Saturday, May 16, 2015

अप्रकाशित आचार्य अत्रे (जुन्या सुंदर लेखांचे नवे पुस्तक )

'अप्रकाशित आचार्य अत्रे'
(जुन्या सुंदर लेखांचे नवे पुस्तक )
परचुरे प्रकाशन मंदिर मुंबई ह्या संस्थेने नुकतीच मराठीतील तीन मान्यवर लेखकांची तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत. १)अप्रकाशित आचार्य अत्रे २)पुन्हा मी ....पुन्हा मी -पु.ल .देशपांडे ३)सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज. मी ही तिन्हीही पुस्तके विकत घेऊन माझ्या साहित्य संसारात त्यांची भर घातली.पहिले पुस्तक म्हणजे माझ्या दैवाताचेच असल्याने त्याचा लगेच फडशा पाडला.ह्या साहित्य सम्राटाच्या साहित्य सागरात कितीतरी मौल्यवान रत्ने आहेत.गेली ५०/६० वर्षे 'अत्रे' वाचूनही मला अद्याप त्यांच्या लेखणीचा पुरेपूर सुगंध घेता आला नाही.इतकी "ह्या " प्रचंड माणसाची प्रचंड कामगिरी मराठी साहित्याच्या दालनात आहे आचार्य अत्रे ह्यांनी तत्कालीन अनेक सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक विषयावर आपल्या खास आत्रेय शैलीने विपुल लिखाण केले आहे.अनेक मासिकामधून दिवाळी अंकामधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत.पण ते लेख सगळीकडे विखुरलेले होते ते आता ह्या नवीन पुस्तकाच्या रूपाने एकत्र गुंफले गेले आहेत.अत्रेप्रेमी मराठी माणसाला ही वाण्ग्मयीन मेजवानीच आहे.१९३० सालापासूनचे लेख संग्रहित केले आहेत.तत्कालीन "रत्नाकर "च्या सप्टेंबर १९३० मध्ये प्रसिद्ध झालेला "ओलेती"ची विटंबना हा गाजलेला लेख आहे."जांबुवंत दंतमंजन" हा लेख लिहून अत्र्यांनी तेंव्हा धमाल उडवून दिली होती.त्या विषयीचा सविस्तर खुलासा वाचून मजा वाटली. "माझी आई " हा लेख वाचून कोणाचेही मन द्रवेल इतका सुंदर आहे. ज्या दिवशी मी हा लेख वाचला त्यादिवशी आधुनिक जगाचा "मदर्स डे" होता हे विशेष. अत्र्यांनी आपल्या कौटुंबिक परिस्थितीचे ,कुटुंबातील सर्व माणसांचे म्हणजे आईवडील आजीआजोबा काकाकाकू ह्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यावेळची घराघरातून असणारी ओढग्रस्त आर्थिक स्थिती,तरीसुद्धा एकत्र कुटुंबातील आपलेपणा,जिव्हाळा आणि प्रेम आदर दिलखुलासपणे कथन केला आहे. "आई "च्या नावाने सार्वजनिक रित्या विविध मार्गांनी गळे काढण्याची सोय तेंव्हा नव्हती".मातृपितृ देव भव " ही भावना घराघरातून जपली जात असे.आतासारखे नाही,एवढे लिहिले म्हणजे पूर्ण कल्पना येईल ..
"माझा विलायतचा प्रवास " हे प्रवासवर्णन सविस्तर असून बोटीच्या प्रवासाचे रमणीय वर्णन अत्र्यांनी केले आहे.विलायतेला जाऊन B. A. B .T असलेले अत्रे T.D. मध्ये पहिल्या वर्गात सर्व प्रथम आले.. जपानला गेल्यावर त्यांच्यातला "संपादक"जागा झाला आणि" जपानचा वृतपत्र व्यवसाय" हा लेख लिहिला..अत्र्यांचे परम मित्र कै,कृ. पा.कुलकर्णी ह्यांच्यावरील "आमचे नाना "हा लेख फारच सुंदर आहे मृत्युलेख हा तर अत्र्यांचा हातखंडा होता".त्यांचे मृत्युलेख म्हणजे मराठी साहित्याचे वृत्तपत्र व्यवसायाचे शिलालेख आहेत". असे उद्गार अनेक मान्यवर व्यक्तींनी काढलेले आहेत.म्हणून अत्रे विनोदाने नेहमी म्हणत "मरायचे असेल तर आधी माझ्याकडून लेख लिहून घ्या अन मगच मरा."राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,देवमाणूस -बाबुराव सापळे,माजी केंद्रीय कृषी मंत्री ह्यांच्या वरील "कर्मवीर पंजाबराव ",नाशिकचे श्री गजानन महाराज असे अनेक मृत्युलेख ह्या पुस्तकामध्ये आहेत. पण मला सगळ्यात आवडला तो मृत्युलेख "कै.गोपालकृष्ण भोबे -एक
