Tuesday, May 26, 2015

कै.राम गणेश गडकरी --जयंतीनिमित्ताने (शिष्याचे गुरुस्मरण )

कै.राम गणेश गडकरी ....जयंतीनिमित्ताने( शिष्याचे गुरुस्मरण )
आज महाराष्ट्राचे थोर नाटककार,विनोदी लेखक,आणि प्रतीभासंपन्न कवी राम गणेश गडकरी ह्यांची जयंती असल्याने आपण "दिसामाजी " ह्या सदरात" काहीतरी ते " थोडेफार लिहून आपण त्यांचे स्मरण करावे असे मला वाटल्याने चार ओळी लिहीत आहे . राम गणेश .गडक-यांची मराठी साहित्याच्या दरबारातील कर्तबगारी ही निर्विवाद उच्च कोटीतील आहे हे सर्व महाराष्ट्र, आणि मराठी माणूस पूर्णपणे जाणून आहे. अशा ह्या एकमेवाद्वितीय अष्टपैलू साहित्यिकाचे शिष्योत्तम म्हणजे आचार्य प्र.के. अत्रे हे होत.अत्र्यांनी आपल्या लेखणी आणि वाणीद्वारे आपल्या गुरूची महती अनेक दशके महाराष्ट्रापुढे सादर केली आहेच.तरीपण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या "अप्रकाशित आचार्य अत्रे "ह्या सुंदर पुस्तकामध्ये "पाच वर्षाच्या परिचयात --"(१९१४ - १९१९ ) ह्या २० पृष्ठांच्या प्रदीर्घ लेखात ह्या शिष्याने आपल्या गुरूच्या अनेक स्मृती वाचकापुढे मांडल्या आहेत. ह्या लेखाची पूर्वप्रसिद्धी : "नवयुग " फेब्रुवारी १९२० म्हणजे जवळ जवळ एक शतकापूर्वीची आहे.गडक-यांची अनेक स्वभाव वैशिष्ट्ये ह्या लेखामुळे माहित झाली.तसेच त्यांच्या वैयक्तिक जीवनाची ही कल्पना आली.ह्या आठवणी एका थोर व्यक्तीच्या आहेत हे विसरता येणार नाही.ह्या सर्व आठवणी माझ्या ब्लॉग लिखाणात सांगणे अवघड आहे.अत्र्यांनी ह्या लेखाच्या शेवटी आपल्या गुरूला जी आदरांजली ,सुमनांजली वाहिली आहे ती बहारदार आहे एवढे नक्की.ती मात्र समस्त वाचकांना कळावी म्हणून ह्या ब्लॉगचा प्रपंच केलाय.आता वाचा अत्रे उवाच :-
"महाराष्ट-वाण्ग्मयाच्या सेवेला गडक-यांनी आपले सर्वस्व अर्पण केले.महाराष्ट्र- शारदेचा संसार साजरा करण्यासाठी गडक-यांना स्वत;च्या संसारावर पाणी सोडावे लागले. वैराण वाळवंटावर नंदनवनाची बागाईत उठविण-या ह्या कुशल वन माळ्याला आपल्या घराचे वन बनवावे लागले. बीजाचा वृक्ष क्षणात फुलवून दाखविना-या ह्या चतुर जादूगाराला स्वत;चा जीवन् वृक्ष निर्बीज करावा लागला.कल्पनेच्या कल्पलतेवरची तोडून आणलेली पुष्पांजली रसिकांवर उधळण्यासाठी त्याला स्वत;च्या सुखाला तिलांजली द्यावी लागली.मानवी संसाराचे चित्र मूर्तिमंत प्रतिबिंबित करणारी नाटके निर्माण करताना ह्या जगद्रंगभूमीवरील अलौकिक नटाला आपला संसार नाटकी करावा लागला.आपल्या निर्मल व सहजमनोहर विनोदाने रसिकांना हसविताना ह्या हृदय्र रंजकाला स्वत;च्या आयुष्याचे हसे करून घ्यावे लागले [ त्यांना स्वत;चे जीवन नव्हते, भावना नव्हत्या आणि आनंदही नव्हता [ त्यांचे सारे जीवन - त्यांचे विचार - त्यांचे ध्यान एका महाराष्ट्र -सरस्वतीच्या पावलावर साठविलेले होते. इतका एकनिष्ठ,श्रेष्ठ व स्वार्थत्यागी वांग्मयसेवक भरतखंडात क्वचितच झाला असेल.[समुद्राची प्रचंड लाट एकदम उसळावी आणि मोत्यांचा पाऊस किना-यावर उधळून पुन्हा झटकन पाण्यावर विरून जावी त्याप्रमाणे गडकरी जन्मास येऊन,आपल्या हृदयातील उज्ज्वल विचारभौक्तिके महाराष्ट्रावर उधळून आपले तीन तपाचे उणेपुरे आयुष्य संपवून अनंताच्या उदरात अस्त पावलेले आहेत,हा बुद्धिभास्कर जरी मावळला आहे तरी त्याच्या तेजाचा झल्लाळ महाराष्ट्रावर अक्षय झळाळत राहील ["
महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यकाळात, चिरकालीन सौंदर्याने,अक्षय तेजाने,अमर वैभवाने एकच भव्य मूर्ती सारखी तळपत रहाणार [ आणि ती '' राम गणेश गडकरी '' यांचीच होय. (नवयुग फेब्रुवारी १९२०)
अशा ह्या थोर विभूतीला त्रिवार वंदन .....त्रिवार वंदन ......त्रिवार वंदन
शुभप्रभात दि.२६ मे २०१५ ...................>>>>>>>>>..............>>>>>>>>>>....................

1 comment: