Wednesday, February 26, 2014

व्हेज कोल्हापुरी : अविस्मरणीय दशक

"कोल्हापूर" नुसता तोंडातून शब्द बाहेर पडला की त्याच्या पाठोपाठ 'खानदानी ,राजेशाही,रॉयल,चमचमीत आणि झणझणीत,हे 'पुरेपूर कोल्हापूरचे'यथार्थ वर्णन करणारे शब्द आपल्या म्हणजे निदान माझ्यातरी तोंडातून बाहेर येतात".रोमला गेलात तर रोमन लोकांसारखे वागा "अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे ती कोल्हापुरलाही तंतोतंत लागू पडते.जो कोल्हापूरला येतो तो येथील दि...लदार
आणि दिलखुलास वातावरणामुळे कायमचा कोल्हापूरच्या प्रेमात पडून "कोल्हापुरी "च होतो.
माझ्या बँकेच्या नोकरीच्या काळात कधीतरी आपली बदली कोल्हापूरला व्हावी असे मनातून वाटे पण कोठेही बदली झाली तरी आमचा "अजिंक्यतारा "पण दिसला पाहिजे असेही वाटे.पण आमच्या अन्नाचा शेअर एक दशक तरी महालक्ष्मिच्या करवीर ह्या पवित्र भूमीत होता.ही एक मोठी भाग्याचीच गोष्ट आहे.त्यामुळे कोल्हापूर सोडून २० वर्षाहून अधिक काळ झाला तरी ते अविस्मरणीय,मोरपंखी दिवस विसरताच येत नाहीत.आमच्या सर्व कुटुंबालाच कोल्हापूरची ओढ आणि प्रेम आहे.सध्या अमेरिकेत असलेल्या आमच्या दोन्हीही मुलांचे शिक्षण येथेच झाल्याने कोल्हापूरचा विषय निघाला की आठवणींचा महापूर येतो.

फेब्रुवारी १९८२ मध्ये मी शिरोली औ.व.शाखेत बदलून आल्यावर सुरवातीला थोडे दिवस येथील शाहूपुरीत मी एकटा रहात होतो. रेल्वे स्टेशनमागे असलेल्या पाच बंगला परिसरातील एका झणझणीत पण रुचकर शाकाहारी खानावळीत (हो,बेचव पदार्थांचे डायनिंग हॉल त्यावेळी बहुधा जन्माला आले नव्हते.)रोज सकाळी जेऊन एस.टी./के.एम.टी. ने १४ किलो मीटरलांब असलेल्या शिरोली ब्रान्चला जात असे.कधी कधी बी.टी.कॉलेज जवळ असलेल्या दुध कट्ट्यावरून "हैय्या हो "अशी खणखणीत हांक ऐकल्यावर म्हशीचे डोळ्यादेखत काढलेले धारोष्ण दुध घेतल्यावर (म्हणजे प्याल्यावर)कोल्हापूरला बदली झाल्याचे सार्थक झाले असे वाटे.पुढे सातारहून सर्व कुटुंबकबिला येथे आल्यावर आम्ही" बसंतबहार"टोकिज जवळील एका प्रशस्थ वाड्यात रहात होतो.त्यामुळे flat संस्कृतीचे महात्म्य तोपर्यंत माहित नसल्याने पूर्वीप्रमाणेच घरचे वातावरण साधेसुधे होते".हायफाय" ह्या नाटकी शब्दांचा अर्थही माहित नसे. घराच्या आजूबाजूला पाच सिनेमागृहे आहेत ही मोठी खुण आम्ही अभिमानाने सांगत असू आधी सातारला.दहा पैशाला मिळणारी मिरची कोथिंबीर कोल्हापुरात चार आण्याला पडते हे पाहून त्यावेळी सुद्धा "वाढत्या महागाईचे " चटके बसत होते.आनंद आणि दुख: ह्यांचा संसारातील शिवा- पाणी चा खेळ नेहमीप्रमाणे सुरु होताच. रविवार म्हणजे एक वेगळ्याच आनंदाचा दिवस असे."प्रिया "स्कूटरवरून दोन्ही मुलांना घेऊन श्री महा लक्ष्मी दर्शन घेतल्यावर" मोहन विश्रांती गृह "ला भेट देऊन चमचमीत मिसळ/चहा घेतला म्हणजे साप्ताहीकेतील एक दुसरेही पवित्र काम पार पडल्याचे समाधान मिळे.

पुढे १९८५ पासून आम्ही वाडा संस्कृती सोडून कायमच्या दारबंद संस्कृतीत शिरलो.कोल्हापुरातील राजेमहाराजे ज्या ठिकाणी रहात त्या सुप्रसिद्ध ताराबाई पार्क/नागाला पार्क ह्या भागातील "मानसी"अपार्टमध्ये आम्हीसहा सात वर्षे रहात होतो.हा परिसर फार स्वच्छ ,प्रशस्थ आणि हवेशीर असल्याने नवीन राहणीमानाचा वेगळाच आनंद सर्वांना होत असे.कोल्हापुरातील" किरण " बंगल्याची आणि छाया हौ.सोसायटीची खुण सांगताना आमची छाती फुगून येत असे. खरतर त्या परिसरातील पगाराची वाट पाहणारी आमची घरे होती.पण वागणे मात्र शाही थाटाचे.पुण्यामुंबइचे पाहुणे आले की त्यांचे स्वागत बावड्याच्या मिसळीने केले जायचे.माझ्या दृष्टीने ह्या घराचे वैशिष्ट्य म्हणजे माझ्या पहिल्या अत्रे साहित्य प्रदर्शनाचे बीज मी येथे लावले.शेजारी आमच्या बँकेची हौसिंग सोसायटी आणि कॉलोनी होती.सर्व वातावरण मित्रत्वाचे, शेजारधर्म, माणुसकी ,प्रेम आणि जिव्हाळा ह्यांनी भारलेले होते. पण आमचा येथील अन्नाचा शेअर संपला आणि करवीरनगरीचा निरोप घेऊन पुण्यनगरीत प्रस्थान केले.

नोकरीच्या निमित्ताने अनेकजण कोल्हापुरात येतात जातात.कोल्हापूर ही कलानगरी.नोकरी ही निमित्त झाली.पण ह्या कलानगरीत आपण काहीतरी थोडेसे आपले कर्तृत्व दाखवावे म्हणून मी पहिले आचार्य अत्रे साहित्य दर्शन जगजाहीरपणे शाहू स्मारक भवन येथे आमच्या येथील दसरा चौक ब्रान्चच्या गणेशोत्सवात १९८९ साली आयोजित केले होते.साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अनेक मंडळी,जुने शेजारी,आणि बँकेतील असंख्य मित्र ह्यांच्याशी माझे स्नेहसंबंध अजूनही ताजे टवटवीत आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स चा सन्मान मिळाल्यावर आमच्या कोल्हापूरच्या SBI PENSIONERS' ASSOCIATTION ने केलेल्या माझ्या सत्काराला उत्तर देताना मी माझे कोल्हापूर प्रेम आणि कृतज्ञता जाहीरपणे व्यक्त केली होती.त्यामुळे रंकाळा,महाद्वार रोड ,कपिलतीर्थ मंडई,कावळा नाका,विनायक स्टोप,पापाची तिकटी,भवानी मंडप,शालिनी palace ह्या खुणा वाचनात आल्या की मन केंव्हाच महलक्ष्मिच्या मंदिरात गरुड मंडपात जाते.

1 comment: