Sunday, December 14, 2014

दिसामाजी काहीतरी ते :
चाळीशी....माझ्या 'सवाई' स्वरयात्रेची
१९७४ ते २०१४
दरवर्षी डिसेंबर महिना सुरु झाला की संगीतप्रेमी जनतेमध्ये ' सवाई 'चे वारे सुसाट वाहू लागतात.गेली 40 वर्षे मी पण ह्या स्वरमयी वादळात यथेच्छ झोडपलो गेलो आहे. आचार्य अत्रे हे माझे साहित्य क्षेत्रातील जसे दैवत आहे तसेच पंडित भीमसेन जोशी हे पण माझे संगीत प्रांतातले दुसरे बलाढ्य दैवत आहे.त्यांच्या वरील प्रेम आदर आणि भक्तीमुळेच मी न चुकता सवाई गंधर्व संगीत महोत्सवास नियमितपणे हजेरी लावत आलो आहे.५० / ६० वर्षापूर्वी अण्णांच्या 'इंद्रायणी काठी ..'ह्या अभंगाने आणि मारुबिहाग मधील 'रसिया हो ना' ह्या बंदिशीने मी मंत्रमुग्ध झालो होतो. मी लहानपणीच 'ह्या ' संगीत महोत्सवाबद्दल बरेच ऐकले होते पण त्यासाठी पुण्याला येणे आवश्यक होते.आणि हा योग १९७४ साली आला नव्हे मी आणलाच.तेंव्हापासून ह्या सुरेल महोत्सवाच्या अनेक मनोरंजक सुखदायक आठवणी मनाच्या सेफ डीपोझीट लॉकरमध्ये जतन करून ठेवल्या आहेत.नुकत्याच सुरु झालेल्या ह्या कार्यक्रमाला दुस-या दिवशी मी गेलो खरा पण चिखल तुडवत परतलो आणि घरी डोक्यात 'सवाई ची ४० वर्षे' ह्या आठवणीं उफाळून आल्या.
१९७४ साली पहिल्यांदाच मी रेणुका मेमोरियल शाळेत एका मोठ्या रांगेत उभा राहिलो.बापरे गाण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा 'क्यू' लावतात हे सगळे नवीन होते.माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळी भारतीय बैठकीचे सिझन तिकीट एका डीजीटमध्ये म्हणजे रुपये आठ फक्त होते.हे अगदी खर्र आहे आणि .एक रकमी मी खरीदले होते.प्रवेशद्वाराशीच रसिकांचे स्वागत यंत्राद्वारे गुलाबपाण्याचे फवारे उडवून केले जात होते.अहाहा :मंडपात गेल्यागेल्याच सुगंध दरवळा.लगेच स्वयंसेवकांनी प्रत्येकाला एक स्मरणिका अदा केली.मग अनेक परिचित मंडळी,हौशे नौशे,गवय्ये आणि खवय्येसुद्धा भेटले.नेहमीच्या रीतीरिवाजानुसार सनईचे मंजुळ सूर घुमू लागले.कार्यक्रम सुरु झाल्याची ती निशाणीच होती.मी मात्र अलीबाबाच्या गुहेत गेल्यासारखे वावरत होतो.कारण सगळच नवनवीन आनंददायक आणि आल्हाददायक होते.हे पाहू का ते पाहू आणि हे ऐकायचे का ते ऐकायचे अशी अवस्था होती.तेंव्हा हा कार्यक्रम जरी रात्री ९.३० ला सुरु होत असे तरी तो दुस-या दिवशी बरेचदा सूर्योदयानंतर संपे. आणि तिस-या म्हणजे शेवटच्या दिवशी तर कहर होत असे.पंडितजींची भैरवी झाल्याशिवाय आणि ती ऐकल्याशिवाय रसिकांना तृप्त झाल्यासारखे वाटत नसे.रात्रभर कडाक्याच्या थंडीतही कपाटातील सर्व थंडीचे खास कपडे घालून अनेक मंडळी येत आणि संगीतामध्ये तल्लीन/ रममाण होत.हे पाहिले आणि अनुभवलेसुद्धा.
ह्या कार्यक्रमामुळे मी अनेक जागतिक कीर्तीच्या कलावंताना पाहिले आणि ऐकले.हा सर्वात मोठा आनंद आयुष्यात मिळाला.मी( एकेकाळी) तबल्याचा विद्यार्थी होतो त्यामुळे उस्ताद अल्लारखा,पंडित सामताप्रसाद ,झाकीर हुसेन,कुमार बोस ,सपन चौधरी नामधारी,लतीफ अहमद शफात अहमद अशा नामवंत तबलीयांच्या हातातील जादू अनुभवता आली.अनेक थोर शास्त्रीय संगीत गायक वादक नृत्यकार ह्यांची कला पाहिली.श्रोत्यांची दाद मनापासून आणि देहभान विसरून असे हे पण मोठ्या उत्साहाने आणि कौतुकाने मी अनुभवले. भव्य मंडपातील स्वर यज्ञाप्रमाणेच मागील बाजूस मोठी खाद्य यात्रा नेहमी भरते.तेथे गवय्ये आणि खवय्ये ह्यांची जुगलबंदी पाहायला मिळते.तृप्त कानाप्रमाणेच तृप्तीचा ढेकर देईपर्यंत सर्व काही मिळते.जिभेचे लाड पुरवायला कोणीही मागेपुढे पाहत नाही.गाणारे कोण आणि खाणारे कोण हेच कळत नाही. भाजणीच्या थालीपीठपासून ते उकडीच्या मोदकापर्यंत आणि सोल कढीपासून ते मसाला दुधापर्यंत सर्व मिळते'.काही नाही ' हा शब्दच नाही.बरेचजण वनभोजनाला आल्याप्रमाणे ह्या खाद्ययात्रेचा आनंद घेतात.मी पण त्याला अपवाद नाही.तीन दिवस मौज मस्ती आणि मजा असते.
पूर्वी कार्यक्रम सुरु असतानाच मध्यरात्री दुस-या दिवशीचे ताजे वृत्तपत्र येई आणि कित्येक लोक श्रवण आणि वाचन हा आपला कार्यक्रम तेथेच उरकत.असत.काही सुखदुखाच्या बातम्या कळत.अभिनेत्री स्मिता पाटील हिच्या निधनाचे वृत्त,विमान अपघात झाल्यावरही तत्कालीन पंतप्रधान श्री मोरारजीभाई देसाई एका शेतातून पायी पायी गेले ह्या बातम्या मी मंडपातच प्रथम वाचल्या होत्या,एका वर्षी पाऊस खूप झाल्याने एका कार्यालयातून पाट आणून कार्यक्रम पार पाडला तर एकदा बराच वेळ दिवस समजून रात्रीच लाईट गेले तरीपण श्रोत्यांनी जराही विचलित न होता तल्लीनतेने व्हायोलीन महिला कलाकाराचे 'नरवर कृष्णासमान' हे नाट्यगीत ऐकले.अशा कितीतरी आठवणी आहेत पण वेळ आणि जागा ह्यांचे व्यस्त प्रमाण आहे.
कार्यक्रमाची सांगता तिस-या दिवशी होई.आभारप्रदर्शन झाले की पंडित भीमसेन जोशी पांढ-या शुभ्र वस्त्रात आणि खांद्यावर लाल रंगाची नक्षीदार शाल घेत व्यासपीठावर येत.त्याच वेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडट ऐकू येई.मग भीमसेनजी कधी राग तोडी तर कधी रामकली ,ललत आळवून अभंग किंवा एकादे कानडी भजन भक्तीगीत गात आणि शेवटी भैरवी म्हणत.पुन्हा एकदा टाळ्यांची त्सुनामी अनुभवायला मिळे. क्षणार्धात शांतता पसरे आणि श्रोते उभे राहून सवाई गंधर्व ह्यांच्या मधुर आवाजातील किराणा घराण्याची अत्यंत लोक् प्रिय भैरवी भक्तिभावाने ऐकत.आणि तीनचार दिवस साठवलेले आनंदाश्रू पुसत पुसतच मंडपाबाहेर जात.
शुभप्रभात ......दिनांक १४ डिसेंबर२०१४

Friday, October 17, 2014

दिसामाजी काहीतरी ते :-
'अशी'... होती रे माझी आई ......
१९६० साली "एक धागा सुखाचा " हा कौटुंबिक मराठी चित्रपट अनेकांना वेड लावून गेला.विशेषतः त्यातील गाणी फारच लोकप्रिय होती.आज मला प्रकर्षाने आठवणारे त्यातील एक ...
गाणे म्हणजे "ठाऊक नाही मज काही/ ठाऊक आहे का तुज काही कशी होती रे माझी आई ?"
अर्ध शतकानंतरही हे गाणे आठवण्याचे कारण म्हणजे २२ सेप्टेम्बर २०१४ च्या कोल्हापूर येथून प्रसिद्ध होणा-या "दै.महाराष्ट्र टाइम्स"मध्ये श्रीमती जयश्री उ.कुलकर्णी (म्हणजे ज्योती पारुंडेकर)
ह्या आमच्या सातारच्या शेजारणीने/नव्हे आईच्या भाचीने "प्रेमळ इन्ना मावशी "नावाचा एक सुंदर आठवणीवजा लेख लिहिला आहे.हा लेख वाचत असताना माझे मन ४० / ५० वर्षापूर्वीच्या सातारच्या यादोगोपाळ पेठेतील अनेक वाड्यातून आणि रस्त्यातून सैरावैरा धावू लागले.प्रत्येकाला आपली आई प्रिय असतेच.तरीपण आपल्या आईबद्दल दुस-या कोणी व्यक्तीने किंवा शेजा-याने चार ओळी लिहून तिचे स्मरण केले तर किती आनंद होतो ह्याचा अनुभव मी ह्या निमित्ताने घेतला आणि आपला आनंद इतरानाही थोड्याफार प्रमाणात वाटावा म्हणून हा लेखन प्रपंच मांडला आहे.माझ्या आनंदात तुम्हीही सहभागी व्हाल असे वाटते

.............................प्रेमळ इन्ना मावशी .................(सौ.जयश्री कुलकर्णी वारणानगर )
"तीस-चाळीस वर्षापूर्वीचे दिवस आठवताना एक घटना स्मरते.सातारच्या जाखलेकर वाड्यातल्या आठवणी तळातून वर आल्या.वाड्याच्या समोरच्या घरात राहणारी "इन्ना" माझी मानलेली मावशी .आईची अगदी माहेरपासूनची मैत्रीण.तिला विसरणं कधीच शक्य नाही.तिची छोटी बालवाडी होती.शाळेत तिच्या अंगा-खांद्यावर मुलं लटकलेली पहावयास मिळत असे. हे दृश्य पाहिले की
श्रावणातल्या "जिवती "ची आठवण यायची.
"एवढा मोठ्ठा भोपळा आकाराने वाटोळा "हे गाणे ती साभिनय खूप छान शिकवयाची.मी माझ्या नातवंदापर्यंत ते शिकवलं. ती नऊवारी साडी नेसायची तिच्या साडीच्या ओच्यात शेंगा,बोरं,शेंगदाण्याची चिक्की असे भांडार लपलेलं असायचं.फक्त तीच नव्हे तर तिचे सर्व कुटुंबच आमचं होतं. तिची सून तर आमची पहिली वहिली हक्काची वहिनी होती.माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळी ती रोज पहाटे सहा वाजता यायची .तिला घेऊन बसायची.मी मस्त डुलकी काढायची.ती माझ्या सासरीही ब-याच वेळा येऊन रहायची.स्वतःच्या जावयांप्रमाणे माझ्या पतीराजांचे लाड पुरवायची .त्यांना अधिक महिन्याचे वाण द्यायची.कोणाला चार महिने रोज वीज दे,पेलाभर दुघ दे ,एक न दोन असे नेम करून तिचा चातुर्मास चालायचा,तिच्या हातच्या बटाटयाच्या
भाजीची चव जिभेवर अजूनही रेंगाळते.
माझे वडील देवाघरी गेले तेंव्हा ती महिनाभर पदराखाली ताट झाकून येत होती अन आईला जेऊ घालत होती.सर्वांना मदत करण-या इन्नाचे त्यावेळी आभार मानायचे राहून गेले.पण सर्वांचे हित पाहून मदत करणा-या इन्नाचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे.आताच्या काळातील flat सिस्टीम पाहून वाटतं "हे विश्वची माझे घर" ह्या नात्याने सर्वांवर प्रेम करणारी माणसे पुन्हा भेटतील ?एकेक पदार्थ आणून पत्र्यावर जेवणारी,छोट्या छोट्या पैजा लावून जिंकल्यावर बटाटेवडे,भेळ श्रमदानाने करणारी थोडक्यात सुख मानणारी वाडा संस्कृती उपभोगायला मिळेल का
नातवंदांना ?आता तर सगळीकडे "मी माझे " आहे,खरच गेले ते दिन गेले.आली.
तर मित्रांनो "अशी " होती बर का माझी आई ..............अनेक वर्षांनी तिला शब्दरूपी सुमनांजली वाहिली.
शुभप्रभात : दि.१७ ऑक्टोबर २०१४

Friday, September 26, 2014

बोकीलांचे नवरात्र ......
बोकील वाडा: मुक्काम पोस्ट :कोरेगाव(सातारा)
आजपासून नवरात्र सुरु झाले आहे.सत्तरीच्या उंबरठ्यावर उभे असताना मागे वळून पाहिले की सर्व साधारपणे १९५१/१९५२ पासून मी अनुभवलेला हा मंगल आणि आनंददायी सोहोळा माझ्या डोळ्यासमोरून पुढे पुढे सरकत जातो.मागेच मी लिहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा नवीन फेसबुक मित्रांसाठी जुन्या मित्रांचा रोष ओढवून थोडेसे सांगतो/लिहितो.माफ करा.
सातारा जिल्ह्यात सातारा पंढरपूर सडकेवर (म्हणजे रोडवर ) असलेले कोरेगाव हे आमचे मुळ गाव तशी."कोरेगावबरीच आहेत पण बोकील बर्गे ह्यांचे कोरेगाव म्हणजे आमचे कोरेगाव आहे. ओढ्याच्या जवळच जुना S.T. Stand असून तेथेच मोठा दिंडी दरवाजा असलेला एक वाडा आहे.तोच आमचा प्रसिद्ध बोकील् वाडा. हा वाडा आणि त्यात साजरे होणारे नवरात्र ह्याला आजूबाजूच्या पंचक्रोशीत एक वेगळे स्थान आणि महत्व आहे.ह्याच वाड्यात बोकील घराण्याची कुलदेवता श्री तुरजाभवनीचे मोठे मंदिर/देवघर आहे.नवरात्रामध्ये इतरत्र व्यवसाय नोकरीनिमित्त विखुरलेले अनेक बोकील कुटुंबीय देवीच्या दर्शनासाठी एकत्र जमतात.तसे पाहिले तर ३००/३५० वर्षापूर्वी हा बोकील् वाडा ल्हासुरणे ह्या कोरेगाव जवळील गावात होता.मध्यंतरी आम्ही काही भाऊबंद हा वाडा बघायला गेलो असताना एके ठिकाणी एकदोन पडक्या भिंती ढासळलेल्या अवस्थेत दिसल्या.गावकरी म्हणाले' हाच तुमचा बोकीलांचा वाडा'.कालाय तस्मै नमः म्हणत आम्ही परतलो.कालांतराने तत्कालीन बोकील मंडळीनी कोरेगाव येथे नवीन दुमजली बोकील वाडा बांधला.पण आता हा वाडाही चांगलाच घाईकुतीला आला आहे.इनामदार बोकील लोकांची इनामे गेली पण दारे शिल्लक राहिली होती पण तीसुद्धा वयोमानानुसार कुरकुर करू लागली आहेत.बिजागी-या खिळखिल्या झाल्या आहेत.वर्षानुवर्षे टेकू देऊन हा डोलारा नवरात्रासाठी तरी सुसज्ज ठेवण्यासाठी अनेक बोकीलमंडळी प्रयत्नशील आहेत.तरीपण कायमस्वरूपी योजना अमलात आल्याशिवाय बोकील वाड्याचे काही खरे नाही असे अनेकांना वाटते. वाड्यात जाण्यासाठी दगडी पाय-या,मग लाकडी दरवाजा ,लगेच अंगण आणि समोर ओसरी आणि सोन्याच्या तुरजाभवानीचे देवघर.ओसरीला लागून माजघर आणि मागे पडवी आहे.वाड्याच्या मागील बाजूस पाण्याचा आड आहे.नळ नव्हते तेंव्हा ह्याच आडने मी मी म्हणना-यांना पाणी पाजले आहे.
माझ्या माहितीप्रमाणे एकूण २४ बोकील कुटुंबे आहेत.कुणाच्याही घरी वेगळे नवरात्र नसते,म्हणजे नसायचे.जे काही कुलाचार धार्मिक कार्यक्रम असायचे ते ओटीवर म्हणजे बोकिलांच्या देवघरासमोर पार पडले जायचे.अगदी बोकीलांचा हळदीकुंकू समारंभ देखील ओसरीवर होत असे.प्रत्येक वर्षी ८ बोकील कुटुंबाची नवरात्रात माळ असे.नवरात्रात ज्या बोकिलांची माळ असे त्यांना माळकरी म्हणत.ज्याची माळ असते त्या दिवसाच्या माळेचा सर्व खर्च त्याने करायचा असे असते जो तो आपापल्या ऐपतीप्रमाणे देवीची मनोभावे सेवा करतो.तरीपण माझ्या लहानपणी १० /१५ रुपयात होणारी हीच माळ आता १०/१५ हजार रुपयात होत आहे.नवरात्रात रोज सकाळी पूजापाठ,मग खिरीची आरती,त्यानंतर पुरणाची आरती आणि मगच नैवद्य प्रसाद असतो.संध्याकाळी गावातील अनेक नागरिक स्त्रिया=पुरुष मंडळी देवीच्या दर्शनासाठी येतात.संध्याकाळी कोणी माळकरी कथा कीर्तन किंवा भजन आयोजित करतो.रात्री पुन्हा देवीच्या सर्व आरत्या, करुणाष्टके असा सर्वसाधारणपणे कार्यक्रम असतो.माझ्या लहानपणी शेजारच्या निगडी गावचे गोसावी कथेकरी बुवा दर नवरात्रात आमच्या ओसरीवर कथाकीर्तन करत.सुदैवाने त्यावेळी टी.व्ही टेप रेकॉर्डर सी.डी/डीव्हीडी असलं काही नव्हतं नाहीतर कथेकरी बुवांची आठवण कोण ठेवणार?मागच्या पडवीत सोवळ्यात देवीचा नैवेद्य प्रसाद करतात.आधुनिक पंचपक्वान्ने जरी केली असली तरी पुरणपोळीचाच नैवेद्यच ह्यालाच सर्वांची मान्यता असते.माळकरी बोकील आपल्या जावई बापूंचा मानपान पण माळेच्याच दिवशी करतो. हे दिवाळ सणाइतकेच महत्वाचे समजतात.आणखी एक आमची म्हणजे बालगोपाळांची आठवण म्हणजे दुपारी सोवळ्या मंडळीची भोजने झाल्यावर ओसरीवरील पंगतीत गस्त घालायची. आणि जे कोणी पानासमोरील दक्षिणा विसरले असतील (तत्कालीन दक्षिणा म्हणजे भोकाचा एक पैसा ) ती दक्षिणा शिताफीने गोळा करायची. अशा कितीतरी आठवणी आहेत.
त्यावेळी नवरात्रच असे. त्याचा महोत्सव झाला नव्हता.event किंवा फेस्टिवल तर जन्मले देखील नव्हते.बालपणीचा काळ सुखाचा म्हणजे दुसरे काय असते हो?देवी देवघरातच असे. रस्त्यावर किंवा चौकात नसे.पण आता काळ बदलेला आहे त्या बदलत्या प्रवाहातच सामील झाले पाहिजे.नाहीतर ....जाऊ द्या.जुन्या पिढीतील पिकली पाने दिवसेंदिवस गळू लागली आहेत.तरुण पिढी आला दिवस सुखासमाधानात साजरा करत आहे.रोजच्या रोज सर्वांनी ताजा आनंद घ्यावा हेच देवीपुढे मागणे.
शुभप्रभात दिनांक :२५ सेप्टेम्बर २०१४

Saturday, August 30, 2014

सस्नेह निमंत्रण

पुणे फेस्टिवल २०१४ मध्ये

आचार्य अत्रे साहित्य दर्शन

सर्व फेसबुक वासियांनो तुम्हाला आग्रहाचे निमंत्रण देण्यास मला आनंद वाटतो की दिनांक १ आणि २ सेप्टेम्बर २०१४ रोजी बालगंधर्व कलादालन पुणे येथे आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध असलेल्या पुणे फेस्टिवल ह्या मंडळाने मला आचार्य अत्रे साहित्य दर्शन हे (४१ वे ) प्रदर्शन आयोजित करण्याची सुवर्णसंधी दिली आहे.खरतर ह्या फेस्ट...िवल मध्ये सहभागी होण्यासाठी मी पूर्वीच प्रयत्नशील होतो.पण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते असं कुणीतरी न म्हणता सगळेच जण नेहमी म्हणतात.त्याप्रमाणे ही वेळ आली आहे.त्याला कारण म्हणजे माझे अत्रेप्रेमी मित्र श्री पुंडलिक लव्हे आणि पुणे फेस्टिवलचे कार्यकारी अध्यक्ष श्री कृष्णकांत कुदळे ह्या .दोघांशी असलेला स्नेह आणि साम्य.(साम्य म्हणजे श्री कुदळे ह्यांची आणि माझी जन्मतारीख एकच ३० एप्रिल ) आणि श्री लव्हे हे पण अत्रे भक्त.त्यामुळे त्यांचे आणि माझे एकच गोत्र आले. पण अशा ठिकाणी सगोत्र चालू शकते म्हणून पुढे ( पुढे पुढे नव्हे )सरकलो इतकेच.काही का असेना लग्नात मुंज उरकून घेण्याची संधी मला मिळाली.ह्याचा आनंद वाटतोय.

अनेक वर्तमानपत्रातून,जाहिरातीद्वारे सर्व काही येतेच. पण सर्वाना वाचायला वेळ मिळतोच असे नाही.म्हणून माझ्या फेसबुकवरील मित्रांना आग्रहाचे निमंत्रण देत आहे.आवड असेल तर सवड काढून याच.बघा तर माझा ६० वर्षातील उपद्व्याप.एकाच साहित्यिकाची ४० प्रदर्शने भरविल्याबद्दल २००९ मध्ये LIMCA BOOK OF RECORDS ने नोंद घेतली आहे आणि आता मी गिनेज बुक मध्ये शिरण्याचा किंवा घुसण्याचा प्रयत्न करणार आहे.मंदिरात नाही जाता आलेतर निदान पायरीपर्यंत तरी जावे असे मला वाटते. बघू या कसे जमते ते.

हे प्रदर्शन दिवसभर सुरु ठेवणार आहे.म्हणजे अनेकांना त्यांच्या वेळेनुसार येता येईल (अर्थात येणार असे गृहीत घरून ) वेळेअभावी जास्त लिहिता येत नाही.खर म्हणजे एक दोन दिवसात' ह्या'
अवाढव्य,अफाट आणि अचाट माणसाचे कसे दर्शन होईल?माझी तर इच्छा आहे की एकाद्या देवळात जसा भागवत सप्ताह किंवा सलग अनेक दिवस कार्यक्रम चालतो त्याप्रमाणेच हे अत्रे साहित्य दर्शन भरवावे.पण .....'.पण ' ह्या शब्दानेच त्रास आणि गोंधळ होतो.आणि मलाही दीडदोन दिवसात आटोपते घ्यावे लागते. तर मग मंडळी लक्षात ठेवा तारीख,वार आणि ठिकाण .

:'आम्हाला माहिती असते तर आम्ही नक्कीच आलो असतो" हे गुळगुळीत वाक्य ऐकायला नको
म्हणून तर हा प्रपंच गणरायाच्या साक्षीने मांडला आहे. न येण्यासाठी ठेवणीतली कारणे ऐकायला लागू नयेत असे वाटते.

शुभप्रभात दिनांक ३० ऑगस्ट २०१४

Tuesday, August 12, 2014

गेल्या दहा हजार वर्षात...........
११६ वी अत्रे जयंती ...१३ ऑगस्ट २०१४

सहस्त्रकोत्तम साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची ११६ वी जयंती मंगळवार दि.१३ ऑगस्ट २०१४ रोजी आहे, आचार्य अत्रे म्हणजे हास्याचा विश्वव्यापी गडगडाट आणि खळखळट !
आचार्य अत्रे म्हणजे टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट!आचार्य अत्रे म्हणजे विनोदाचं सप्तरंगी नयनरम्य इंद्रधनुष्य! आचार्य अत्रे म्हणजे आनंदाची निर...ंतर लयलूट ! मुक्त हास्य ,प्रसन्न हास्य म्हणजेच आचार्य अत्रे ! आचार्य अत्रे म्हणजे हंशा आणि टाळ्यांचे अभेद्य समीकरण होय. १३ ऑगस्ट १८९८ ते १३ जून १९६९ ह्या काळात सदैव सर्वार्थाने गाजलेली महाराष्ट्रातील एक बलाढ्य व्यक्ति आणि शक्ति !आचार्य अत्रे म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभेची गरुड झेपच !अत्रे तिथे गर्दी आणि गर्दी तिथे अत्रे हे सर्वश्रुतच आहे.

विनोद्सम्राटाचे विनोद ....विनोद ....आणि विनोद !

अभिजात विनोद ,निखळ विनोद ,तात्काळ-हजरजबाबी दर्जेदार विनोद ,अतिशयोक्तिपूर्ण विनोद,सामाजिक,राजकीय दोषांचे विदारक विश्लेषण करणारा विनोद,स्वभावनिष्ठ विनोद,प्रसंगनिष्ठ विनोद,कल्पनानिष्ठ विनोद ,विरोधाभासातून निर्माण होणारा विनोद,विसंगतीतून निर्माण होणारा विनोद,वक्त्रोक्तीप्रधान विनोद,उपहासप्रधान विनोद,अपेक्षाभंगातून निर्माण होणारा विनोद,कलाटणी आणि कडेलोट करणारा विनोद ,उत्स्फूर्त विनोद असे इतर कोणीही एकत्रितरित्या न हताळलेले विनोदाचे निरनिराळे प्रकार विनोद्सम्राट आचार्य अत्रे यांनी एकत्रितरित्या हाताळले,म्हणूनच आचार्य अत्रे एकमेव -अद्वितीय ठरतात.
(सौजन्य -अत्रे स्मृती प्रतिष्ठान विनोद विद्यापीठ पुणे )

मी कोण आहे ?(मी कसा झालो )

अत्रे उवाच

'मी आयुष्यात रमत-गमत चाललो आहे वाटेत फुल दिसले त्यावर कविता कर. मूल दिसले,त्याला गोष्ट सांग.उदास चेह-याचा माणूस दिसला,की त्याच्या जीवनावर नाटक लिही.बोकेसंन्यासी चालला,की त्याची टवाळी कर ...कोणी महापुरुष भेटला की त्याचा जयजयकार कर.आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल मला जिज्ञासा आहे.खिडकी उघडी दिसली की मांजर जसे तिच्यात डोकावते तसे जीवनात डोकावण्याची मला फार हौस आहे."

मी गुणांचा पूजक आहे.

"मी गुणांचा पूजक आहे.हे माझे मोठे सामर्थ्य आहे.भुंगे जसे फुलावर झेप घेतात तसे मला गुण दिसले रे दिसले,की त्याजवर मी तुटून पडतो" ... आचार्य अत्रे ...

शुभप्रभात :दि.१२ ऑगस्ट २०१४

Friday, July 25, 2014

एकसष्ठी - माझ्या "फोनाफोनीची "

"घेतला एकदाचा स्मार्टफोन.नुसत्या हलक्या स्पर्शानेदेखील पुढे पळणारा. त्याला म्हणे"
टच स्क्रीन "म्हणायचं असतं.माझ्या mobile सल्लागाराचा विकतचा सल्ला. नुकताच मी' मोटो ई' हा आधुनिक जगात साजेसा असा mobile फोन अनेक चर्चा,सल्ले ,अनकूल आणि प्रतिकूल मते पार पाडून आणि ऐकून विकत घेतला.त्या मुळे सध्या तरी माझे तसे बरे चालले आहे.पण हे "प्रकरण "आत्मसात ... व्हायला किती काळ लागणार हे मात्र गूढच आहे.अनेकजण "हे काय अजून तुमच्याकडे स्मार्ट फोन कसा नाही?"असं विचारून मर्मावर घाव घालत.पण सध्या'" असला "फोन वापरत असताना जीवाची किती कुतरओढ होतंय म्हणून सांगू?त्यातच पुन्हा जुन्या mobile ची आठवण झाली की मन भरून येते.किती साधा,सोपा आणि सुटसुटीत मामला असायचा तेंव्हा.शिवाय वयाची पासष्टी होऊनही आपण मात्र स्मार्ट झालो नाही पण हातात मात्र स्मार्ट फोन ह्याची मनाला वेगळीच खंत वाटते.ही व्यथा माझ्या एका मित्राला सांगितल्यावर तो ताडकन म्हणाला "तुम्ही नुसते स्मार्ट नसून ओवर स्मार्ट आहात "असे म्हणून मोठ्याने हसत हसत माझ्यापुढे टाळी घेण्यासाठी हात पुढे केला.आपल्याच तंगड्या आपल्या गळ्यात पडल्या दुसरे काय?टाळी देण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.असे गमतीचे प्रसंग घडले, मी "फोन "ह्या विषयात प्रथम लक्ष आणि तोंड केंव्हा घातले हे आठवत होतो Apple आणि Blackberry ही केवळ फळेच होती असे ते दिवस होते,

तर मित्रानो १९५४ साली म्हणजे ६० वर्षापूर्वीच आयुष्यात पहिल्यांदा फोनला हात आणि तोंड लावले त्यावेळी .मुंबईला गेलो असताना एक दिवस शिवडी येथे मामांच्या कारखान्यात गेल्यावर त्यांच्या टेबलावरील काळ्याकुट्ट आणि खणखण करणाऱ्या वस्तूकडे मी कुतूहलाने पहात होतो.माझी तगमग चाललेली पाहून मामांनी "बोलायचे का फोनवर "असे विचारल्यावर मग काय म्हणता?" आंधळा मागतो एक डोळा .....अशी अवस्था झाली आणि रे रोडला असणाऱ्या माझ्या एका काकांशी मोठ्या आवाजात "हेलो हेलो "करत बोलत होतो.प्रत्येकाला कोणत्याही पहिल्या अनुभवाचा आनंद होत असतो तसाच आनंद मलाही पहिल्या फोनाफोनीचा झाला ह्यात नवल ते काय? हाच आनंदाचा प्रसंग मी पुढे कित्येक वर्षे उराशी बाळगला होता.कारण फोन करण्याची वेळ येण्यासारखी परिस्थिती तेंव्हा नव्हतीच.शिवाय माझ्या लहानपणी फोन, ग्रामोफोन,मोटारगाडी ,रेडीओ ही मोठेपणाची आणि श्रीमंतीची लक्षणे.मानली जात,अगदीच तातडीचा प्रसंग आला तर ओळखीच्या दुकानात जाऊन फोन करावा लागे.ते सुधा मेहरबानी म्हणूनच.नाहीतर पोस्टात जाऊन तार आणि फोन सांभाळणाऱ्या मास्तरांची मनधरणी करायची. सरकारला पैसे द्यावेच लागत पण तेथील "पौष्टिक" अनुभव मात्र क्वचितच चांगला असे.पुढे नोकरी लागल्यावर खिशात थोडे पैसे खुळखुळू लागले.मग फोनच्या बुथवर जाऊन मोठ्या रुबाबात सुटी नाणी वापरून फोन करू लागलो.कारण फोनला नंबर लावून तो त्वरित मिळणे महाकर्म कठीण असे.तरीसुद्धा हे धाडस करून फोनला नंबर लावला."आता लवकरच तुम्हाला फोन मिळेल "हे धृवपद चांगलेच पाठ झाले.आणि एके दिवशी हा हा म्हणता चक्क फोनची प्रतिस्थापना आमच्या घरात झाली. मग काय आनंद वर्णावा महाराजा?पहिले काही दिवस फोनचे सुद्धा बिल येते हे विसरून आणि ह्याकडे लक्षपूर्व दुर्लक्ष करुन दणादण फोन केले.नंतर जग रहाटीनुसार नव्याची नवलाई संपत आली. आणि गाडी रुळावर आली.
बँकेच्या नोकरीत असताना तर दिवसभर फोनचा आणि फोनवर सारखा मारा चालू असे. काही आनंदाचे ऐकावे लागे तर काही क्लेशदायक असे.सगळ्याच आठवणी काही गोड गोड नसतात .काही आंबट खारट आणि तुरट असतात.यालाच जीवन असे म्हणतात( म्हणे.)

कोल्हापूर येथे असताना बँकेच्या एका शाखेचा शाखाधिकारी ह्या नात्याने बँकेचा फोन आमच्या निवासस्थानी विराजमान झाला होता.तो थाट आणि ते अनुभव काही वेगळेच होते.संपूर्ण इमारतीमध्ये एखादा दुसराच फोन असे.अफवा नसूनही आमच्या घरच्या फोनची बातमी वा-यासारखी आजूबाजूला पसरली.सर्वच वातावरण मैत्री, जिव्हाळा, शेजारधर्म आणि प्रेम-ओढ ह्याने व्यापले असल्याने आमच्या फोनला सार्वजनिक रूप मिळाले.म्हणून आनंदाचे आणि दुःखाचे निरोप द्यावे लागायचे.सामाजिक बांधिलकी वगैरे शब्द जन्माला आले नव्हते .पण समाज कार्य मात्र चांगलेच बाळसे धरत होते.काही नमुनेदार निरोप आठवले "छबुताई ला मुलगा झाला.त्याचे वजन 5 पौंड आहे." नाना रात्री गेले.पहिल्याच गाडीने निघा." बंड्याला सांगा आज दुपारी क्लास नाहीये " इ.इ.अशी मजा होती त्या दिवसात. पुढे cbd बेलापूर येथे बदलून गेल्यावरही नेरूळ येथील बँकेच्या नि वासी सदनिकेत फोन इंटरकॉम इ. आलेच.एकूण काय फोनचा सहवास दिवसेंदिवस वाढतच जातोय.आता तर म्हणे माणसाला एकवेळ प्राणवायू मिळाला नाही तरी चालेल पण स्मार्ट फोन इंटरनेट पाहिजेच.गमतीचा भाग सोडा पण फोन हा सर्वांच्या प्रमाणे माझ्याही जीवनाचा अत्यावश्यक घटक बनला आहे.एवढे मात्र नक्की.

शुभप्रभात : दिनांक :२५ जुलै २०१४

Wednesday, July 2, 2014

आठवडी बाजार:
"रंगू बाजाराला जाते,,,,,जाऊ द्या "

आमच्या म्हणजे माझ्या लहानपणी बाजारात जाऊन येणे ही एक साप्ताहिक अत्यानंदाची पर्वणीच असे. हल्लीच्या बाल गोपालाना" बाजार म्हणजे काय रे भाऊ ?"असेच विचारावे लागेल असे वाटते.कारण बाजाराची जागा सब्जी - मंडी,मंडई आणि मॉल ह्या मंडळींनी घेतली.तरीसुद्धा चिडचिड झाल्यावर चिडून माणूस "काय हा बाजार मांडलाय"असे म्हणत ह्या वाक्यातच फक...्त बाजार भरवतो.आज हे सर्व आठवायचे कारण म्हणजे गेल्या रविवारपासून कोथरूड मुक्काम पोस्ट पुणे येथे आता साप्ताहिक आठवडी बाजार भरणार आहे.अनेक वर्तमानपत्रातून ही ' हिरवीगार' वार्ता वाचून माझ्याप्रमाणे अनेकांची (म्हणजे ज्येष्ठ मंडळींची )मने भरून आली असतील १९५२/५३ साली कोरेगाव येथे असताना मी बाजाराचा भरपूर आनंद उपभोगला.त्यामुळे माझ्या "रम्य ते बालपण "ह्या सदरात बाजाराला फार मोठे स्थान आहे. ६०/६५ वर्षापूर्वी एका मराठी चित्रपटात गाजलेले "रंगू बाजाराला जाते ....जाऊ द्या ."ह्या गाण्याची आठवण ह्या निमित्ताने ब-याच वर्षांनी झाली.रविवारी सुप्रभाती (म्हणजे १०/११ वाजता ) बाजारात जाण्याचा सोहोळा मी मनोभावे पार पाडला.अहाहा|काय भन्नाट पब्लिक जमलं होतं बाजार अनुभवायला |( भन्नाट शब्दानंतर नागरिक म्हणणे कसेतरीच वाटते नाही का ?)बरेच जण सुशोभित पिशव्या घेऊन भाजी खरेदीला आले होते तर काही "बघू या तरी बाजार म्हणजे काय भानगड असते ती " हे अनुभवायला आले होते.भाजीच्या एका टेम्पोवर अनेकजण अगदी तुटून पडले होते.पण काहीजण हाताची घडी घालून आणि मुक्त मुख सोडून भाव खात मालाच्या भावाची फक्त चौकशी आणि तुलना करीत झाडाच्या सावलीत (निवांतपणे नव्हे )आपली ठाम मते मांडीत होते.माझ्या पदरात आणि पिशवीत जे काही पडले ते घेऊन त्या गलग्यातून कसाबसा सहीसलामत सुटलो आणि युद्धावरून परतलेल्या वीराप्रमाणे (म्हणजे त्या थाटात )बाजारातून घरी परतलो. पण मी जगलेल्या 'त्या' बाजाराची मजा काही औरच होती.अनेक आठवणींचे मोहोळ एकदम उठल्यावर मनाने पुण्यातून थेट कोरेगाव मुक्कामीच गेलो

प्रत्येक आठवड्याची मंगल प्रभात आमच्या कोरेगावला सोमवारच्या बाजाराने होत असते.अजूनही ही परंपरा सुरु आहेच.आसपासच्या खेडेगावातून रोजच्या रोज भाजीपाला किंवा धान्य येत नसे.जो काही वायदा आणि व्यवहार असे तो बाजाराच्याच दिवशी म्हणजे सोमवारी पार पडे.त्यामुळे मंगळवारपासूनच अनेकजण पुढच्या सोमवारची प्रतीक्षा करीत.अधेमधे नाहीच.वाड्यातील मंडळी दुपारचे भोजन उरकून मोठाल्या पिशव्या आणि थैल्या घेऊन बाजारपेठेकडे जात.त्या रस्त्याला लागलेकीच बाजाराचा शुभारंभ व्हायचा.तेथे काय मिळायचे नाही?आताच्या भाषेत A to Z सर्व काही मिळे. आर्वी ह्या गावाची भारतभर जाणारी विड्याची पाने, पिवळी धमक गोड देशी केळी,ताजा आणि हिरवागार भाजीपाला,कडधान्ये विविध प्रकारच्या डाळीं, गावरान पेरू- पपई,मसाल्याचे पदार्थ,हत्यारे आणि अवजारे,असे बरेच काही मिळत असे.मी आईचे बोट धरूनच बाजारात हिंडत असे कारण "माझा हात सोडायचा नाही "ह्या तंबीवरच आई मला बाजारात घेऊन जात असे आणि .शहाण्यासारखे वागलास तर उसाचा रस देईन किंवा खायला काहीतरी घेईन ह्या अटीवरच माझी बाजार-सहल होत असे.विविध प्रकारची खेळणीही आणि खेळ तेथेच असे.जादूचे खेळ,एका मोठ्या डब्यातून बंबई दर्शन धडे, बन्सी नावाचा एक चाचा नेहमी येणा-या लहान मुलांना गोफ आणि ताईत देत असे.श्रावण महिना सुरु झाला की रेल्वे पुलाखाली असलेल्या केदारेश्वराचे दर्शन घेऊन यायचे आणि मग बाजारात जायचे अशा कितीतरी आठवणी आल्या.मन बाजारातच सैरावैरा धावत होते.

१९५५ साली आम्ही कोरेगाव सोडून सातारा ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी रहाण्यास आलो.मग मात्र बाजारात जाणे जवळजवळ बंदच झाले. सातारा येथेही गांधी मैदानावर दर रविवारी आणि दर गुरुवारी गुरुवार परजावर बाजार भरत असे.पण आम्हाला भाजी - मंडईच सोयीची झाली.आजोळी फलटणला गेल्यावरही अधूनमधून तेथील बाजारात जाऊन यायचो.इतकेच काय पण नुकतेच अमेरिकेच्या भेटीत Sunnyvale येथील मर्फी चौकातील अमेरिकन बाजारही मी पाहून आलो.येथील साहेबी बाजार तर वेगळाच वाटला.पण एक अनुभव म्हणून छान वाटलं.

असो.लिखाणाचा हा बाजारही आता बंद केलाच पाहिजे.नाही का ?

शुभप्रभात:दिनांक २ जुलै२०१४

Wednesday, June 11, 2014

घनश्याम सुंदरा श्रीधरा

घनश्याम सुंदरा श्रीधरा.....
'वसंतमय 'सुरेल सायंकाळ

महाराष्ट्राचे थोर आणि गुणी संगीतकार कै.वसंत देसाई ह्यांच्या १०२ व्या जन्मदिनानिमित्त दिनांक ८ जून रोजी येथील एसेम जोशी सभागृहात सायंकाळी त्यांच्या गीतांवर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रमास हजेरी लावण्याचे भाग्य मला मिळाले.ही सायंकाळ अतिशय सुरेल आणि सदैव लक्षात राहण्यासारखीच ठरली.कारण आतापर्यंत शंकर जयकिशन,मदन मोहन, ओ.पी..नय...्यर .आर डी बर्मन ,किशोरकुमार अशा अनेक संगीतकारांच्या' नाईटस'मी ऐकल्या पण .वसंत देसाई ह्यांची नाईट कधी झाल्याचे निदान मला तरी माहित नव्हते.वसंत देसाई ह्यांची सायंकाळच लाजवाब ठरली.हा कार्यक्रम "विनामूल्य " ह्या सदरात मोडत असल्याने रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळणार हे ओळखून मी ठरलेल्या वेळेआधीच गेलो.अनेक ज्येष्ठ मंडळी रोजच्या व्याधी आणि दुखणी बाजूला सारून 50-60 वर्षापूर्वीचा काळ पुन्हा एकदा कानात साठवून ठेवण्यासाठी काठी टेकत आणि आपटत मुद्दाम आली होती.अनेक खुर्च्या पाठीवर "राखीव "आणि "निमंत्रित "ढाली ठेऊन बसल्या होत्या.

कार्यक्रमाच्या नमनालाच स्वागत आणि आभार उरकून घेतल्याने नंतरच्या संगीत समाधीत व्यत्यय आला नाही.वसंतरावांची वैभवशाली संगीतमय कारकीर्द आणि कौटुंबिक आठवणी ऐकल्यावर सर्वांना नव्यानेच सुरु होणा-या www vasantdesai.com ह्या संकेतस्थळाचे दर्शन झाले.समोरील पडद्यावर भव्य भालप्रदेश आणि हातात फुलांचा गजरा असलेली वसंतरावांची मनमोहक प्रतिमा दिसली आणि लगेचच' घनश्याम सुंदरा श्रीधरा ......ऐकून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.सायंकाळी ६ वाजतासुद्धा' अरुणोदय 'झाल्याचा आनंद प्रत्येकाने उपभोगला.नंतर प्रमुख पाहुणे आणि निवेदक श्री अमरेंद्र धनेश्वर ह्यांनी नवीन संकेतस्थळ हळू हळू उलगडले.वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक रचना आणि गीते ज्या ज्या रागात मांडली होती त्या सर्व राग् धारीचे पूर्व दर्शन त्यांनी मोठ्या बहारीने श्रोत्यांना ऐकवून मंत्रमुग्ध केले आणि सर्वांकडून प्रचंड टाळ्या प्रेमापायी वसूल केल्या.तसेच नवीन नवीन माहितीही रसिकांना मिळाली.श्रीमती सुब्बलक्ष्मी,लतादीदी,उस्ताद बिस्मिल्लाखान आणि स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी ह्या चार भारतरत्नांशी वसंतरावांचा संगीताच्यामुळे घनिष्ट संबंध आला.सुप्रसिद्ध लेखाक श्री विश्वास नेरुरकर ह्यांनीही वसंतरावांच्या निवडक आठवणी सांगितल्या.

संकेतस्थळात वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या हिंदी मराठी गाण्यांची संख्या ८०० हून अधिक आहे.अमर भूपाळी,मोलकरीण ,छोटा जवान,शाहीर राम जोशी,स्वयंवर झाले सीतेचे,श्यामची आई इ.मराठी चित्रपट व्ही.शांताराम दिग्दर्शित झनक झनक पायल बाजे,दो आंखे बारह हाथ ,तुफान और दिया,डॉक्टर कोटणीस की अमर कहानी,आणि गुड्डी ,गुंज उठी शहनाई,आशीर्वाद संपूर्ण रामायण इ.इ.हिंदी चित्रपट ,मराठी नाटक पंडितराज जगन्नाथ,अत्रे थिएटर्सचे प्रीतीसंगम ह्या सर्वांना वसंतरावांनी सुमधुर संगीत देऊन तमाम मराठी माणसांना खुश केले आहे.अमर भूपाळी तील गाणी, लावण्या आणि भूपाळ्या मराठी जनता वर्षानुवर्षे गुणगुणत आहे .घनश्याम सुंदरा ऐकत असताना कोंबड्याचे आरवणे आणी गायीचे हंबरणे कानावर पडले म्हणजे खरीखुरी सकाळ झाली असे वाटते.ए मलिक तेरे बंदे हम ही प्रार्थना अन्य काही देशातील कारागृहात कैदी म्हणतात "गुड्डी"चित्रपटातील सामुहिक गीत/प्रार्थना संपूर्ण भारतात चांगलीच गाजलीआहे.

"श्यामची आई " ह्या अत्रे पिक्चर्सला राष्ट्रपतींचे पहिले सुवर्णपदक मिळाले.आचार्य अत्रे ह्यांनी ह्याचे श्रेय वसंतराव देसाई ह्यांना दिले आहे.६० वर्षापूर्वीच्या ह्या मराठी चित्रपटाची गीते आजही अनेक मराठी कार्यक्रमात गायली जातात."भरजरी ग पितांबर "छडी लागे छम छम " आई म्हणोनी कोणी ...."घनदाट रानी वाहे "इ.इ. गाणी लोकप्रिय झाली ती वसंतरावांच्या संगीतामुळेच.ह्या निमित्ताने वसंत देसाई ह्या महान संगीतकाराची महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला पुन्हा एकदा आठवण झाली आणि सदैव होत राहील ह्याचा आनंद आहे.


शुभप्रभात :११ जून २०१४

Thursday, May 1, 2014

दिसामाजी काहीतरी ते :

........झालाच पाहिजे :
महाराष्ट्र दिन- स्मरण बलदंड महापुरुषाचे
आचार्य प्र.के. अत्रे ( दुसरे कोण?)

आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा संस्मरणीय दिवस.५४ वर्षे होऊन गेली.अजूनही आठवताहेत ते दिवस ,ते मोर्चे,त्या प्रचंड सभा,हशा -टाळ्यांचा कडकडाट,सन सणाटी भाषणे.ह्या अभूतपूर्व लढ्यात आपली वाणी आणि लेखणी एकाद्या धारदार तलवारीप्रमाणेच अत्रे साहेबांनी चालविली.त्यांचे महाराष्ट्र प्रेम,महा...राष्ट्राचा जाज्वल्य अभिमान मराठी माणूस कधी विसरेल असे वाटत नाही.आजकालच्या तरुणांना आणि जनतेला "अत्रे म्हणजे कोण रे भाऊ? "हे विचारावे लागू नये म्हणून मी अधूनमधून फेसबुक मित्रांना आत्रेय कथा ऐकवत/पाठवत असतो.कोणाला ठाऊक त्यांना ते आवडते की नाही? समजते की नाही ? आचार्य अत्रे ह्यांच्या विषयी कितीही लिहिले आणि सांगितले तरी ते कमीच आहे.पूर्ण समाधान कधीच होत नाही.अष्ट पैलू व्यक्तिमत्व म्हणजे काय?तर ते हेच.एका अत्र्यांमध्ये बारा अत्रे आहेत असे अत्रेच म्हणत.महाराष्ट्र दिनानिमित्त ह्या महान माणसाचे स्मरण करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे असे वाटते. कारण महाराष्ट्र राज्य स्थापने मध्ये सिंहाचा वाटा अत्रेसाहेबांचाच आहे हे सर्वजण जाणतात.ह्या विषयी अधिक सविस्तर लिहिण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही.

अत्रे उवाच:

मराठी माणसांच्या अंत:करणातले हे महाराष्ट्राच्या प्रेमाचे,भक्तीचे,अभिमानाचे आणि आदराचे उमाळे खळबळून उचंबलावेत आणि त्यांच्या परिमळाने हे सारे महाराष्ट्र दरवळून स्वर्गाप्रमाणे ते अक्षरशः"आनंदवनभूवन"व्हावे,ह्या भावनेने आमच्या इतिहासातली भाषेतली,वांग्मयातली आणि परंपरेतली सारी 'देवटाकी' प्रत्येक मराठी माणसाने डोळ्यांनी पाहिली पाहिजेत,आणि त्यातले चैतन्यजल आपण स्वतःच्या ओंजळीने घटा घटा प्याले पाहिजे.तरच ह्या 'आनंद्वन भूवना'चा खरा साक्षात्कार त्याला होईल.

महाराष्ट्र गीत:वंदन

नमस्ते श्री महाराष्ट्र, स्वातंत्र्याच्या जवाहरा, तीन कोटी मराठ्यांच्या पितृदेवा परात्परा |
संतांच्या वंद्य माहेरा,वीरांच्या बलसागरा,तुला निर्मून ही झाली धन्य वाटे वसुंधरा |
महाराष्ट्रा,तुझ्या पायी असो साष्टांग वंदन,तुझ्यासाठी झिजो माझ्या देहाचे नित्य चंदन|तुझे गोटे,तुझे काटे फुलांची शेजही मला ,कणीकोंडा तुझा आहे गोड मांड्याहूनी मला |
महाराष्ट्रा,तुझ्यापायी घालू लोटांगणे किती?तुझी गाणी,तुझी स्तोत्रे भक्तीने गाऊ मी किती?

महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी माणसा तुला आमचा मानाचा मुजरा |

शुभप्रभात :1 मे २०१४ (महाराष्ट्र दिन )
See More

Wednesday, April 30, 2014

वाढदिवस कसला ? काढदिवस

दिसामाजी काहीतरी ते :

वाढदिवस कसला? काढदिवस :

अहो पण हे मी नाही म्हटलं.आपल्या उतारवयात साज-या होणा-या वाढदिवसा च्या निमित्ताने आचार्य अत्रे ह्यांनी आपल्या 'दै;मराठा' मध्ये वरील मथळ्याचा अग्रलेख लिहिला.आता कसला आलाय वाढदिवस आता काढदिवस असा आशय होता.पुढे ७० व्या वाढदिवसालासुद्धा "सत्तर बेहत्तर" असा शीर्षक असलेला अग्रलेख त्यांनी लिहिला होता.आज हे सर्व आठवायचे कारण म्हणजे आज ३० एप्रिल म्हणजे' फुल... एप्रिल '(एप्रिल फुल नव्हे ) माझा वाढदिवस.हा हा म्हणता ६८ संपून ६९ वयात पदार्पण केले.अर्थात हा काही फार मोठा पराक्रम मी केला आहे असे नव्हे.वाढदिवसाचा आनंद लहानापासून थोरापर्यंत सर्वांनाच होतो. मी त्याला अपवाद नाही.सर्वसामान्य माणसाला जे वाढदिवसाचे महत्व आणि आनंद/ समाधान लाभते तेच मलाही लाभले.प्राथमिक शाळेत असताना "आज माझा वाढदिवस.मला नवीन सदरा,नवीन टोपी ...."असा मजकूर असलेला एक धडा आठवला.मी थोड्या फार प्रमाणात ह्याच पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

सकाळी झुंजूमुंजू झाल्यापासूनच शुभेच्छांचे घंटानाद सुरु झाले.दोन्ही फोनने दोन्हीही कानांचा पूर्ण ताबा घेतला होता.करणार काय गोतावळाच फार.दिवसेंदिवस त्याला उतरती कला लागण्या ऐवजी पुन्हा चांगलेच बाळसे धरू लागले आहे.पण हेच आपले वैभव आहे असे मला वाटते.नाहीतर हल्ली कोणाला एवढा वेळ असतो?आणि असलाच तर प्रेम, ओढ,आपुलकी ह्यांचे काय?हे काही बाजारात मिळत नाही.आजचा दिवस अनेकांशी वार्तालाप/हास्य विनोद करण्यात गेला.sms इ-मेल सारखे सुरूच होते.राम् प्रहरीच प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन सहजानंद मित्र मंडळात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो आमचे सकाळचे भ्रमण मंडळ हजर होते.रिवाजानुसार पुष्पगुच्छ,फोटो आणि केक देऊन माझ्यासकट सर्वांचे तोंड गोड केले आणि नंतर मी झणझणीत इडलीवडा सांबर खिलवून सर्वांचे तोंड तिखट केले.आणि थंडगार ताक पाजून सर्वांना सक्काळी सक्काळीच गार करून टाकले.गप्पाटप्पा हास्यविनोद आणि चेष्टा मस्करी झालीच.काहीच कमी पडले नाही.मजा आली.घरी आल्यावर पुन्हा फोनाफोनी सुरु झाली.सायंकाळीही नेहमीच्या मित्रांना गोड तिखट चवीची झलक दाखवली.एकूण काय नेहमीचा २४ तासांचाच दिवस आज मजेत गेला.

माझ्या अनेक मित्रांनी,नातेवाईकांनी,बँकेतील सहकारी मंडळींनी आणि फेसबुकवरील मित्रांनी शुभेच्छांचा वर्षाव करून मला गुदमरून टाकले.खरतर प्रत्येकाला स्वतंत्रपणे धन्यवाद दिले पाहिजेत.पण हे शक्य होत नाही म्हणून माझ्या सर्व मित्र मंडळींचा मी अत्यंत ऋणी आहे.असेच प्रेम सदैव रहावे हीच मागणी परमेश्वराकडे आहे.आपल्याला आणखी काय हवे?सर्वाना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

शुभप्रभात :३० एप्रिल २०१४

Monday, April 7, 2014

विनम्र श्रद्धांजली : शतायुषी ऋषितुल्य दत्ताजी ताम्हणे मुलुंड (मुंबई )

आज दुपारी दूरदर्शनवरील बातम्या पहात असताना ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री दत्ताजी ताम्हणे ह्यांचे मुलुंड येथे निधन झाल्याचे समजले आणि माझ्या मनात ऑगस्ट २०१२ मध्ये त्यांच्या सहवासात घालविलेले काही क्षण आठवले.वास्तविक दत्ताजींचा आणि माझा पूर्वी कधीही परिचय नव्हता.परंतु त्यांचा परिचय आणि सहवास आचार्य अत्रे ह...्यांच्यामुळेच लाभला आणि मन अस्वस्थ झाले.

१२/१३ ऑगस्ट २०१२ मध्ये मुलुंडच्या काही संस्थांनी अत्रे जयंतीनिमित्त माझे अत्रे साहित्य दर्शन हे प्रदर्शन आयोजित केले होते.समारंभाचे उद्घाटक आणि आकर्षण होते दत्ताजी ताम्हणे.त्यामुळे त्यांचे अनेक चहाते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दत्ताजींनी दीप प्रज्वलन करून आणि फीत कापून समारंभाचे/प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यावर माझ्याबरोबर सर्व प्रदर्शन मोठ्या उत्सुकतेने पहिले आणि मधून आत्रेय आठवणीही सांगितल्या.हे सुखद क्षण मी कॅमेर्यामध्ये टिपले आणि आता मित्रांना पाठविले आहेत.(post)प्रदर्शन पाहिल्यावर दत्ताजी मला म्हणाले "तुम्ही ह्यासाठी फारच कष्ट घेतलेले दिसताहेत" एका शतायुषी विभूतीकडून अशी शाबासकी मिळाल्याने मलाही धन्य वाटले.

आज त्यांच्या दु:खद निधनाने ह्या आठवणी उचंबळून आल्या.अशा ह्या ज्येष्ठ नेत्याला,स्वातंत्र्य सैनिकाला माझे विनम्र वंदन.

शुभप्रभात :

Wednesday, April 2, 2014

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

सर्व प्रथम फेसबुकवरील माझ्या सर्व मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.मलाही नवीन वर्षाची सुरवात आपल्या मातीत आणि आपल्या माणसात होत आहे ह्याचा विशेष आनंद होत आहे.गेले ८/१० दिवस मला काहीच लिहावयाला जमले नाही.२२ मार्चला पहाटे मी मुळामुठेच्या तीरावर वसलेल्या पुण्यनगरीत दाखल झालो.६ महिन्याच्या खंडानंतर आपल्या गावात आणि आपल्या घरात येताना मन...ाला जो आनंद होत होता त्याचे वर्णन शब्दात कसे करू ?गड्या रे आपुला गाव बरा असं उगीच का म्हणतात.ह्याचा अर्थ तो किंवा ते गाव बरे नव्हते असं मुळीच नाही शेवटी कितीही झालं तरी आपलं ते आपलंच असतं.

आमचे घर आम्ही येणार म्हणून आमच्या सख्ख्या शेजा-यांनी आधीच स्वच्छ करून घेतले होते त्यामुळे आल्या आल्या अमेरिकेची पायधूळ घराबाहेरच झटकली.घराचा मूळ मालक आल्याने निर्जीव वस्तू देखील सजीव होऊन आमच्याकडे पाहत होत्या
बोलत होत्या असेच वाटत होते.तरीपण कित्येक वस्तूंना घर मालकाने कुरवाळणे/ गोंजारणे अत्यावश्यक असते त्या शिवाय त्या जागेवर येत नाहीत किंवा वठणीवर येत नाहीत.हेच काम आठवडाभर चालले होते.एरव्ही पाना फुलांच्या कुंड्यांनी नटलेली ग्यालरी मात्र भीषण अवस्थेत दिवस कंठीत होती.आपणच आता हंगामी घरमालक आहोत असे समजून अनेक कबुतरांनी मात्र आमच्या ग्यालरीचे रुपांतर सूतिकागृहात (Maternity Home)मध्ये केले होते.आता परिस्थिती बरीच निवळून मूळ पदावर आली आहे.जाताना जी तोंडे बंद केली होती,ज्यांचा आवाज बंद केला होता त्यांना पुन्हा चालते बोलते करण्यासाठी बरीच मनधरणी करावी लागली.ह्या गडबडीत काहीच post करणे जमले नाही.म्हणून मी आधीच 'स्वल्पविराम' मंजूर करून घेतला होता.तरीपण एका मित्राने "हे वागणं बर नव्ह"असे म्हटले आहे.कितीही झाले तरी पूर्वीसारखा वेळ आणि वातावरण येथे मिळणार नाही.कामाचा भुंगा स्वस्थ बसू देणार नाही.त्यातूनच वेळ मारून वेळ काढू.

उद्या वर्षप्रतिपदा सण.साडेतीन मुहुर्तामधील एक दिवस.घरोघरी गुढ्या उभारल्या जातील.आंब्याचे डहाळे घरोघरी दारोदारी विराजमान होतील.हे सर्व पाहायला आम्ही पुन्हा मायदेशी आलो ह्याचा आनंद आहे.तरीपण अधूनमधून मन सनीवेलमध्ये जाते.नात मीरा हिची आठवण सारखी येते.तेथील सु खाचे आनंदाचे दिवस आठवतात.
कर्वे रोडवरून जाताना एकदम lawrence ex,way.डोळ्यासमोर येतो.प्रवाश्यांनी तुडुंब भरलेली माळवाडी बस जाताना पाहून VTA सिटी बस आणि तिचा रुबाबदार ओपेरटोर दिसतो.काही दिवस तरी अशीच मनस्थिती राहील.मग सुरु होईल आपले इथले जीवन.
ब-याच दिवसांनी काहीतरी लिहून मन मोकळे केल्याने किती बर वाटतंय म्हणून सांगू
पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभप्रभात :३० मार्च २०१४

Tuesday, March 18, 2014

दिसामाजी काहीतरी ते:
(तूर्त तरी स्वल्पविराम)

निरोप तझा घेता .....अमेरीके | GOOD BYE USA......
(गड्या रे आपुला गाव बरा)

वरील मथळा वाचून अनेकांनी सुस्कारा सोडला असेल.पण चालू म्हणजे सुरु असलेली कोणतीही गोष्ट कधीतरी थांबतेच.नाहीतर इतर लोक ती थांबवतात.पण हे कष्टाचे काम दुस-या कोणावरही न सोपवता मीच आपणहून तूर्त तरी थांबवणार आहे.

ऑक्टोबर २०१३ पासून मी ओबामांच्या राज्यात दिवस' कंठतोय."आमच्या पाठोपाठ थ...ंडीही आली आणि तिने सर्वांना जास्तीत जास्त वेळ घरात बसविले.येथे काही आपल्यासारखी वर्तमानपत्र वाचण्याची मजा येत नाही किंवा दूरदर्शनवर मराठी चानेलही नसते.त्यामुळे laptop आणि कॅमेरा ह्या दोन जिवलग मित्रांच्या सहाय्याने येथील जीवन मस्त मजेत आणि आनंदात घालविले.लहानपणापासून थोडफार मराठी साहित्य वाचल्याने,अनेक मान्यवर
वक्त्यांची भाषणे ऐकल्याने आणि काही दिग्गजांचे जीवन जवळून पाहिल्याने चार ओळी लिहू शकत होतो.आवड होतीच पण ती अमलात आणायला बरेचजणांचे मोलाचे सहकार्य लाभले.त्यामुळे लहानमोठे ६० /७० लेख म्हणजे post मी "दिसामाजी काहीतरी ते "ह्या सदरात लिहिले.विशेष म्हणजे अनेक मित्रांना ते आवडले आणि सर्वांनी मला प्रोत्सहन दिले. मराठीकाकांचे आभार मानावे तेवढे थोडेच.कारण मराठी post
वाचण्याची गमंत साहेबाच्या भाषेत येणार नाही. सर्व फेसबुक मित्रांचेही मनापासून आभार.

येथील मायबाप सरकारच्या नियम कायद्यानुसार एका वेळी ६ महिनेच रहाता येते.आमचे ६ महिने आता' भरत' आल्याने "गड्या रे आपुला गाव बरा" असे म्हणत आम्ही मायदेशी परतणार आहोत.अमेरिकेतील दिवस अत्यंत मजेत आणि आनंदात गेले.आहे त्या परीस्थितीत येणा-या सर्व दिवसांचा मी पुरेपूर आनंद घेतला.येथे येण्याचे आमचे मुख्य कारण म्हणजे आमच्या घरात नव्यानेच येणा-या नातीचे म्हणजे चि.मीरा हर्षवर्धन बोकील हिचे स्वागत करणे हे होते. आमच्या मुलाने आणि सुनेने आम्हाला हिंडवून शक्य होईल ती अमेरिका दाखविली. त्यामुळे तर येथील दिवस चांगल्या वातावरणात आणि आनंदात गेले.त्या दोघांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.आमची नात मीरा ही पण आता दोन महिन्याची झाली असून आम्हाला चांगलाच लला लावला आहे.त्यामुळे काही दिवस तरी शरीराने पुण्यात असूनसुद्धा मनाने अजून तरी येथेच रहावे लागेल असे वाटते.शिवाय येथे जसा वेळ मिळत होता तसा आणि तितका वेळ आता मिळेलच असे नाही.म्हणून दिवसेंदिवस "दिसामाजी"असे लिहिणे अवघड आहे.गेल्यावर अनेक नियोजित कामांची यादी उपसावी लागणार आहे.तात्पर्य थोडे दिवस विश्रांती.मग नंतर आहेच.ब्लॉग वर पण सर्व post टाकल्या आहेत ज्या विरंगुळा आणि येथील माझ्या आठवणी म्हणून पुढील जीवनात उपयोगी पडतील.

सर्वांना हार्दिक शुभेच्छा

शुभप्रभात :18 मार्च २०१४

Monday, March 17, 2014

बाजारहाट /हॉटेल्स/फूड प्लाझा/मॉल्स इ.
(Market/Hotels/ Food Plaza/ मॉल्स etc.

आजपर्यंत मी "काहीतरी "ह्या सदरात "विविध विषयावर "कितीतरी" लिहिले आहे.रोज नवीन नवीन विषय डोक्यात येतात नुसते येऊन गप्प बसत नाहीत तर थैमान घालतात.मग थोडफार खरडतो.पण आता वेळ अगदी कमी आहे.मायदेशी परतण्याचे वेध लागले आहेत.त्यामुळे फेस् बुक post विषय आता थोड्याफार प्रमाणात बाजूला पडेल.तरीसुद्धा जाता जाता... येथील काही प्रचंड बाजार हॉटेल्स आणि मॉल्स ह्या विषयावर नुसते प्रोक्षण करणार आहे.कारण प्रत्येकावर स्वतंत्रपणे वेळ आणि जागे अभावी लिहिणे अवघड आहे.

1)SAFEWAY:सेफवे : अमेरिकेन पद्धतीचे मोठ्ठे स्टोअर/दुकान आहे.ही साखळी पद्धतीची स्टोअर्स असून ह्यात काही मिळत नाही असे काही नाहीच.किराणा,सौंदर्य प्रसाधने,भाजीपाला,फळे आणि सर्व प्रकारची फुले,नित्योपयोगी वस्तू,बेकरी उत्पादने,फराळ/भोजन, दारू इ.सर्व मुबलक प्रमाणावर मिळते.ग्राहकवर्ग बराचसा स्थानिक/ अमेरिकन असतो.

