Tuesday, February 3, 2015

स्मरण भारतरत्न स्वर भास्कराचे
पंडित भीमसेन जोशी जयंती
दिनांक ४ फेब्रुवारी ही तारीख जवळ येऊ लागली की माझ्या डोक्यात तानपुरे झंकारू लागतात.पहाडी ताना कोसळत असल्याचा भास होतो आणि डोळ्यासमोर व्यासपीठावर संगीताचे बादशाह पंडित भीमसेन जोशी ह्यांची धीरगंभीर आवाजातील मूर्ती डोळ्यासमोर येते.आज अण्णांचा वाढदिवस असतो.तिथीने वाढदिवस रथसप्तमिलाच असतो पण दुनिया ४ फेब्रुवारीलाच आनंदोत्सव साजरा करते. माझी दोन दैवते एक साहित्यामध्ये आचार्य अत्रे आणि संगीतामध्ये पंडित भीमसेन जोशी. गेली पाच तपे तरी ह्या दोन्ही दैवतांमुळे माझे जीवन सुरेल आणि सुगंधीत झाले आहे. आज ह्या जगात ही प्रचंड व्यक्तिमत्वे हयात नाहीत पण त्यांचे अफाट आणि अचाट कर्तृत्व मात्र कोणीही विसरू शकणार नाही.वास्तविक अण्णांच्या असंख्य चाहत्यापैकीच मी एक सर्वसामान्य रसिक माणूस.त्यांच्या सांगीतिक कर्तबगारीबद्दल मी काय वेगळे सांगणार किंवा लिहिणार?तरीपण भक्तिभावाने स्मृतींची ओंजळ आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या चरणी अर्पण करीत आहे.
१९५५/५६ साली सातारा येथे मी विद्यार्थीदशेत असताना "आनंद" चित्रपटगृहात "वसंतबहार "हा शास्त्रीय संगीतावर आधारलेला चित्रपट पाहिला होता.ह्या चित्रपटामध्ये पंडितजी आणि गायक मन्नाडे ह्यांची जुगलबंदी चांगलीच गाजली होती.त्यावेळी मी प्रथम "भीमसेन जोशी "हे नाव ऐकले.नंतर पुढे "गुळाचा गणपती "ह्या सबकुछ पु.ल.चित्रपटातील "इंद्रायणी काठी देवाची आळंदी "हा विलक्षण लोकप्रिय अभंग भीमसेन जोशीनीच गायला आहे हे कळल्यावर मी ह्या थोर गायकाचा भक्त,चहाता बनलो.थोडक्यात "वसंतबहार आणि इंद्रायणी काठी म्हणजेच भीमसेन जोशी होय "हे समीकरण माझ्या अंत:करणामध्ये गेली ५०/६० वर्षे घट्टपणे रुजले आहे.
१९७२ पासून तर मी पंडितजींच्या अनेक मैफिली ऐकत आलो आहे."मारुबिहाग "ह्या माझ्या आवडत्या रागातील त्यांनी गायलेली "रसिया हो ना जा " ह्या लोकप्रिय बंदिशीने मला चांगलेच मोहित केले होते,ह्याच सुमारास अण्णांना भारत सरकारने प्रथम "पद्मश्री "पुरस्कार दिल्याने सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संगीतप्रेमी सातारकरांनी श्रीमंत सुमित्राराजे भोसले राणीसाहेबांच्या अध्यक्षतेखाली पंडितजींचा भव्य सत्कार आयोजित केला होता.मी भीमसेनी जादूने झपाटलो गेल्याने आवर्जून ह्या समारंभाला हजर होतो.सत्कारानंतर त्यांची सुरेल मैफल झाली.त्यांच्या मैफलीचा पहिला आनंद मी त्यावेळी घेतला आणि नंतर त्यांच्या कितीतरी मैफली मी कानात साठवून ठेवल्या.त्यांची मैफल म्हणजे सुखद आनंदाचा डोहच असायचा..सातारच्या आसपास कोरेगाव,औंध ,कराड आणि मिरज कोल्हापूर येथेही आम्ही त्यांचे गायन ऐकण्यासाठी आवर्जून गेलो होतो.पण १९७४ पासून सवाई गंधर्व संगीत महोत्सवातील त्यांचे गायन ऐकून तृप्त झालो.ह्या सुरेल यज्ञाची सांगता अण्णांच्या धारदार अभंग आणि भैरवीने होत असे. असंख्य श्रोते देहभान विसरून तल्लीन होत.विशेष म्हणजे खास भीमसेनजींचे गायन ऐकण्यासाठी संपूर्ण मंडप तुडुंब भरलेला असे.कितीतरी आठवणी मनात गर्दी करताहेत.कितीही लिहिले आणि सांगितले तरी कमीच आहे.
सवाई गंधर्व महोत्सव संपल्यानंतर कित्येकजण पंडितजींना भेटत,दिलखुलास गप्पा मारत ग्रीन रूम मध्ये गद्य मैफल सुरु होई चहापान,पानसुपारीचे तबक मोकळे होई अण्णा मोजकेच पण काहीतरी खुसखुशीत बोलत.हास्यविनोद करत..मित्रमंडळी खुश व्हायची आणि हे सर्व विलोभनीय
दृश्य एका कोप-यात उभे राहून मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवत असे. आणि स्वत: आनंदी समाधानी होत असे. पुढे १९९१ पासून पुण्यात आल्यापासून पंडितजींना अनेकवेळा .भेटत होतो.त्यांच्या "कलाश्री " बंगल्यावरसुद्धा जाण्याचा योग यायचा .वाढदिवसानिमित्त म्हणा . त्यांना पद्मभूषण,पद्मविभूषण आणि भारतरत्न मिळाल्यावर हारतुरे घेउन येणा-यांची मोठी रांग लागायची आणि त्याच रांगेत माझ्यासारखे असंख्यजण असत. अण्णा प्रत्येक माणसाशी काहीतरी सुखद गप्पा मारून त्याचे तोंड गोड करीत. अशा अनेक आनंद्सोहळ्याचा मी साक्षीदार आहे हे माझे परमभाग्यच म्हणायचे. नाही का ?
आता राहिल्यात फक्त सुखद स्मृती.येथून पुढे त्याच स्मृती अण्णांच्या रूपाने माझ्या हृदयामध्ये
राहणार आहेत. पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन मला दरवर्षी घ्यायला जमले नाही तरी भारतीय शास्त्रीय संगीताच्या पंढरीतील पंडित भीमसेन जोशी ह्या विठ्ठलाचे मोहक आणि लोभस दर्शन मी दरवर्षी घेतले हेही भाग्यच आहे असे वाटते.भारतरत्न स्वरभास्करा तुला माझे विनम्र अभिवादन.
शुभप्रभात :४ फेब्रुवारी २०१५

No comments:

Post a Comment