प्रपाती आणि प्रतापी जीवन " एक थोर कलावंत संगीतकार आणि नाटककार भोबे ह्यांच्या वरील लेखात अत्रेसाहेबांनी आपली खास आत्रेय शैली त्यात ओतली आहे. ज्या वाक्याने ह्या लेखाचा शेवट केला आहे ते वाक्य म्हणजे ";शिव शक्ती" च्या पाय-यावर त्यांच्या सुमधुर तानांची ती सुगंधी सुमने फिरून कधीच सांडलेली दिसणार नाहीत." वाहवा......".ईश्वर कुठे आहे?" आणि "स्त्री " ह्या दोन लेखामध्येही आत्रेय शैली वाचायला मिळते.थोडक्यात नाट्य,काव्य.साहित्य ,चित्रपट ,राजकारण समाजकारण,विनोद वृत्तपत्र अशा अनेक विषयावरील गेल्या ८०/ ९० वर्षातील लेख ह्या पुस्तकामध्ये समाविष्ट केल्याने ते वाचताना वाचकांना नक्कीच आनंद होईल आता शेवटी अत्र्यांच्या धारदार लेखणीची करामत पहा.
"स्त्री "स्त्री
ब्रम्हदेवाने आरंभी अचेतन सृष्टी निर्माण केली.नंतर प्राणीसृष्टी निर्माण केली.मग मानव निर्मितीचे काम त्याने हाती घेतले आधी त्याने पुरुष तयार केला.मग तो स्त्री निर्माण करण्याच्या कामाकडे वळला .अचेतन आणि प्राणिसृष्टीतील पुढील गोष्टी त्याने जमा केल्या.
चंद्राचा वाटोळेपणा, वेलींचा वळणदारपण/,त्यांच्या अंकुरांची आलिंगनवृत्ती,तृणांचा कंप, कमळदेठांचा नाजुकपणा ,पुष्पांची प्रफुल्लता,पर्णांची तरलता,सूर्य किरणांची आनंदी तेजस्विता वा-याची चंचलता,मेघांची सजलता, हरणांचे कटाक्ष ,हत्तीची मंदगति, मोरांचा गर्व,पोपटांचे वक्षमार्दव, सशाची भीरुता ,वाघांची क्रूरता ,रत्नांची तेजस्वी कठोरता,अग्नीची दाहकता,बर्फाची अतिशीतलता,
चिमण्यांची किलबिल , पारव्यांचा घुमकार,बगळ्यांचे ढोंग आणि बदकांची निष्ठा ह्या सर्व गोष्टी एकत्र करून ब्रम्हदेवाने स्त्री निर्माण केली आणि पुरुषाला देऊन टाकली.
ईश्वर कुठे आहे ?
.
प्रत्येक फुलामध्ये ईश्वर असतो.त्याच्या हास्यामधून तो हसत असतो.त्याच्या सुगंधामधून तो निश्वास सोडीत असतो फुलपाखरांच्या कोमल पंखावरील रंगीबेरंगी ठिपक्या मधून तो विहरत असतो आभाळात भरा-या मारणा-या पाखरांबरोबर तो भरा-या मारीत असतो.गवताच्या पात्यावर चमकणा-या दवबिंदूमध्ये तो चमकत असतो.रानावनातून खळखळना-या झ-यामधून तो खिदळत असतो.झाडांच्या पानामधून आणि शेतांच्या पिकामधून सळसळना-या वा-यामधून तो विहरत असतो.डोंगरांच्या कड्यावरून आदळना-या धबधब्यामधून तो उड्या मारीत असतो..समुद्राच्या फेसाळना-या लाटांवर तो झोके घेत असतो.जगात जेथे जेथे सौंदर्य आहे ,सुगंध आहे ,प्रकाश आहे ,संगीत आहे स्वातंत्र्य आहे,आनंद आहे तेथे तेथे परमेश्वर आहेच आहे.
शुभप्रभात :दि.१६ मे २०१५ *********************$$$$$$$$$$$$******************

3 comments:

  1. अत्रे प्रेमी मराठी वाचकाने वाचलेच पाहिजे असे काही लेख

    ReplyDelete