2)CASTCO: कॉस्टको------ही पण साखळी असलेली अति प्रचंड स्टोअर्स आहेत.प्रामुख्याने सभासदांसाठीच आहेत.येथे येणारा ग्राहक हा गाडीतूनच येतो आणि खरेदीसाठी गाडा घेऊनच आत शिरतो.(अर्थात गाडीचे कौतुक अमेरिकेत तरी कुणालाच नसते.जीवनावश्यक गोष्टी मध्येच तिला बसवले आहे)मी हे स्टोअर पाहून चक्रावलोच.शबनम बाग किंवा थैली येथे उपयोगी नाही.trollyच/हात गाडीच पाहिजे.

3) LOWES/HOME DEPOT : घर बांधणीसाठी असलेली ही प्रचंड स्टोअर्स.जवळ पैसे आणि घर बांधायची इच्छा असलेल्या माणसाला येथे खिळ्यापासून छप्परापर्यंत सर्व वस्तू मिळतात.फक्त भरल्या पाकिटानेच यायचे आणि घर घेऊन जायचे.

4) OFFICE DEPOT/OFFICE MAX; कोणत्याही कार्यालयात लागणारी सर्व प्रकारची स्टेशनरी येथे मिळते.फक्त मला २०१४ ची पाहिजे तशी डायरी मात्र संपूर्ण स्टोअर पालथे घातले तरी मिळाली नाही.हेही दुकान म्हणजे स्टेशनरी सामानाची वखारच आहे

5)FRYIES.:ELECTONICS वस्तू आणि संबधीत सामानाचे प्रचंड वास्तूतील अत्यंत रेखीव आणि देखणे स्टोअर.संगणक,दूरदर्शन संच ,फोन्स,क्यामेरा, calculators,CDS/DVDS,मोबाईल,इ.इ. आणि असे बरेच काहीतरी खच्चून भरले आहे.

6)IKEA : हे तर जगप्रसिद्धच आहे.सर्व प्रकारचे सामान घेऊन माणसे घरीच वस्तूची जोडणी करतात.अनेक प्रकारचे लहानमोठे फुर्निचर,आणि असेच सर्व काही.मिळते.

7)TARGET,KOHLS,WALLMART हे प्रचंड प्रमाणात सर्व काही उपलब्ध असणारे मॉल्स आहेत.
8)BABYRUS/TOYS :लहान मुले आणि नवजात अर्भकांसाठी लागणारे सर्व उपलब्ध.
9)SPORTS & BASEMENT; सर्व प्रकारचे खेळाचे साहित्य मोठ्या प्रमाणावर मिळते
10)नमस्ते प्लाझा/इंडिया फ्रेश :भारतीयांना लागणारे आहारविषयक सर्व खाद्य पदार्थ,किराणा माल ,भाजीपाला दूधदुभते,धान्ये/कडधान्ये मिळतात.स्वयंपाकघरातील लागणारे सर्व काही मिळते.

पिकॉक,चाटभांडार ,राधे चाट,दिदीज,मद्रास कॅफे,सर्वान्ना भवन,येथे सर्व प्रकारचे भारतीय पद्धतीचे अल्पोपहार/भोजन मिळते.विशेष म्हणजे अनेक अमेरीकन्स आणि चायनीज लोक देखील आपले पदार्थ आवडीने खाताना दिसतात.

शनिवारी/रविवारी येथी भाजीपाला, फळा फुलांचा बाजार भरतो.तो मुद्दाम बघायला मी गेलो होतो.एक नवीन अनुभव आणि जरा गमंत म्हणून.बाकीचेही बरेच काही येथे विक्रीस ठेवतात.

शुभप्रभात :१७ मार्च २०१४
See More
Like ·

Sunday, March 16, 2014

फेसबुकच्या पंढरीत: FACEBOOK PANDHARI

माझे येथील सध्याचे जानी दोस्त श्रीयुत फेस्बूकराव ह्यांच्या १० व्या वाढदिवसानिमित्त ४ फेब्रुवारीला केलेल्या माझ्या अभिष्टचिंतनपर पत्रात मी त्यांना ग्वाही दिली होती की येथून निघण्...याआधी उभ्या उभ्या का होईना वेळात वेळ काढून तुम्हाला भेटायला येईन.ते त्यांना दिलेले आश्वासन मी आजच पूर्ण केले ह्याचा मला आनंद होत आहे.

कालपरवाच मी गुगल संस्थानला भेट देऊन आलो आणि आजच सकाळी रविवारची सुट्टी असल्याने पहिले काम म्हणून फेसबुक ह्या जगातील दुस-या एका साम्राज्याला भेट द्यायला गेलो.कारण आता ३/४ दिवसातच आम्ही मायदेशी परतणार आहोत.
गेल्या ६ महिन्याच्या येथील मुक्कामात निर्जीव फेसबुकने जेवढे सहकार्य केले,जो मनस्वी आनंद दिला तेवढे कोणत्याही सजीव माणसाला जमले नाही.ऐन कडाक्याच्या थंडीत बाहेर जायला जमायचे नाही तरीपण घरात वेळ जाण्यास internet आणि फेसबुक होते म्हणून बरे त्यामुळे इतरांप्रमाणे मी येथे बोअर झालो नाही किंवा मला कंटाळा आला नाही.म्हणून फेसबुकरावांशी माझी एवढी घनिष्ट मैत्री झाली.

आज सकाळी ११ वाजता आम्ही मेन्लो पार्क, विल्लो रोड येथे असलेल्या फेसबुक कार्यालयाला भेट देण्यास गेलो होतो.पण रविवार असल्याने तसा शुकशुकाटच होता.तो भाग म्हणजे येथील बे एरिया होता.थोडीफार गाड्यांचीच वर्दळ सुरु होती.माणसांची वर्दळ गेल्या सहा महिन्यातसुद्धा कोठे दिसली नाही तर येथे कोठली दिसणार? कार्यालयाकडे जाण-या रस्त्याच्या वळणावर एक चौथरा होता आणि तेथे फेसबुक लोगो/ट्रेडमार्क दाखविणारा मोठा बोर्ड होता.तेथे अनेक हौशी प्रवासी फेसबुक भेटीचा
पुरावा म्हणून फोटो काढून घेतात.आज तेथेही कोणीतरी " तो आणि ती " फोटो काढून घेण्यासाठी दुस-याची वाट पाहत होते.तेवढ्यात आम्ही तेथे टपकल्याने हे सत्कर्म आम्ही पार पाडले. आतल्या परिसरात दोन तीन मोठ्या कार्यालयीन इमारती दिसत होत्या इतकेच.पण वातावरण "बंद "किंवा "कर्फ्यू "असल्यासारखे वाटत होते.रविवार असल्याने सर्व माफ होते..आम्हीही काही फोटो त्याच चौथ-यावर काढले आणि कृतकृत्य झालो असे समजून परतीच्या प्रवासासाठी गाडीत जाऊन बसलो.अशा प्रकारे फेसबुक भेटीचे घोडे गंगेत न्हायले एकदाचे.पण आता "फेसबुकचे कार्यालय बघायचे राहिले" ही रुखरुख तर रहाणार नाही.हे काय कमी आहे?

शुभप्रभात:१६ मार्च २०१४
See More — at Facebook HQ.

Saturday, March 15, 2014

"गुगल "साम्राज्याला भेट :सर्वत्र गुगलच गुगल' GOOGLE & GOOGLE

इकडे गुगल / तिकडे गुगल. वर गुगल /खाली गुगल.समोर गुगल/ मागे गुगल
अलीकडे गुगल /पलीकडे गुगल थोडक्यात काय इथून तिथून गुगल आणि गुगलच.

काही दिवसापूर्वी 'सकाळ-मुक्तपीठ "मध्ये एका महिलेने' गुगल भेट'ह्या विषयावरील लिहिलेला एक लेख येथे माझ्या वाचनात आला.मला हा लेख आवडल्याने मी तो facebook मध्ये share केला. तेंव्हापासून "...आपल्याला अशी संधी मिळेल का?गुगलचे प्रचंड संस्थान पहाता येईल का?"असे मनातून सारखे वाटे.इतिहासाच्या पुस्तकात शाळेत असताना प्राचीन काळच्या विजयनगरच्या साम्राज्याचे महात्म्य वाचले होते पण अर्वाचीन काळच्या गुगल साम्राज्याचेही महात्म्य फार मोठे आहे.संपूर्ण दुनिया "गुगल "ने अनेक स्तरांवर काबीज केली आहे.एक gmail ID सोडला तर माझेही गुगलशी फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत असे काही नाही.पण माझ्या सुदैवाने येथील Mountain view उपनगरातील ह्या अतिप्रचंड संस्थानाला भेट देण्याचा योग मला आला नव्हे मी आणला.प्रखर आणि प्रबळ इच्छा असली म्हणजे मार्ग सापडतो ह्याचे हे माझ्या जीवनातील आणखी एक उदाहरण आहे.पहिले पहिली अमेरिकेची भेट आणि दुसरे अमेरिकेतील गुगलची भेट. साठा उत्तराची गुगल भेटीची ही कहाणी ऐका तर मग.

आमच्या येथील निवास संकुलात पंजाबचे एक सेवानिवृत्त प्राध्यापक रहातात त्यांचा मुलगा आणि सून दोघेही 'गुगल'मध्येच नोकरीला आहेत.माझी आणि प्राध्यापकांची चांगली मैत्री आहे.दर शुक्रवारी कर्मचा-यांच्या कुटुंबियांना मोफत गुगल्दर्शन मिळते.ह्याचा लाभ घेतल्यानंतर त्यांनी मला सर्व वृतांत सांगितला.मग गप्पांच्या ओघात मी पण गुगल भेटीची याचिका त्यांच्याकडे दाखल केली. आणि विशेष म्हणजे त्यांच्या पुत्राने खुल्या मनाने माझी विनंती लगेच मान्य केली आणि मी कालच शुक्रवार असल्याने गुगल भेटीच्या मोहिमेवर निघालो. Mountain view अम्फीथेटर पार्कवेमध्ये गुगलच्या अनेक इमारती/कार्यालये आहेत.दुपारी 1 ला गेलो तेंव्हा गुगल दरबार पाहून चाटच पडलो.माझे परिचित स्वागताला दारात आलेच होते.लगेच आम्ही स्वागतिकेत जाऊन तेथील नियमानुसार नोंदणी करून बक्कल नंबर छातीवर अडकवला आणि उजळ माथ्याने सर्वत्र मुक्तपणे संचार करू लागलो.प्रथम मुख्य विभागात असलेला पृथ्वीचा मोठा गोल आणि त्यावरील गुगलचे साम्राज्य फिरत असलेला नकाशा रंगीत लाईट प्रकाशात पाहिला.नंतर कर्मचारी/अधिकारी ह्यांच्या संपूर्ण तांत्रिक असलेल्या केबिन्स/क्युबिकल्स पाहिल्या.एका इमारतीतून दुस-या इमारतीत जाण्यासाठी खास बाईक्स म्हणजे सायकली आहेत.त्याच सुमारास लंच वेळ असल्याने अनेक भारतीय मंडळी दिसून आली.चिनी माणसांशिवाय आता अमेरिकेचा विचारही करता येत नसल्याने येथेही भरपूर चायनीज दिसले. पेट्स म्हणजे आपल्या मोत्यालाही कार्यालयात घेऊन काहीजण आले होते त्यामुळे फिरताना मी मात्र उगीचच अस्वस्थ होत होतो.जीम्स विभागही बघितला.शेजारीच स्विमिंग पूल आहे.एवढ्या मोठ्या कर्मच-यांसाठी ४ मोठी भोजन् गृहे असून सर्व कर्मचा-यांना त्यांच्या देशाच्या पद्धतीने भोजन मिळते आणि ते सुधा मोफत म्हणे.कोठेही मानवी श्रम नसून यांत्रिकी करणच असते. विशेष वाटणारी गमतीची बाब म्हणजे त्याच आवारात कंपनीतर्फे फिरती हेअरकटींग सलून गाडी दिसली.कामाच्या प्रचंड भाराबरोबरच कोणाच्याही शिरावर विपुल केशसंभार नको आणि कोणालाही' ह्या 'साठी बाहेर जायला लागू नये.सर्वांची डोकी हलकी रहावीत म्हणून अशीही काळजी व्यवस्थापनाने घेतल्याचे हे पहिले उदाहरण मी पाहिले.मजा वाटली.काही विभाग मात्र गोपनीय असल्याने दुरूनच बघितले.नवीन इमारतींचे बांधकामही सुरु असल्याने थोडाफार बदल झाला होता.शेवटी गुगल ह्या कंपनीच्या स्टोअरमध्ये आम्ही आलो.तेथे विक्रीसाठी असलेल्या प्रत्येक वस्तूवर गुगलचा ट्रेडमार्क होता.कपडे टी shirts,jackets,bags pens अशा कितीतरी वस्तू होत्या. गुगलभेटीचा पुरावा म्हणून मी पण ' ते ' टी shirts घेतले.आणि निरोप घेण्यास लागलो तेंव्हा यजमानांचा अतिथिदेवो भव भाव उफाळून आला आणि लंच शिवाय जायचे नाही अशी प्रेमाची धमकी मला दिली. नंतर आम्ही
भारतीय पद्धतीचे शाकाहारी भोजन घेतले.विविध रुचकर पदार्थांची रेलचेल होती.विशेष म्हणजे भोजनाची भैरवी स्वादिष्ट "दहीभात "रागाने झाली.आम्ही फोटोही काढले.नंतर मात्र मी मित्राचे मनापासून आभार मानून निरोप घेतला.

जगात कोण कुठे आणि कसा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.एवढ्याश्या ओळखीवर केवढे मोठ्ठे काम झाले.ज्याप्रमाणे "मी आयुष्यात भीमसेनजी आणि कुमार गंधर्व ऐकले आहेत,अत्रे आणि पु लंची भाषणे ऐकलीत "असे आनंद/ अभिमानाने म्हणतो त्याच चालीवर आता "मी गुगल साम्राज्यही पाहून आलोय "असे सांगेन.कहाणी सफल संपूर्ण.

शुभप्रभात :१५ मार्च २०१४
See More
1Like · · Promote ·

Thursday, March 13, 2014

दिसामाजी काहीतरी ते :

नवी मुंबई मेरी जान-(स्वेच्छा - एकांतवासाची ७ वर्षे )
नेरूळ -CBD बेलापूर

माझ्या भारतीय स्टेट बँकेच्या ४२ वर्षाच्या नोकरीची नांदी जरी इचलकरंजी ब्रान्चला सुरु झाली असली तरी भैरवी मात्र जुई नगरजवळील नेरूळ आणि CBD बेलापूर येथे झाली.एकदा तरी आपली बदली मुंबईला व्हावी असे मला वाटे पण तेथील गर्दी आणि मनस्वी उकाडा ह्यामुळे नको वाटे.त्यामुळे मुंबईला बदली झाली तर हातात ब्रीफकेस ऐवजी... पाण्याची बादली आणि टॉवेल घ्यावा लागेल असे मी ब-याच वेळा गमतीने म्हणत असे.तरीपण मुंबई आणि मुंबईकरांचे जीवन/रहाणीमान ह्याबद्दल आकर्षण होते.उगीच "नाही "कशाला म्हणू? त्यामुळे नशिबात मुंबई नाही तरी नवी मुंबईत रहाण्याचा योग आला.पर्वती आणि शनवार वाडा परिसरातील अनुभव घेतल्यावर आता सर्वार्थाने विशाल महासागराच्या काठचे आयुष्य अनुभवयाचे होते.जुलै 1999 मध्ये पहिली अमेरिकेची वारी करून आल्याबरोबर हातात CBD बेलापूर चा झेंडा घेतला.बदलीपुर्वी एकदा हे "स्थळ" पहावे म्हणून मी आधी येऊन गेलो होतो.सर्वच दृष्टीने हे सोयीस्कर होते.काही कौटुंबिक जबाबदारीमुळे मात्र मी नेरूळच्या बँकेच्या flat मघ्ये एकटाच रहात होतो.अधून मधून घरची मंडळी पुण्याहून येत आणि बहुतेक शनिवार रविवार मी पुण्याला जात असे.पुण्याचे आकर्षण आणि प्रेम आणि उप जीविका म्हणून मुंबईचे जगणे अशा कात्रीत मी सात वर्षे मस्त मजेत काढली.पु.ल. नी.म्हटलेच आहे ना प्रत्येक माणसाची जीविका वेगळी आणि उपजीविका वेगळी असते.मी पण ह्याला अपवाद नाही.

