Friday, April 24, 2015

तळजाई पठारावर" आमचे हळदीकुंकू"
whats app वर असलेल्या sbi family group मधील आमच्या एका मित्राने एक मुद्दा उपस्थित केला की चैत्र महिन्यात नेहमी स्त्रियांचे हळदीकुंकू साजरे होते त्यावेळी आंब्याची डाळ, हरभर्याची उसळ आणि पन्हे वगैरे असते मग आपल्या ग्रुपमधील सर्वांनी एक दिवस एकत्र जमून अशी मजा का करू नये ?थोडक्यात पुरुषांचे हळदीकुंकू का नको ?नाहीतर एरव्ही .पुरुषांना बुक्काच लावतात.महत्वाचे म्हणजे ह्या कडक वातावरणात काहीतरी आंबट गोड खावे मोकळ्या आणि थंड हवेत गप्पाटप्पा कराव्यात हसावे खिदलावे हाच उद्देश होता.हा प्रस्ताव मांडल्यावर अनेकांनी बाहेरून पाठिंबा न देता सक्रीय पाठिंबा आणि मान्यता दर्शवली.त्या दृष्टीने वेळकाळ मुहूर्त काढून म्हणण्यापेक्षा ठरवून काल २३ एप्रिलला सायंकाळी गोरज मुहूर्तावर 5 ते 7 वेळेमध्ये आम्ही १५ जण ह्या खाद्य सोहोळ्याला तळजाई पठारावरील मंदिरात एकत्र जमलो.आजकाल घाईगडबडीच्या जीवनात एकावेळी अनेक माणसे जमणे हे दुर्मिळ होतंय खरं पण त्याला कोणाचाच काही इलाज नाही आणि त्याची.कारणमीमांसा, चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.
अनेक मंडळी वेगवेगळ्या ठिकाणाहून दुचाकी/ चारचाकी वरून /मधून आली होती.मी पूर्वी सहकारनगर मध्ये रहात असल्याने तळजाई मंदिर आणि तिथला परिसर मला चांगला सुपरिचित होता.सर्व ऋतूत सकाळची माझी प्रभात फेरी तळजाईच्या रम्य हवेशीर आणि प्रसन्न वातावरणात होत असे.पण गेल्या १५ वर्षात मात्र ह्या आनंदाला मी पारखा झालो होतो.मुंबईची बदली आणि आता कोथरूडला कुटुंबकबिला हलविल्याने तळजाई पठाराला मुकलो एवढे खरे.पण ह्या मेळाव्यामुळे दुर्मिळ आनंद पुन्हा मिळाला.१५ वर्षात मला खूपच क्रांती झालेली दिसली. मोठे आणि स्वच्छ रस्ते,रस्त्याच्या दुतर्फा विजेचे दिवे,वाटेत नागरिकांना विश्रांती घेण्यासाठी बांधलेले काळ्या दगडाचे कट्टे,सूचना फलक आकर्षक प्यागोडा, प्रशस्थ पदपथ असे बरेच काही पाहून मी भारावलो.काही वर्षापूर्वी दगडधोंडे खाचखळगे काटेकुटे चुकवीत मी पुढे पाऊले टाकत तळजाई मंदिर गाठत असे.मोजकीच मंडळी (त्यांच्या आवडत्या मोत्यासकट)भेटत.एकादीच स्कूटर किंवा मोटारगाडी डोंगरावर पाहायला मिळे.नवरात्रात मात्र बरेच पुणेकर न चुकता तळजाईच्या दर्शनाला आवर्जून येत.तेंव्हाच काय ती गर्दी अशी दिसे नाहीतर तसा एरव्ही शुकशुकाटच असे.पण आज स्कुटरवरून येताना मला मलेशियातील कौलालम्पूर येथील GENTING आयलंड चीच आठवण झाली.थोडक्यात काय सारे काही चकाचक दिसते आहे.ह्याचा आनंद घेत घेत भूतकाळही आठवायचा.हे आमचे नेहमीचे धोरण असते.
मंदिराच्या परिसरात एका झाडाखाली कट्ट्यावर आम्ही बसलो होतो.सगळेच निवृत्त असल्याने मनमोकळे दिलखुलास वातावरण होते,बँकेच्या नोकरीत असताना सर्वांच्या नावापुढे असलेल्या स्केलच्या पट्ट्या/स्टंप म्हणजे scale I/II/III खाली पडल्या असल्याने सर्वजण मुक्त वातावरणात मन की बात करत होते.चेष्टामस्करी. गप्पाटप्पा .फिरक्या आणि टिंगल टवाळी,हसणे ह्यावर कोणतेच निर्बंध नव्हते.अनेकांनी "मी असताना ........माझ्या वेळी ...".हे धृवपद गात गात डोहात उडी मारलीच.जणू काही अजूनहि आपण चाकरीतच आहोत.पण वेळेच्या बंधनामुळे सर्वांनाच आवरते घ्यावे लागले. आजच्या मेळाव्याचा मुख्य कार्यक्रम म्हणजे आंबेडाळ खायची हा आता सुरु झाला.आमचे सहकारीमित्र सर्वश्री हेमंत नवरे आणि प्रकाश महाबळेश्वरकर ह्यांनी मेळाव्याची खानपान सेवा समर्थपणे सांभाळली (खरतर दोघांच्याही सौभाग्यावतीनीच आपले पाककौशल्य
पणाला लावले होते.)श्री नवरे ह्यांनी आंबेडाळ आणि रव्याचे लाडू आणले होते तर प्रकाशाने मस्त खुसखुशीत चकली आणली होती.दोघांच्याही "स्वयंपाकघरातून "येताना रिकामेच डबे आणा अशी सक्त ताकीद मिळाली होती.आणि हे सर्वांना कळल्यामुळेच तमाम मंडळी डब्यावर तुटून पडली.एकावर एकच काय पण खाईल किंवा जाईल तेवढे फ्री होते.सर्वजण बेहद्द खुश झाले.सर्वश्री आणि सौ. नवरे /महाबळेश्वरकर ह्यांना सर्वांनी मनापासून धन्यवाद दिले आणि आगामी आकर्षणाची चर्चा करण्यासाठी ताराविरहित हॉटेलात चहा घ्यायला गेले.इकडे तिन्हीसांज जाणवू लागली होती
खाद्ययात्र संपल्यावर सर्वांनी एकमेकांचे निरोप घेतले.मी तळजाई देवीच्या मंदिरात जाऊन अनेक वर्षांनी देवीचे दर्शन घेतले.तेंव्हा तेथील पुजार्याने माझ्या भालप्रदेशावर कुंकुमतिलक लावला.अशा रीतीने" आमचे म्हणजे पुरुषांचे हळदीकुंकू" मोठ्या दिमाखात साजरे झाले. आमच्या ग्रुपचे admin श्री एसेम जोशी ह्यांनी मनावर हे घेऊन कार्य सिद्धीस नेले ह्याबद्दल सर्वांनी त्यानाही धन्यवाद दिले
शुभप्रभात दि.२४ एप्रिल २०१५ *****************************************************************
/

1 comment: