Tuesday, February 17, 2015

मुक्काम पोष्ट....सज्जनगड (सातारा )
जय जय रघुवीर समर्थ .....कल्याण करी रामराया ...रामराया
श्री समर्थ रामदास स्वामींच्या वरील काव्यपंक्ती ओठावर येताच डोळ्यासमोर समर्थांची पवित्र
मूर्ती उभी रहाते आणि लगेच मन सज्जनगडच्या मार्गाला लागते.वाटेत लागणारी उरमोडी नदी,परळी गाव,गाय मंदिर आणि समर्थ महाद्वार डोळ्यापुढे येते.सज्जनगड आणि अजिंक्यतारा म्हणजे सातारकरांची आदराची भक्तीची आणि अभिमानाची स्थाने आहेत.माझे बालपण/ शालेय जीवन सातारा येथे गेल्याने ह्या दोन्हीही स्थानामध्ये माझे मन गुंतले आहे पूर्वी आमच्या घरी कोणीही पाहुणा आला की तो सज्जनगडला जायचे म्हणायचा अवकाश की मी लगेच वाटाड्या म्हणून एका पायावर तयार होत असे.तेंव्हा ती एक दिवसाची आनंददायी सहल होत असे.त्यावेळी आतासारख्या सुखसोयी नव्हत्या.येष्टी (ST) गडाच्या पायथ्याशी असलेल्या परळी गावापार्यांतच
जात असे.पुढे एक/दोन करत करत पाय-या पर्यंत चालत जावे लागे. मग ७०० ते ८०० पाय-या चढून वर गेले म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे दर्शन व्हायचे.50 रुपयांच्या देणगीत आपल्या नावाची पायरी समर्थ भक्त बांधत.गड चढताना ती नावे वाचत जायचे आणि त्यात कोणी ओळखीचा निघाला म्हणजे छाती (उगीचच) फुगत असे.अधूनमधून विश्रांती घेत,घाम पुसत पुसत गाय मंदिर आले म्हणजे बहुतांश गड चढल्याचा आनंद होई.तेथूनच काही हौशी आणि धाडशी मंडळी प्रथम रामघळ पाहण्यास जात.मी एकदा रामघळ पाहण्याचा प्रयत्न केला खरा पण तो पहिला आणि शेवटचाच ठरला.महाद्वारातून आत गेले की मोठ्या आवाजात| ''जय जय रघुवीर समर्थ "अशी साद घालून आपण गडावर पोहोचल्याची सर्वांना वर्दी द्यायची.लहानसहान गोष्टीतही मोठा आनंद मिळत असे हे विशेष.
पुढे नोकरीच्या निमित्ताने सातारा सोडून बाहेर गावी गेल्यावर मात्र सज्जनगडची आमची सफर मागे पडली.पण २००६ मध्ये निवृत्त झाल्यानंतर दासनवमी उत्सवाला नियमितपणे येत आहे.आता गडाचे स्वरूप पूर्णपणे बदलेले आहे. निवासाची उत्तम सोय,मुबलक पाणी,भोजन प्रसाद,अगदी वरपर्यंत वाहन व्यवस्था अशा अनेक सुखसोयी तेथील व्यवस्थापनाने केल्या आहेत.त्यामुळे भक्तांची पूर्वीपेक्षा भरपूर गर्दी असते.नुकताच मी दासनवमी उत्सव साजरा करून आलोय.अजूनही डोके" समर्थमय "अवस्थेत आहे.पूर्वी समर्थ समाधीचे दर्शन दुरून घ्यावे लागे.पण आता माझे बंधुतुल्य ज्येष्ठ मित्र आणि श्री रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष श्री बाळासाहेब स्वामी ह्यांच्या कृपेने समर्थ समाधीचे दर्शन अगदी जवळून होते. दासनवमीला पहाटे तीन/ चार वाजता समर्थांच्या समाधीस पाणी घालण्याचे भाग्य मला अलीकडे मिळते|".ह्या "दिवशी सर्व दिवसभर समर्थमय वातावरण असते.भल्या पहाटे २ वाजता काकड आरती,४ वाजता श्री समर्थ समाधी पूजा,मग ६ वाजता सांप्रदायिक भिक्षा.नंतर आरती छबिना प्रदक्षिणा १२ वाजता पुराण श्री समर्थ निर्याणकथा आणि नंतर महाप्रसाद रात्री ९ वाजता कीर्तन,असा भरगच्च कार्यक्रम असतो.महाप्रसादामध्ये आमटीभात, भाजी आणि खीर असते पण त्याची चव इतकी सुंदर असते की अनेक भक्त मंडळी तृप्त होतात.नंतर दुस-या दिवशी माघ वद्य दशमीला सकाळी ६ ला आरती छबिना आणि ७.३० ला लळीतकीर्तन,ह्यावेळी सर्व समर्थवंशज स्वामी बंधू,अनेक समर्थभक्त ,सेवेकरी मोठा जल्लोष करतात..पुष्पहार फुले ,बुक्का आणि गुलाल ह्यांची उधळण होते समर्थांची भजने काव्ये गाणी इ.ताल् सुरात सर्वजण मोठ्या भक्तिभावाने तल्लीन होऊन म्हणत असतात.अनेक झांजांचा निनाद,ऐकून बरेच जण नाचू लागतात फुगड्या खेळतात."रामदास गुरु माझे आई,मजला ठाव द्यावा पायी " सुरु झाले की सारा मंडप बेहोष होतो.नंतर ह्या आनंददायी उत्सवाची,आनंदाच्या डोहाची सांगता होते.
दिनांक १५ ला सकाळी ६ ला माझी रम्य सुप्रभात सुरु झाली ती मनाचे श्लोक ह्याची सीडी ऐकत असतानाच.फारच श्रवणीय सुंदर आणि नादमधुर वातावरण होते ते.एरव्ही राम् प्रहरीच विविध प्रकारचे गाड्यांचे कर्णकर्कश्य हॉर्न्स ऐकू येतात त्यामुळे आजची सुरेल सकाळ कधीच विसरता येणार नाही.नंतर प्रभातफेरीसाठी मी धाब्याच्या मारुती मंदिराकडे गेलो.अहाहा......काय सुंदर आणि हवेशीर वातावरण होते."थंडगार वात सुटत......."ही ओळ आठवली.आजूबाजूला मोठे डोंगर समोर उरमोडी धरणाचा विस्तीर्ण जलाशय,पक्ष्यांचा चिवचिवाट.आणि जवळ क्यामेरा .आणखी काय पाहिजे?बरेच काही क्लिक केले.पूर्वी पडझड झालेले मारुती मंदिर आता फार देखणे आणि प्रशस्थ झाले आहे.तेथे अधिक वेळ थांबण्याचा मोह टाळून मी आमच्या बोकील घराण्याची अंगाई देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो.तेथे समर्थ एका कोप-यात कट्ट्यावर ध्यान धारणेसाठी बसत.मंदिराच्या बाहेरील बाजूस हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज मानाने फडफडत असतो.कड्यावर उभे राहून पुन्हा एकदा क्लिक क्लिक करून परळी खोरे ,भातखळे मोटार अड्डा , घरे आणि गुरे क्यामे-यात बंदिस्त केली.बाजारपेठेत फेरफटका मारून मठात नाश्ता केला आणि श्री समर्थ समाधीचे पुन्हा एकदा दर्शन घेऊन "जय जय रघुवीर समर्थ "म्हणत हळू हळू गड उतरू लागलो.
शुभप्रभात दिनांक १७ फेब्रुवारी २०१५

No comments:

Post a Comment