आतापर्यंत मी अनेक लहानमोठ्या शाखामधून काम केले.झोनल ऑफिस चाही अनुभव घेतला होता.पण आता हे central office/Corporate center पोस्टिंग असल्याने तसे मनावर थोडे दडपण होतेच.त्यामुळे पहिल्याच दिवशी येथील वातावरण,विविध सर्कल्समधून आलेले उच्चपदस्थ अधिकारी,त्यांचे बोलणे चालणे, रीतीरिवाज आणि एकप्रकारची वेगळीच शिस्त पाहून माझी अवस्था अलीबाबाच्या गुहेत गेल्याप्रमाणे झाली होती. त्यामुळे सर्वोच्च बॉसकडे पहिल्या सलामीला जाताना वातानुकुलीत hall मध्येही घाम फुटला होता .माझ्या पाठीवर RECEIVED/ACKD हा रबर stamp एकदा पडल्यावर मग मात्र मी माझी bating जी सुरु केली ती निवृत्तीच्या अखेरच्या दिवसापर्यंत. बरीच मंडळी मला ओळखणारी आणि ओळखून असणारी भेटली. पहिल्याच आठवड्यात बँकेच्या येथील स्टाफ वेल्फेअर आणि मराठी सांस्कृतिक् विभाग तर्फे माझी जगजाहीर आत्रेय छंदाबद्दल मुलाखत झाली.त्या दिवसापासूनच शेवटच्या दिवसापर्यंत मी नुसता डेबिट क्रेडीट करणारा माणूस नसून काहीतरी "वेगळा "आहे अशी माझी प्रतिमा झाली त्यामुळे अनेक मराठी आणि बिगर मराठी माणसेसुद्धा माझ्या मैत्रीच्या प्रेमात पडली.ही माणसे निवृत्तीच्या इतक्या वर्षानंतरही माझ्याशी संपर्क ठेऊन आहेत.माणसाला दुसरे काय हवे असते?"केंव्हा एकदाचा (घरी )जातोय "अशी वाट मी कोणालाही पहायला लावली नाही. मला अनेक मित्रांचे सहकार्य,आदर आणि प्रेम मिळाले असल्याने मी संतुष्ट आहे.७ वर्षाच्या काळात बँकेतील अनेक साहित्य-संगीत,सांस्कृतिक कार्यक्रमात मी माझ्या कुवतीप्रमाणे भाग घेत होतो.एकदा "अत्रे साहित्य दर्शनही "भरविले होते. माझ्या ह्या उचापती/हालचाली बघून VRS स्कीम आली तेंव्हा तत्कालीन महाव्यवस्थापक मला नेहमी म्हणत" Mr.Bokil you should motivate the other staff members also."

आमच्या बँकेची housing कॉलोनी ४/५किलो मीटर अंतरावर नेरुळ येथेच असल्याने ऑफिस सुटल्यावर १० मिनिटातच घरी येत असे. असे आणि एवढे महान सुख अन्य मुंबईकरांना दुर्लभच एकूण काय मी पुणे आणि मुंबई आनंदाने रहात असे. आमच्या वसाहतीत मध्यभागी एक शिवमंदिर आहे.हेच सांस्कृतिक केंद्र होते.होळीचा सण मोठ्या उत्साहात पार पडे नवरात्रात गरबाही जोरात चाले...कोजागिरीचा आनंदही सर्वजण मनसोक्त लुटत.मराठी माणसांचे गणेश मंडळ दर चतुर्थीला प्रत्येक सभासदाच्या घरी अथर्वशीर्ष पठण करीत.ह्या निमित्ताने का होईना चार मराठी माणसे एकत्र येत.आता बहुतेक या मंडळाचेही विसर्जन झाले असावे असे वाटते.माझ्या येथील मुक्कामात मी वाशी ,चेंबूर,दादर आणि विलेपार्ले येथे बरेच साहित्य संगीताचे कार्यक्रम स्वतःच्या डोळ्यांनी आणि कानांनी अनुभवले आहेत. कारण हीच माझी जीविका,आणि SBI ही उपजीविका होती. सकाळी योगासन वर्ग असे.प्रभातफेरीला नव्या मुंबईची मलबार हिल असलेल्या पारसिक हिलवर जात असे.तेंव्हा नुकतेच झुन्जुमुजू होत असे आणि सूर्योदयाचे सौंदर्य पाहण्यास मिळे.टेकडीवरून जे विहंगम दृश्य दिसे ते काय वर्णावे ?ह्या ७ वर्षाच्या काळात मला आमच्या "पद्मिनी "ने (म्हणजे कारने )चांगलेच सहकार्य दिले.बँकेत जातायेताना मी क्वचितच एकटा असे.माझ्या गणगोतातील कुणीतरी गाडीत असेच.आता" पद्मिनी "गेली आणि ते आनंदाचे दिवसही संपले.राहिल्यात त्या सुखदुखाच्या आठवणी.आता डोळ्यासमोर अनेकजण आहेत ते ह्रद्यात पण आहेत.कितीजणांचा नामोल्लेख करायचा हेच कळत नाही.सर्वजण मला माफ करतील असे वाटते.

१६ जुलै १९६४ साली खांद्यावर घेतलेली SBI ची पताका मी ३० एप्रिल २००६ ला खाली ठेवली.नोकरीच्या काळात अनेकजण जीवाला जीव लावणारे भेटले.ज्यांच्याशी बोलण्याने सात्विक आनंद समाधान मिळते असेही बरेचजण आहेत.पण आता एकेकजण ह्या मोहमयी दुनियेतून EXIT घेत असल्याच्या बातम्या कळतात तेंव्हा मात्र "संध्या छाया भिवविती हृदया "हे आठवते.

शुभप्रभात:१३ मार्च २०१४

Tuesday, March 11, 2014

गणपतीच्या गावात आणि' देवां'च्या देव आळीत
पेणेतील रम्य दिवस :

१९५८ ते १९६२ हा चार वर्षाचा काळ म्हणजे माझा'बालपणीचा काळ सुखाचा' किंवा 'रम्य ते बालपण' ह्याच वर्णनाला एकदम 'फिट्ट' बसणारा असा आहे.माझ्या वडिलांची बदली पनवेलहून( तत्कालीन कुलाबा जिल्हा ) पेणला झाल्याने आमच्या कुटुंबाची पालखी सातारहून पेणला आली.माझ्या आईला पण तेथील बालवाडीमध्ये नोकरी मिळाल्याने आवडो न आवडो रडत रडत ...आणि धुसफूस करतच मी पेणला आलो आणि पेण सोडताना देखील भरल्या आणि वाहत्या डोळ्यानीच परत सातारच्या गाडीत बसलो.वास्तविक "पोटासाठी भटकत जरी ..."म्हणूनच कोकणातील ह्या पुण्याला म्हणजे पेणला यावे लागले. तरी पण आज ६० वर्षे झाली तरी पेणचे प्रेम,ओढ यत्किंचितही कमी झाले नाही.पुण्यातील पेणकर स्नेहमेळाव्याला मी अनेकदा हजर राहिलो आहे.केवळ ह्याच कारणामुळे.तसं पाहिलं तर पेणमध्ये आमची स्थावर जंगम मालमत्ता,घरदार,जमीनजुमला,पोह्याची गिरणी, मिठागर किंवा गणपतीचा कारखाना वगैरे काहीही नाहीये.उराशी जवळ बाळगळाय तो ह्या चार वर्षाचा आनंद.कोणाच्याही भूतकाळाच्या आठवणी कधीच गोड गोड नसतात.काही आंबट ,तुरट आणि खारट पण कडू नाहीत अशाच असतात.माझे माध्यमिक शाळेचे शिक्षण येथील पेण प्रायव्हेट हायस्कुल येथे झाले. २०१२/१३ सालीच आम्ही शाळेत 1962च्या SSC ब्याचचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.हळूहळू पिकत चाललेली पाने त्यादिवशी मात्र एकदम ताजी टवटवीत आणि हिरवीगार दिसत होती.प्रत्येकजण "किती किती सांगू तुला" असे वाटून दुस-याशी बोलत होता.गप्पा टप्पा ,टिंगल टवाळ्या,चेष्टा मस्करी आणि आठवणी काढत असतानाच सायंकाळ केंव्हा झाली ते कळले.नाही."त्या "
दिवशी आपण आजीआजोबा आहोत हे विसरून आपण इ.१० वी ब चे विद्यार्थीच आहोत असे प्रत्येकजण समजत होता. निदान मी तरी तसे समजत होतो.

पेणला आल्यावर सुरवातीला आम्ही हनुमान आळीतील नेने वाड्यात पोटभाडेकरू म्हणून रहात होतो नंतर मात्र भाडेकरूची बढती मिळाल्यावर देवांच्या देव आळीत रहाण्यास गेलो.ह्या आळीत देव आडनाव असलेली अनेक घरंदाज कुटुंबे असल्याने ही आळी "देवआळी" म्हणून प्रसिद्ध आहे.आम्ही भाऊराव देव ह्यांच्या वाड्यात रहात होतो.शाळेतील अनेक मित्र परिवार तेथे आणि जवळपास रहात होता.माझा गोतावळा मात्र सर्व देव कुटुंबामध्ये होता.त्यामुळे' देवांचा सहवास' मला लहानपणापासूनच मिळतो आहे.विशेष म्हणजे साहित्य-संगीत आणि सांस्कृतिक हालचाली आळीत नेहमी मोठ्या प्रमाणावर साज-या होत.ती परंपरा अजूनही सुरु आहेच.सार्वजनिक गणेशोत्सव,गोकुळाष्टमीचा गोविंदा,आणि शिमगासण हे धुमधडाक्यात साजरे होत.पेशवे देवांच्या घरी वामनद्वादशीला,आणि मंगळागौर जागवायला समस्त बालगोपाल मंडळी हिरीरीने भाग घेत.ह्याच वाड्यात Badminton Court असल्याने अनेक सामने होत.पावसाळ्यात अनेक घरांच्या विहिरीत सर्वजण मनसोक्त डुंबत.आमचे घरमालक हे संगीतप्रेमी असल्याने संगीताच्या मैफली मोठ्या माजघरात आणि सुरवातीला बत्तीच्या उजेडात मी ऐकल्या आहेत.पेणमध्ये आम्ही होतो त्यावेळी वीज नसल्याने कंदीलच सर्वांना प्रकाश देत आणि प्रकाशात आणीत.माझी जन्मभराची ऐतिहासिक आठवण म्हणजे ह्याच घरात कंदिलाच्या उजेडात वडिलांनी आचार्य अत्र्यांचा दैनिक "मराठा"तील "सती उषा भार्गव " हा अग्रलेख माझ्याकडून मोठ्याने वाचून घेतला.
त्यामुळे माझ्या आत्रेय छंदाची हे घर म्हणजे गंगोत्रीच आहे.तसेच २९ एप्रिल १९६०रोजी मला अत्र्यांचे प्रथम दर्शन आणि भाषणही पेंण येथेच ऐकायल मिळाले त्यांची स्वाक्षरी मी घेतली आणि तीच जगभर आता मी सर्वांना दाखवतोय.ही घटनाही मला मोलाची वाटते. सुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव हेही देवआळी करच. "विसरशील खास मला'
हे त्यांचे भावगीत जन्माला आल्याबरोबरच मी आमच्या वाड्यात ऐकले आहे.ही आठवणही मी जपून ठेवली आहे.पाण्यासाठी आम्ही विहिरीचा म्हणजे पोह-याचा उपयोग करायचो.कितीही पोहरे उपसले तरी विहीर भरलेलीच असे आणि दिसे.माझ्या पेणच्या सुखद स्मृतीचे पोहरे देखील असेच उपसले तरी आठवणीची विहीर भरले लीच
राहील.

आताही कोणी पेणकर भेटला म्हणजे त्याच्याशी बोलताना मी चावडी ते रामवाडी व्हाया मिरची गल्ली अशा आठवणी काढतो आणि वर्तमान पत्रात पेणची कसलीही आणि कोणतीही बातमी मोठ्या आत्मीयतेने वाचतो.कारण प्रेम ओढ आणि आत्मीयताएवढेच मी जवळ बाळगले आहे.काही कार्याच्या निमित्ताने
पेणकर आणि देवआळीकर भेटले म्हणजे जुन्या गजाली
सुरु होतात.गप्पांचा फड जमतो.क्षणभर का होईना हल्लीचे आपले वयोमान विसरायला होते आणि पुन्हा मी "रम्य त्या बालपणात" गुडूप होतो.कोणी काही का म्हणेना.

शुभप्रभात:११ मार्च २०१४

Sunday, March 9, 2014

दिसामाजी काहीतरी ते :

गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या :

आज १० मार्च २०१४ माझी नूतन नात चि.मीरा हर्षवर्धन बोकील ही दोन महिन्याची झाली.त्यानिमित्ताने आंम्ही तिचा अधिकृत नामकरण समारंभ म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर बारसे मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केले.मुद्दाम रविवार निवडला होता.त्यामुळे सर्व निमंत्रित मंडळी लेकी सुना इष्ट मैत्रिणीसह बारशाला येऊ शकली.

आमच्या येथील Avalon Community मध्येच असले...ले एक क्लब हाउस ह्यासाठी भाड्याने घेतले होते.सर्व वातावरण अगदी मराठमोळे होते.समारंभ स्थल सर्वांनी सुशोभित केले होते.सजावटीचे साहित्य हे सर्व काही आकर्षक विदेशी थाटाचे होते.लहान अर्भकांचीसुद्धा काय बडदास्त असते. बारीक सारीक वस्तुमध्येही नाविन्य आणि कल्पकता दिसून आली.तरीपण कोणत्याही शुभ समारंभात मिरवणारी फुले-पाने-वेल-आणि केळीचे खुंट नसल्याची जाणीव मला झाली.पण येथे जे काही असेल तेच सर्व प्रफुल्लीत मनाने स्वीकारावे लागते.आपल्याकडील रीतीरिवाजानुसार बाळाचा पाळणा सजवला होता.बालगोपाल मंडळी रंगीबेरंगी फुगे आणि बलून्स ह्यामध्येच मश्गुल झाली होती.मीराच्या दोन्हीही आज्या आपल्याकडील पद्धतीनुसारच सर्व सोहोळा पार पाडत होत्या.त्यामुळे गोविंद घ्या,गोपाळ घ्या,लक्ष्मी घ्या, सरस्वती घ्या ह्याचा नारा संपल्यावर "मीरा "नावावर शिक्कामोर्तब झाले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मीराची आत्या आणि मामामामी ह्या समारंभासाठी खास लांबून आले होते.मीराच्या आजीने सुरेल सुरात म्हटलेला "पाळणा " ऐकल्यावर सर्व उपस्थित मंडळी खुश झाली आणि जणू काही आपल्याकडील एकाद्या घराच्या माजघरातच हा कार्यक्रम पार पडतोय असे वाटू लागले.

नामकरण झाल्यावर मुख्य समारंभ म्हणजे "स्वीट डिश "चा.येथील "पिकॉक " ह्या लोकप्रिय कॅटरर्सने सर्वाना तृप्त केले.नंतर सर्वांचे फोटोसेशन झाले.चि.मीराने अनेकांची हौस हु की चू न करता पूर्ण केली आणि आपले फोटो काढून दिले.गप्पा टप्पा झाल्यावर चहापान झाले आणि निमंत्रित आपापल्या घरी परतू लागले.

ह्या कार्यक्रमानंतर आता आम्हीही मायदेशी जाण्याची तयारी करणार आहोत.बघता बघता चुकलो हा हा म्हणता येथे येऊन सहा महिने होत आले.मायबाप अमेरिकन सरकारने तारखेची लक्ष्मणरेषा मारून दिली आहे तिचा मान राखलाच पाहिजे नाही का?

शुभप्रभात :१० मार्च २०१४

Friday, March 7, 2014

दिसामाजी काहीतरी ते :--

फौजदारांचे फलटण : माझे आजोळ

जसे बोकील- बर्गे चे कोरेगाव ,जगतापांचे सासवड तसेच फौजदारांचे फलटण.म्हणजे फलटण आणि साखरवाडी येथे फौजदार हे आडनाव असलेली अनेक कुटुंबे आहेत.मन हे चंचल असते असं म्हणतात (कुणी म्हटलंय हे कुणालाच खरं माहित नसते पण आपली म्हणायची पद्धत म्हणून मीही तेच म्हटले ) दोनतीन दिवसापूर्वी सन होजे (san jose)येथे घिरट्या घालणारे माझे मन आज सकाळपासून माझ्या आजोळ...ी म्हणजे फलटण येथे गेले आणि आणि आज आपल्या आजोळबद्दल "काहीतरी " चार सहा वाक्ये नोंदवावीत असे वाटले आणि केली सुरवात......

