Tuesday, December 29, 2015

मंतरलेल्या चैत्रबनातील एक संध्याकाळ .....मंत्रमुग्ध करणारी

"मंतरलेल्या चैत्रबनातील एक संध्याकाळ "
मंत्रमुग्ध करणारी .....
तसं पाहिलं तर 'ती 'एक नेहमीसारखीच रविवारची संध्याकाळ होती. विशेष असं काहीच घडणार नव्हत.तरीपण स्मरणरंजनात नेहमीच गुरफटलेला पुणेकर मराठी माणूस मात्र भलताच खुश दिसत होता त्या दिवशी. काय कारण असावे? दिनांक २० ला सायंकाळी पुण्याच्या भरत नाट्यमंदिरात "मंतरलेल्या चैत्रबनात" ह्या अत्यंत लोकप्रिय संगीत कार्यक्रमाचा चार दशकपूर्ती सोहोळा मोठ्या दिमाखाने साजरा होणार होता.म्हणून अनेक रसिक त्या दिवशीच्या संध्याकाळची अत्यंत आतुरतेने वाट पहात होते. चाळीस वर्षापूर्वी ह्याच "भरत नाट्य मंदिरात" ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ अनेक मान्यवर दिग्गजांच्या उपस्थितीने साजरा झाला होता.त्याला मानाचा मुजरा करण्यासाठी हा सारा प्रपंच मांडला होता.
पण चाळीस वर्षात मी ह्या कार्यक्रमाच्या फक्त जाहिराती,त्या विषयी आलेले विविध लेख,
वृत्तपत्रीय बातम्या एवढेच वाचले होते.पण प्रत्यक्षात श्रवणाचा आनंद मात्र कधीच घ्यायला मिळाला नाही.काहीतरी अडचण असेच.नोकरीच्या निमित्ताने बरीच वर्षे पुण्याबाहेर असल्याने
हे काम राहून गेले खरे. म्हणून काही(हि ) झाले तरी आज हा कार्यक्रम पहायचाच असे ठरवून दुपारी साडेतीनलाच "भरत"ला जाऊन थडकलो. advance bookingच्या भानगडीत न पडल्याने गेल्यावर हौशी पुणेकर मंडळींची तुफान गर्दी मात्र पहायला मिळाली आणि
"HOUSEFUL' च्या बोर्डाला मोठा हार घातलेला पाहण्याची वेळ आली. तरीही नेहमीप्रमाणे
खिंड लढवायचीच ह्या इराद्याने इकडेतिकडे जाऊन मी एकाच तिकिटाचा वास घेऊ लागलो.
अनेकांच्या केविलवाण्या नकारानंतर कोणा एका काकुनी मला त्यांनी विकत घेतलेल्या किमतीलाच ते अखंड तिकीट मला दिले म्हणजे विकले.ह्या आर्थिक व्यवहारानंतर
आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर जे काही समाधान आणि आनंद पसरला त्याचे वर्णन काय करावे महाराजा ? ह्या आनंदाप्रीत्यर्थ मी लगेच एक "कटिंग "ची ऑर्डर दिली.नंतर थिएटरमध्ये गेलो.
कार्यक्रम विनामूल्य नसला तरीहि हौसफुल होता हे विशेष. फरक इतकाच होता चाळीस
वर्षापूर्वी तिकिटांचे दर रुपये 5, 3 , 2 असे जे होते त्या प्रत्येक अंकापुढे आज दोन शून्ये विराजमान झाली होती.तिसरी घंटा झाली आणि पडदा वर गेल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला.सुरवातीलाच संयोजकांचे भावस्पर्शी मनोगत झाल्यावर गेल्या चाळीस वर्षांचा आढावा
घेणारी एक दृकश्राव्य फिल्म रसिकांनी पाहिली.तेंव्हाही अनेकजण भारून गेले होते.
नंतर मात्र अवीट गीतांची बरसात सुरु झाली अन त्यात संपूर्ण भरत नाट्य मंदिर अक्षरश: न्हाऊन निघाले."प्रभात समयो पातला " ह्या गीताने सुरवात झाली ह्या कार्यक्रमात संगीताचे /
गीतांचे सर्व प्रकार होते. अभंग,लावणी,प्रेमगीत,विरह गीत,चित्र गीत,द्वंद्वगीत, बालगीत सारे काही होते. लाखाची गोष्ट,सुवासिनी,जगाच्या पाठीवर, पुढचं पाऊल,वरदक्षिणा अशा गाजलेल्या चित्रपटातील गीते होती. सबकुछ पु.लं.च्या."गुळाच्या गणपती "मधील पंडित
भीम सेन जोशींनी गायलेला "इंद्रायणी काठी ", सीता स्वयंवर मधील "रम्य ही स्वर्गाहुनी लंका "
त्याप्रमाणे "नाच रे मोरा ...." माणिक वर्मांनी लोकप्रिय केलेल्या "जाळीमंदी पिकली करवंद","
लावणी ,"कौसल्येचा राम बाई " 'सावळाच रंग ...."हे गीते होती.गदिमांनी आणि बाबुजींनी केलेली असंख्य गाणी मराठी माणूस आज साठ सत्तर वर्षे झाली गुणगुणतोय ते काही उगाच नाही.असं म्हणतात की राजाभाऊ परांजपे,गदिमा आणि बाबूजी हे त्रिकुट म्हणजेच "लाखाची गोष्ट"होती. "बुगडी माझी सांडली ग ....."ह्या लावणीच्या आरंभी जी ढोलकी वाजविली गेली ती ऐकून श्रोते अगदी बेभान झाले. सर्वच गायक कलाकार पट्टीचे होते.संगीत् संचहि सर्वांची दाद घेत होता. निवेदक् खास भाषाशैलीचा वापर करून कार्यक्रमात खुसखुशीतपणा आणत होता.
सर्व कलाकारांचे,मान्यवरांचे सत्कार झाले.शेवटी घड्याळाकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते.
सर्व स्त्री पुरुष गायकांनी रंगमंचावर एकत्र येऊन "वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम " हे गीत
गाऊन ह्या संपूच नये असे वाटणाऱ्या मैफलीचा समारोप केला.तमाम श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत मनसोक्त दाद दिली आणि पडदा खाली पडला.मी एका वेगळ्याच
मूडमध्ये आनंदाने,समाधानाने घरी परतलो.
शुभप्रभात.....दि.३० डिसेंबर २०१५

1 comment:

  1. खरोखरच मंत्रमुग्ध करणारी ठरली ती संध्याकाळ.

    ReplyDelete