काम करीत असल्याने मी फक्त फेर/उलट तपासणी समजून yes/no करीत होतो.उपचाराबाबत सांगोपांग चर्चा झाल्यावर दोन' दंताजींचे ठाणे' उठविण्याचे ठरविले.लगेच" त्या " खास खुर्चीवर अडवा होऊन वर असलेल्या खास दिव्यांकडे बघू लागलो.मधूनच तिरकस नजरेने हत्यारांकडे पहात असतानाच मोठा "आ" केला आणि दुस-या एका डॉक्टरने भूल म्हणून तोंडात सुगंधी फवारा मारला. काही वेळातच आमच्या विमानाने take off केल्यावर क्रिया कौशल्याचे "किरण"पडले.नंतर थोड्याफार गप्पा, आभार, हस्तांदोलन वगैरे सर्व काही स्थानिक वेळ आणि परंपरेनुसारच झाले.

बाहेर आल्यावर सर्व स्टाफने त्यांच्या सुहास्य वदनाने "_हाय हौ आर यु ओके?"म्हणत सरबत्ती केली.मी मनातल्या मनातच OK म्हणालो. कापसबोळे आता तोंडात मुक्कामाला आल्याने वाचा बंद झाली होती.भारतीय पद्धतीने हात जोडले.नेहमीची सवय ना.येताना काळजी घेण्यासाठी १०/१२ बंधने (Do & Don't)गुंफलेला एक दस्तऐवज मला भेट दिला.मी पण त्यांना" हात दाखवून" म्हणजे हाताचा पंजा दाखवून GOOD BYE करत बाहेर पडलो.

शुभप्रभात:

No comments:

Post a Comment