काही दिवसापूर्वीच "मामाच्या गावाला जाऊ या "ह्या मध्ये फलटण आलेच होते.माझ्या आजोळचे आडनाव फौजदार.सर्वांनाच' असे ' कसे आडनाव असते ह्याचे नवल वाटे.माझ्या लहानपणी सर्वाना मामलेदार आणि फौजदार हीच जोडगोळी माहित होती.काही वर्षापूर्वी पुण्यात भरलेल्या फौजदार कुटुंबियांच्या स्नेहमेळाव्यात' हे ' आडनाव कसे पडले ही माहिती सर्वांच्या प्रमाणे मलाही प्रथमच म्हणजे वयाची साठी ओलांडल्यावर मिळाली.तसे मला फार बालपणापासूनच फलटण आणि आजोळच्या सर्व फौजदारमंडळीबद्दल अतिशय प्रेम ओढ आणि आपुलकी आहे सर्व काही नैसर्गिकच आहे.कृत्रिमपणाचा लवलेशही नाही.त्यामुळे पुण्यातील फलटण वासियांचा मेळावा आणि फौजदार मंडळींचे स्नेह संमेलन ह्या दोन्ही प्रसंगी मी आवर्जून हजर होतो.सांगायचा मुद्दा असा की "फलटण "हे देहामध्ये पूर्वीपासूनच ठाण मांडून बसले आहे.आज माझ्या डोळ्यासमोर कोरेगाव-फलटण चा झुक झुक गाडीचा प्रवास,लोणंद साखरवाडी गावं,राजेसाहेबांचे राम मंदिर,सद्गुरू काका उपळेकर महाराज, आजोळचे माळवदी घर आहे आणि घरासमोरील हौदावर बसलेली आमच्या आजीची प्रतिमा आहे.(आम्ही आमच्या जन्मदातीला आई न म्हणता तिच्याच आईला म्हणजे आजीलाच "आई "म्हणायचो.एक नवीन विषय.कारण काहीही नाही.एक सवयच होती.)

बालपणी मोठ्या आनंदाने जेंव्हा फलटणला आजोळी येत असे तेंव्हा दारात आल्या आल्याच वाट पाहत असलेली आमची आजी म्हणजेच आई प्रथम आमच्यावरून "तुकडा "ओवाळून टाकत असे.आजकाल हा काय प्रकार असतो हे कोणालाही माहित नसणार.मग घरात गेल्यावर बडबड आणि दंगा सुरु होई.सर्व नवल विशेष अहवाल सादर करायचा.तेंव्हा सर्वांचीच "उदबत्तीची घरे "असत.म्हणजे शेजारधर्म,माणुसकी एकमेकाबद्दल असणारे प्रेम-जिव्हाळा सर्वांच्याच घरातून मुक्तपणे संचारत असे.माझ्या आजोळी गडगंज होता तो आनंद,त्याचे मूल्यमापन करण्याच्या भानगडीत आम्ही कधी पडलो नाही."कणीकोंडा तुझा आहे गोड मांड्याहुनी मला "असे म्हटले की त्यात सर्व आलेच.बाहेरच्या ओसरीवर मोठा झोपाला होता.तिन्हीसांज झाली की परवचा ,रामरक्षा आणि भीमरूपी महारुद्या सर्व बालगोपाल मंडळी एका कोरसमध्ये म्हणत.घराच्या मागील बाजूला काही फुलझाडे होती.न्हाणीघराची बाथरूम झाली नव्हती त्यामुळे तिथं असलेल्या दगडी नक्षीदार चौरंगावर बसून घंगालातले चार तांबे डोक्यावर घेताना मौज वाटे.नाश्त्याला तिखटमिठाचा सांजा असे.अहाहा: कुठे गेले ते दिवस ते घर आणि ती माणसे? आठवणी तरी किती काढायच्या? आणि कशाकशाच्या ?
फलटणला कधी मुसळधार किंवा धो धो पाऊस पडल्याचे मला आठवत नाही.सर्वांचीच घरे माळवदी.घराशेजारीच मोठं परडे होते तेथे शाखा भरत असे.लागुनच असलेल्या वडाच्या झाडाला वटपौर्णिमेला महिलावर्गाची भरपूर गर्दी होई.एरव्ही निवांतपणे सर्वांना सावली देण्याचेच कर्तव्य हा वड करीत असे.ग्यारेजवजा एक जागा तिथे होती तिथे पूर्वी घरचा टांगा असे म्हणे.दारातल्या अंगणात पाण्यासाठी एक हौद बांधला होता.त्याचा उपयोग उभ्याउभ्या टेकण्याची बैठक असा होई. घराजवळच भैरोबाचे देऊळ आहे. घराच्या मागील बाजूला फलटण ची नदी आहे.वाहते असे म्हणत नाही कारण पाणी नसलेली नदीच सदैव डोळ्यासमोर आहे.नदीकाठी असलेल्या दत्तमंदिरात थंडीत कुडकुडत पहाटेच्या काकडआरतीचा आनंद आणि अनुभवही मी घेतला आहे.सायंकाळी "वॉकला" जाणारी माणसे गावचे दैवत असलेल्या संस्थानाच्या श्रीरामाचे दर्शन घेऊनच घरी जात.आजीबरोबर देवळात गेलो की ताजा अंगारा तेथे ती करीत असे. आणि आमच्या कपाळी लावत असे.त्याच देवळात असलेल्या दोन काळ्या रंगाच्या जयविजय ह्या मूर्तींना मी भयंकर घाबरत असे. आजोळी सर्वजण सद्गुरू उपळेकर महाराजांचे भक्त आहेत. "माझे घर "नावाची बालवाडी होती तेथे काही दिवस मी जात होतो असे आठवते.लक्ष्मि नगर,सेन्ट्रल बिल्डिंग्सकडे एकटेदुकटे जाण्यास आम्हाला बंदी होती.तेथील शांती चित्र मंदिरात "कन्यादान,तू सुखी रहा "हे मराठी चित्रपट मी पाहिलेत."झनक झनक ......"सुद्धा चौथ्यांदा फलटण मुक्कामीच
पाहिला.अशा कित्येक आठवणी आहेत.सांगाव्या तितक्या कमीच.

अलीकडे कित्येक वर्षात फलटणला जाणे जमले नाही. मध्यंतरी मात्र हा योग आला आणि मुद्दाम वेळ काढून बुधवार पेठेतील फौजदार वाड्याला भेट देण्यास गेलो.३० एप्रिल १९४६ मध्ये येथेच मी" उगम "पावलो.गेलो तो काय "कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही "हेच आठवले.कुठाय ते घर?हौदावर बसलेली आई तीन मामा,आणि पाच मावश्या?वाडा भिंतीसकट खाली आला होता.आधुनिक पद्धतीचे बंगलेवजा घर मोठ्या दिमाखात उभे होते.नवीन मालकांनी माझे स्वागत केले आणि म्हणाले "हेच तुमचे फौजदारांचे "ते "घर आहे.कोणत्याच खाणाखुणा दिसेनात.दारातूनच मी शेजारील
वडाकडे पाहताच वारा सुटला आणि वडाचे झाड सळसळू लागले. ......................
आता वाडा नव्हता पण वड मात्र होता.निदान तेंव्हा तरी .....

शुभप्रभात :07 मार्च २०१४

Wednesday, March 5, 2014

दिसामाजी काहीतरी ते:

प्रथम तुज पाहता .........

वरील शीर्षक वाचून वाचकाच्या मनात काहीतरी गोड गोड कल्पना/विचार नक्कीच येतील.कोण असेल "ती "?कुणाला पहिल्यांदा पाहिलं?आणि मग जीवाची अवस्था अशी वेड्यासारखी झाली?मित्रानो "ती "म्हणजे अमेरिका.लेखाच्या कपाळावर "अमेरिका "शब्द पाहूनच अनेकांच्या कपाळावर आठी पडायला नको म्हणून जरा मार्ग बदलला.कारण आजकाल अनेकजणांना वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांची अलर्ज्री असते.को...णाला "अमेरिका "शब्दाची तर कोणाला "फेसबुक "ह्याचीच.माझी अमेरिकेची ही दुसरी वारी गेली सहा महिने सुरु आहे पण 1999 मध्ये ८/१० दिवसच येथे आलो होतो त्यावेळच्या आठवणी येतात म्हणून कायमस्वरूपात शब्दांकित करतोय.

१९९९च्या अगदी सुरवातीलाच एका रविवारच्या पुरवणीत "मराठा तितुका मेळवावा ..."असा एक लेख आला होता.त्यात "अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे द्वैवार्षिक अधिवेशन सन होजे (San Jose) येथे जुलै महिन्यात होणार असल्याचे "वाचले.ते वाचल्यापासून आपणही ह्या अधिवेशनाला हजर राहून सातासमुद्रापलीकडे अत्रे साहित्य दर्शन आयोजित करण्याचा प्रयत्न करायचाच असे माझ्या मनाने ठरविले.नेहमीप्रमाणे अनंत अडचणी आल्या. चांगले वाईट अनुभव आले"खरीखुरी माणसे "बघायला मिळाली.कारण लहानपणी "मोठे तितके खोटे" ह्याचा अनुभव आला नाही पण मोठे(वयाने) झाल्यावर मात्र ही म्हण विसरू म्हटले तरी विसरत नाही. मुख्य प्रश्न" आर्थिक व्यवस्था" मोठा "आ "करून सारखा माझा पाठलाग करीत होता.शिवाय तेथील मंडळाचे निमंत्रण, मान्यता,शिवाय गेलोच तर राहण्याची आणि फक्त खाण्याचीच सोय इ.इ.होते.पैशासाठी नवीन झोळी शिवून घेतली आणि इकडे तिकडे चहूकडे धावपळ करू लागलो.अशा परीस्थिती मध्येही काही देवदूत भेटले त्यांचे ऋण/ उपकार जग जाहीरपणे व्यक्त करण्यासाठीच हा प्रपंच मांडला.हे शिवधनुष्य पेलण्यासाठी ज्यांनी माझी पूर्वी कधीही ओळखपाळख नसतानादेखील मोठे अर्थसहाय्य केले त्या अमेरिकेतील महाराष्ट्र फौंडेशनच्या श्री. सुनील देशमुखांना शतश: धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत.माझे पुणे येथील बँकेचे एक सहकारी श्री अजय मुळे ह्यांच्या प्रयत्नाने आणि सहकार्याने मी श्री. देशमुख ह्यांच्या संपर्कात आलो.त्याच प्रमाणे सासवडच्या अत्रे प्रतिष्ठानचे श्री विजय कोलते.माझे बँकेतील मित्र श्री. पी,के.देवधर ,माझे कुटुंबीय,अमेरिकेतील मराठी उद्योजक श्री.प्रकाश भालेराव,अनेक नातेवाईक,आणि मित्र हितचिंतकांच्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे.दुसरे अत्यंत मोठे आणि महत्वाचे काम म्हणजे अमेरिकेतील निवासाची सोय ही होती.पण हा प्रश्नदेखील आमच्या बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक श्री अशोक कळमनकर साहेब ह्यांनी त्यांच्या वैयक्तिक पातळीवरून सोडविला.ह्या बद्दल मी श्री कळमनकर साहेबांचाही अत्यंत ऋणी आहे.त्याचप्रमाणे अन्नुलेखीत प्रत्येक माणसाचा मी मनापासून आभारी आहे.अनेकांच्या खारीच्या वाट्याचेही विस्मरण होणे मला अशक्य आहे.
आता अमेरिकेचा व्हिसा मिळवायचा हे एक अग्निदिव्यच.. नेहमीचेच महाकर्मा कठीण काम होते.मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने त्या वकिलातीमध्ये गेलो होतो.घरी दोन बाग्स भरून सर्व तयारीसुद्धा केली होती.पण व्हिसा नाकारला.कारण मला आणि नकार देणा-या माणसालाही माहित नव्हते.अत्यंत निराश होऊन मंत्रालयाच्या बसथांब्यावर बसलो होतो.कोणत्या तोंडाने पुण्याला परतायचे?घरीच जाण्याची इच्छा होत नव्हती.आणि गेल्यावर रात्री झोप न आल्याने ११ वाजता मंडळाच्या पदाधिकार्यांना अमेरिकेत फोन करून माझी असमर्थता कळवली.व्हिसा प्रकरणाची साठा उत्तराची सफल कहाणी ऐकवली.त्यांनी लगेच वकिलातीला मोठा FAX पाठविला.शेवटी पुन्हा एकदा नव्याने पैसे मोजून वकिलातीचे उंबरे मी झिजवले आणि व्हिसा मिळताच अत्यानंदाने मी अत्र्यांच्या दोन्हीही कन्यांना फोन करून "तुमच्या पपांना घेऊन मी अमेरिकेला जाणार आहे "असे सांगितले.

.मुंबईहून व्हाया होन्ग्कोंग मार्गे मी सन फ्रान्सिस्को विमानतळावर उतरल्यावर ह्या महाकाय देशाची आणि महानगरीची कल्पना आली
1 जुलै १९९९ ला अमेरिकास्थित मराठी जनतेचे अधीवेशन मोठ्या दिमाखात विश्वविख्यात वैद्यानिक डॉक्टर जयंत नारळीकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.पहिल्याच दिवशी येथील नगरीचे दर्शन झाल्यावर अलीबाबाच्या गुहेत गेल्यासारखे वाटले.अत्र्यांच्या मुळेच आपल्याला अमेरिकेचे दर्शन झाले नाहीतर माझ्याजवळ काय होते? वडिलांची शिकवण आणि आठवण झाली. अधिवेशनात श्रीमती आशा भोसले आणि सदाबहार अभिनेत्री माधुरी दिक्षित ह्यांच्या मुलाखती झाल्या.इतरही कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे झाले.माझ्या अत्रे प्रदर्शनाला डॉक्टर नारळीकर,ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर इ.इ. मंडळींनी भेट दिली सर्व अत्रेप्रेमी मराठी माणसे काही काळ "अत्रे युगात "रमली होती.व्ही.शांताराम ह्यांची कन्या अभिनेत्री राजश्री ह्यांचा एक stall माझ्या शेजारीच असल्याने माझी त्यांची चांगलीच ओळख झाली शिवाय कोल्हापूरच्या गप्पाही झाल्या. अधिवेशनाचे सूप वाजल्यावर मी दोन दिवस "मनोरथा चल त्या नगरीला "म्हणत अमेरिकेचे दर्शन घेतले.अहाहा काय सांगू महाराजा?नकोच पुन्हा कधीतरी सांगू.आता आपला ब्लॉग आहेच की.

कालच डे पास घेऊन light रेलने SAN JOSE ला गेलो होतो बस आणि रेल मधून अधिवेशनाचा भलामोठा परिसर दिसला.तो आकर्षक हॉल पाहिल्यावर आठवणीच्या मुंग्यांची रांग सुरु झाली केवळ.जिद्द ईर्ष्या आणि वडिलांनी ठेवलेली ही "लाख मोलाची ठेव "
ह्यामुळेच "अमेरिके प्रथम तुज पहाता आले."..........................

