Saturday, July 11, 2015

ती काळरात्र ! पानशेत श्राद्धदिन ,,,,,१२ जुलै

ती काळरात्र !
पानशेत श्राद्धदिन ....१२ जुलै
...
१२ जुलै १९६१ ....धो धो धो अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्री पुण्याजवळील पानशेत धरण फुटले.अजूनही "ती काळरात्र " अनेकजण विसरले नाहीत.संपूर्ण महाराष्ट्राला आणि पुण्याला हादरवणारी ही दुर्घटना होती. मी त्यावेळी पेण येथे इयत्ता ९वीत शिकत होतो. तसा आमचा ह्या घटनेशी संबंध आला नव्हता पण रोजच्या वर्तमानपत्रातून पुण्यातील भयाण स्थितीचे वर्णन वाचून हादरलो होतो.पानशेत धरण फुटीवर गेल्या ५५ वर्षात अनेकजणांनी अनेकप्रकारे लिहिले आहे.पण आचार्य प्र.के.अत्रे ह्या अस्सल पुणेकराने आपल्या घणाघाती "दैनिक मराठा "मध्ये "ती काळरात्र "हा अग्रलेख लिहिला होता त्याची झलक माझ्या फेस् बुक मित्रांना दाखविण्याचा मला मोह होतोय. आवड असेल तर सवड काढून वाचाच.
ती काळरात्र " ती रात्र म्हणजे सूर्याचा डोळा मिटल्यावर चांदण्यांच्या टिकल्या लावलेला आकाशाचा निळा रेशमी शालू नेसून इवल्या पावलांनी येणारी,पृथ्वीच्या शय्येवर हलकेच पसरणारी आणि सूर्याने क्षितिजाच्या दुलईतून डोके बाहेर काढण्याच्या आतच सरकन पसार होणारी नेहमीची लाजरी-बुजरी अबोल रात्र नव्हती. ती काळरात्र होती ! दाट काळजाच्या महासागरापेक्षाही काळ्याकुट्ट काळोखाच्या खोल तळी सारी सृष्टी बुडाली होती.पिसाटलेला वादळवारा मदोन्मत्त ऐरावतांच्या मोकाट कळपाप्रमाणे सार्या चराचराला धडका देत होता, रोरावत होता,पर्वतावरील किर्र अरण्यामधली झाडेझुडे त्या वा-याच्या भेसूर संगीताच्या तालावर डहाल्या - पानांच्या झिंज्या आसडीत नि बुंधे घुसळीत पिशाछाप्रमाणे पिंगा घालीत होती.त्या डोंगर-रानामधले सजीव तेवढे सारे भयाने चैतन्यहीन झाले होते नि निर्जीव तेवढे सारे एका सैतानी चैतन्याने झपाटून थयथयत होते. त्या विराट थाईमानातच,जणू सर्व मेघमंडलामधले पाणी रिचवून फोफावलेली मुठा नदी फुस्कारत नि गर्जत,सुसाट धावत सुटली होती.
प्रत्येक पावसाळ्यामध्ये तिला चढनार्या या तांडवमदाला आजवर केवळ निसर्गानियमाचीच काय ती मर्यादा होती.पण आता मात्र क्षुद्र मानवी प्राणी तिला निर्बंध घालण्याचे धारिष्ट्य करायला पुढे सरसावला होता.त्याने तिच्या वाटेत एक बांध आडवा घालून तिला बंदिवान करण्याचा धाडसी प्रयत्न केला होता,त्यातून तो बांध जर सह्याद्रीच्या वज्रतुल्य पाषाणाचा अथवा त्याहूनही सबळ अशा कांक्रीटचा असता तर त्याचे स्वामित्व स्वीकारण्यात त्या नदीला कमीपणा वाटला नसता,खडकवासला येथे खडकाच्या चिरेबंद बंधाऱ्याच्या पायाशी नव्हती का ती नदी वर्षानुवर्षे निमुटपणे लोळण घेत?पण हा पानशेतचा नवा बंधारा मातीचा होता .य:कश्चित माती ! पाण्याच्या स्पर्शासरशी विरघळून विरून जाणारी दुबळी माती ! ज्या मातीचा गाळ ती नदी सहज कोठल्या कोठे वाहावत नेई ती क्षुद्र माती !"
ह्या निमित्ताने ह्या बलदंड मराठी साहित्यिकाचा अलंकारीक आणि प्रासादिक भाषेचा महापूर वाचकांना अनुभवायला मिळावा म्हणून माझा "याच साठी केला अट्टहास "होता. तो सफल जाहला.
शुभप्रभात दि.११ जुलै २०१५ @@@@@@@@@@@@@@&&&&&&&&&&&&&&&

1 comment:

  1. पानशेत धरण कोठलाही मराठी माणूस विसरणार नाही

    ReplyDelete