शुभप्रभात : 5 मार्च .२०१४

Monday, March 3, 2014

....म्हणे अगदी अत्रेच दिसताय :



अहो आचार्य अत्रे कुठे आणि मी कुठे?कशाला कशाचाही मेळ कोणत्याच बाबतीत नाही.पण हल्ली काय होत आहे अत्र्यांचा कोणताही कार्यक्रम असला किंवा माझे "अत्रे साहित्य दर्शन" प्रदर्शन असले की अनेकजण "तुम्ही अगदी अत्रेच दिसत आहात"असे म्हणून मला नकोसे करतात.फक्त उंची कमी पडतेय हे पुन्हा वर अलगद ठेऊन देतात. ते म्हणतात ते काही खोटे नाही.कोणतीच उंची म्हणजे शार...ीरिक अथवा बौद्धिक अत्र्यांच्या इतकी माझी नाही.आणि दुस-या कोणाचीही तशी आणि तेवढी उंची असल्याचे मला माहित नाही. असेल असेही वाटत नाही.दिसण्याबद्दल असे कोणी म्हटले म्हणजे त्यांच्या ह्या एकमताशी मी काहीतरी दुमत व्यक्त करतो. आणि "अहो दिसण्यापेक्षा अत्र्यांसारखी माझी बुद्धी असती तर फार बरे झाले असते " असा सिक्सर मारून म्हणण-याच्या कोर्टमध्ये चेंडू परत करतो. दोन वर्षापूर्वी मुलुंड मुंबई येथे माझे मोठे अत्रे प्रदर्शन भरविले होते तेंव्हा तर कहर झाला.अनेकजण बोलण्याची सुरवातच वरील शीर्षक हेच श्री गणेशाय नम: म्हणून संभाषणात आणत होते. कोणाच्या काहीही मताप्रमाणे मी कधी हुरळून जात नाही किंवा अस्वस्थही होत नाही.तरीपण अनेकांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असावे असे वाटल्याने वानगीदाखल फक्त दोनच प्रसंग/किस्से मी शब्दांकित करीत आहे.ह्याच निमित्ताने रसिक वाचक मित्रांना असे सांगावेसे वाटते की माझ्या लिखाणामध्ये ब-याच वेळा आचार्य अत्रे ह्यांचा आवर्जून उल्लेख असतो आणि तो नेहमीच असणार आहे.ह्याचे कारण एकच खालील सूत्र :-

बोकील - अत्रे ===0 0 0

1) सप्टेबर 2007 मध्ये लंडन येथील महाराष्ट्र मंडळाच्या अमृत महोत्सवप्रसंगी मी एलिंग येथील व्हिक्टोरिया हॉल मध्ये अत्रे साहित्य दर्शन आयोजित केले होते. समारंभाचे मुख्य पाहुणे आणि अध्यक्ष होते पदमविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर .पहिल्या दिवशीच सकाळी हॉलवर लवकर जाऊन मी नेहमीप्रमाणे सर्व मांडणी करीत होतो.ह्या वेळी एकखांबी तंबू असतो.अशा वेळी कोणाची मदत असते/नसते.माझी एकट्याची घाई गडबड पाहून तेथे असलेले कृष्णवर्णीय कर्मचारी/माणसे मला शक्य होईल ती सर्व मदत करत होते.भाषा कळत नव्हती पण हाताच्या खाणाखुणा वरून आम्ही कार्य सिद्धीस नेले.तो पर्यंत सकाळी अनेक निमंत्रित मराठी माणसे जमू लागली होती त्या हॉलच्या एक पदाधिकारी (बहुधा मुख्य सुरक्षा अधिकारी)बाई तेथे आल्या होत्या.त्याही माझी चाललेली तयारी बारकाईने पहात होत्या.सर्व तयारी पूर्ण झाल्यावर अत्र्यांच्या मुख्य फोटोला हार घालून फोटो टेबलावर ठेवला आणि
मी हुश्य करीत तेथील एका खुर्चीवर बसलो.तेंव्हा तेथेच उभ्या असलेल्या ह्या म्याडम एकदा " त्या " फोटोकडे पाहत आणि मग माझ्याकडे.असे दोन तीन वेळा झाल्यावर न रहावून त्यांनी मला सरळ विचारलेच "Are you related to him?" मी लगेच म्हणालो "No.No.Not at all" ह्या वर ताबडतोब त्या बाईसाहेब म्हणाल्या " But you look like him only" हे ऐकताच माझ्या डोळ्यासमोर अनेकांचे चेहरे आले.जणूकाही मला म्हणतच होते "आम्ही काय उगाच नाही म्हटलं "महाराष्ट्रच काय पण भारताबाहेरही' हेच' मत. कमाल आहे .की नाही.?

२)कॅम्प एज्युकेशन सोसायटी पुणे ह्या अत्र्यांच्याच शाळेत माझे असेच प्रदर्शन मी मांडले होते.सकाळी ३/४ तास मांडणी झाल्यावर उद्घाटनाचा सोहोळा पार पडला.त्यानंतर प्रदर्शन पाहण्यासाठी शाळेतील सर्वांची गर्दी सुरु झाली.मग प्रत्येक वर्गातील मुलामुलींच्या रांगा सुरु झाल्यावर व्यासपीठाच्या खालीच असलेल्या एका खुर्चीवर जरा थकल्याने मी निवांत बसलो होतो.तेथे एकाबाजूच्या टेबलावर हार घातलेला अत्र्यांचा फोटो होता.मुलांची रांग सर्व पहात/वाचत पुढे सरकत होती.हे सर्व चालू असतानाच एका वर्गाच्या शिक्षिका मोठ्याने हसत/ हसत धावत /धावत मला येऊन म्हणाल्या "अहो सर माझ्या वर्गातली सर्व मुले आताच हे प्रदर्शन पाहून आल्यावर मला (शिक्षिकेला) म्हणाली" बाई हार घातलेल्या फोटोतला माणूस खाली खुर्चीवर बसला आहे मग फोटोत जन्म आणि मृत्यू तारीख कशाला लिहिली आहे ?" हे ऐकल्यावर तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांबरोबर मीही त्या हशात सामील झालो.मी तरी दुसरे काय करणार होतो ?

शुभप्रभात : ३ मार्च २०१४

Saturday, March 1, 2014

ब्लॉग ची पहिली सलामी :

आज 1 मार्च २०१४ .२७ फेब्रुवारीला मराठी दिनानिमित्त माझा ब्लॉग सुरु करण्याचे एक नवीन धाडस मी केले.अनेकांचे सारखे टुमणे कित्येक दिवसापासून सुरु होते.शेवटी केला एकदा(चा ) ब्लॉग सुरु.आता तो कसा आणि किती दिवस तग धरतोय ते पाहू.अर्थात ते वाचकांच्या प्रतिक्रियेवर आणि प्रोत्साहनावर अवलंबून रहाणार आहे. आतापर्यंत इतरांच्याच ब्लॉग विषयी ऐकले होते.कोणत्याही नवी...न उपक्रमाची सुरवात आपण गणेश पूजनाने करतो म्हणून मी पण आज ब्लॉगचा शुभारंभ गणेश आणि आमची कुलदेवता श्री तुरजाभवानी ह्यांना वंदन करून केली. "निर्विघ्नं कुर्महे देवो सर्व कार्येषु सर्वदा" त्याच बरोबर माझ्या साहित्यप्रेमी वडिलांची पण आठवण झाली.कारण त्यांनीच मला "अत्रे " वांग्मयाची गोडी लावली म्हणून नेहमी "व्याज "ह्या शब्दाशी संबंध येऊनही अत्र्यांवर "निर्व्याज " प्रेम आणि भक्ती.माझे वडील नेहमी मला म्हणायचे "तू डॉक्टर हो,वकील हो , किंवा इंजिनियर हो असे मी जबरदस्तीने कधीच म्हणणार नाही.पण तू जे काही करशील त्या क्षेत्रात टोक गाठले पाहिजे.एवढेच माझे म्हणणे आहे.भले तू जोडे शिवलेस तरी चालतील पण लोकांनी म्हटलं पाहिजे की जोडा घालायचाच तर "ह्याचाच ".

आजच एक "शुभारंभ "म्हणून पहिली सलामी केली आहे.मार्चमध्ये मायदेशी परत येणार आहे.तोपर्यंत अशाच काही Posts फेसबुक दिंडी दरवाज्यातून पाठवणार आहे.काही विषय डोक्यात आहेतच.माझ्या अमेरिकेतील प्रदीर्घ वास्तव्याचा मोठा फायदा मला असा झाला की मी काहीतरी लिहू शकतो आणि माझ्याखेरीज दुसरा कोणीतरी ते आवडीने वाचू शकतो.तरीपण माझ्या मर्यादा मला माहित असल्याने मी फक्त कुम्पनापर्यंतच धावणार आहे.वेळ आणि विरंगुळा म्हणून ठीक आहे.पण "लेखक" म्हणून घेणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही.असे मला वाटते. मुंबईच्या माझ्या एका मित्राने" २०१४ मध्ये तुम्ही तुमच्या लेखांचे पुस्तक प्रकाशित केलेच पाहिजे "असा दोस्तीखातर सज्जड दम भरलाय".मुंबई "म्हटलं की "च "येतोच का? तर आणखी एका मित्राने प्रूफ तपासायला येऊ का?म्हणून विचारले आहे.मैत्रीचे नाते हे असे टिकवले आहे.

गेल्या तीनचार महिन्यात मी ज्या post पाठविल्या त्या सर्व ब्लॉगवर घेतल्या आहेत.ह्या प्रांतातले माझे ज्ञानही जेमतेम आहे.हे आवर्जून सांगावेसे वाटते.त्यामुळे ब-याच वेळा गाडी अडते.ह्या बद्दल क्षमस्व.

Blog::::::::http:///www.suhasdbokil.blogspot.com

शुभप्रभात: 01 मार्च २०१४

ब्लॉग शुभारंभ

दिनांक  1  मार्च २०१४
 
शुभारंभ
 
ओम गं गणपतये नम:
 
निर्विघ्नंकुर्महे देवो सर्व कार्येषु सर्वदा :
 
श्री तुरजादेवी  प्रसन्न :
 
सर्वांना मन:पूर्वक  नमस्कार
 
आज मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेपासून जीवनातील एका नव्या आणि वेगळ्या उपक्रमाचा प्रारंभ करताना मला मनस्वी आनंद आणि समाधान वाटत आहे. आतापर्यंत नेहमी दुस-याच्या ब्लॉग विषयी वाचत होतो.त्यामुळे ह्या विषयी उत्सुकता होती.आता अधूनमधून "दिसामाजी  काहीतरी ते "ह्या सदरात काहीतरी ते अर्थातच चांगले लिहिण्याचा थोडा प्रयत्न करणार आहे.कितपत यशस्वी होईन हे सांगता येत नाही.पण फेसबुक वरील POST वर अनेकांनी समाधान व आनंद व्यक्त करून ब्लॉगवर लिहिण्याविषयी प्रोत्साहन दिले त्यामुळेच हा धाडशी प्रपंच करतोय.चुकीबद्दल वाचक प्रेमाने क्षमा करतील अशी आशा आहे.
 
माझ्या अमेरिकेतील प्रदीर्घ वास्तव्याचा हा मोठा फायदा झाला की मी  वाचकांना आवडेल असे  काहीतरी लिहू  शकतो.   ह्या प्रसंगी माझ्या साहित्यप्रेमी वडिलांची प्रकर्षाने आठवण येत आहे.त्यांच्या मुळेच मला अत्रे साहित्याची गोडी लागली आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये जाऊन पोहोचलो.माझ्या लेखनाच्या मर्यादा मला चांगल्या माहित आहेत.म्हणून माझी धाव  कुंपणापर्यंतच  राहणार आहे.हे आजच सांगावेसे वाटते.असो.
 
पुन्हा एकदा सर्वांना वंदन करून आजची पहिली सलामी देत आहे.
 
सुहास द. बोकील  

Friday, February 28, 2014

सफर (एक दिवसाची) (पूर्वार्ध )
( Great America,Winchester, & Mountain View)

आता आमचे मायदेशी परतण्याचे दिवस हळू हळू जवळ येत चालले आहेत.त्यामुळे उरलेल्या दिवसात शक्य असेल ते पाहून घ्यायचे ठरविले आहे.नुकतीच एक दिवसाची साप्ताहिक सफर केली.VTA सिटीबस आणि Light रेल चा Day pass(एकत्र) ज्येष्ठ नागरिकांना (65 च्या वर)केवळ अडीच डॉलरला तर मासिक पास 25 डॉलरला मिळतो.त्याप्रमाणे cliper ...card ही प्रवाश्यांना ठराविक रकमेला विकत मिळते".वय झाल्याने" मी पण ह्या योजनेचा नेहमी लाभ घेत आलो आहे.

सकाळी बाहेर पडतानाच घरीच देवपूजा आणि दमदमीत पोटपूजा उरकली.बस थांब्यावर
एकजण भेटले म्हणजे प्रथम दिसले.बहुतेक ते रेड इंडिअन नसून नुसते इंडिअन असावेत म्हणून आम्ही दोघेही एकमेकांकडे' दयाळू' नजरेने पाहत होतो.कारण येथे कुणी नजरेला नजर देतच नसल्याने" तू नजरेने' हो' म्हटले "असं म्हणायचा प्रश्नच येत नाही.पण आधी बोलायचे कुणी ?मीच.कारण आधी जो बोलतो तो अशिक्षित हे 'आपल्याकडचे' आयात केलेले सूत्र येथलेच.शेवटी मनातल्या मनात देवाचे नाव घेऊन मीच नारळ फोडला आणि चक्क मराठीतूनच चर्चासत्रास सुरवात केली.सामनेवाल्यानेही रोखलेला श्वास सोडला आणि आपण भारतीय,महाराष्ट्र,आणि मुंबईचे असल्याचे सांगितल्यावर दोघानाही भरून आले आणि भरतभेट होणार तेवढ्यात आमची बस आली.बसमध्ये दोघेही शिरलो.मी एक किवा दीड वाक्य तर्खडकरांना
स्मरून बसच्या ओपेरेटरशी इंग्रजीत (हो तेवढ येत आपल्याला) बोललो आणि त्याच्या कडून एक दिवसीय पास खरेदी केला. पाठोपाठ नवीन मित्रही आले आणि दोघेही "किती किती सांगू तुला" ह्या अवस्थेत असतानाच आमचा ग्रेट अमेरिका हा शेवटचा स्टोप आला. तेथे मात्र आमची पांगापांग झाली आणि मी विन्चेस्तेर (Winchester) च्या दुस-या बसमध्ये चढलो.

ही बस santa clara विभागातून म्हणजे county तून जात होती,रस्त्याच्या दुतर्फा अनेक कंपन्या,कार्यालये आणि महाविद्यालये दिसत होती.अनेक आकर्षक इमारती पाहूनच माणूस चक्रावतो.त्यातच असंख्य मोटारींचे ताफे.रस्त्यामधून धावणा-या बसेस.कोठेही गेले तरी मोठे व्यापारी संकुल,हॉटेल्स,बँका,मॉल दिसतातच.बँक ऑफ अमेरिका,वेल्स फरगो बँकांच्या शाखा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आहेत.बसमधूनच ह्याचे निरीक्षण करत असतानाच एका कॉलेजजवळील बसथांब्यावर काही महाविद्यालयीन तरुणतुर्क बसमध्ये शिरले.त्यांची १४ फेब्रुवारीच्या जागतिक सणाची रंगीत तालीम सुरु होती.पुढे Santa clara ह्या ऐतिहासिक रेल्वे स्टेशनला वळसा घालून बस Winchester च्या मार्गाने धावू लागली. येथे बसमध्ये ड्रायव्हर धरूनही मोजकीच मंडळी आत असतात. अनेक Bike म्हणजे सायकलवालेही आपलं घोडं बसच्या पुढील बाजूला अडकवून प्रवास करतात.आणि बसचा ड्रायव्हर(Operator) हाच बसचा सर्वेसर्वा असतो.
त्यामुळे प्रवाशांना सर्व स्तरावर त्याला मदत करावीच लागते." हे माझं काम नाही" हे सारखे वापरून गुळगुळीत झालेले वाक्य येथे ऐकायला मिळणे अशक्यच.
(नंतरची सफर उत्तरार्धात)

शुभप्रभात :
See More
सफर (एका दिवसाची) उत्तरार्ध
(Great America,Winchester & Mountain View)

अनेक मार्गावरून वळणे घेत घेत आमची बस Winchester ह्या शेवटच्या स्टोपवर हुश्य करून थांबली.ओपेराटरला thanks,/ bye bye करत प्रवाशी उतरले.मला क्षणभर आपल्या शिवाजीनगर स्टेशन आणि लगेचच बाहेर असलेल्या सिटीबस stand ची आठवण झाली.VTA शिवाय community बसेस पण प्रवाश्यांची वाहतूक करतात.ज्येष्ठ नागरीकाना इच्छित ठि...काणी VTA एक डॉलर आकारते तर community बसेस फक्त 0 -50 cent घेते.मी ह्या ठिकाणी तासभर थांबून परतणार होतो.इकडे बस stand किंवा स्टेशनवर कॅन्टीन/चहा कॉफी स्टोल इतकेच काय पण साधे स्वच्छतागृह देखील नसते.रस्त्यावरही "ही "सोय नसल्याने फार पंचाईत होते.हे अनुभवाचे बोल आहेत.सांगोवांगी हा प्रकार नाहीये.आता एक तास इकडेतिकडे वेळ काढायचा म्हणून तेथील मेनरोडवरून फेरफटका मारत मी आमचे येथील सध्याचे माहेरघर Mc Donald रेस्तोरंत शोधत होतो.येथे कोठेही बाहेर गेलो की Mc Donald चा लाल पिवळा' M' बघितला की हायसे वाटते.कारण येथे सेनिओर कॉफी (वयवर्षे 55 नंतर ) फक्त 50/60 centla मिळते.आणि" बाकीच उरकून" बाहेर पडता येते.आमच्या जिभेने बाराही महिने श्रावण महिना पाळल्याने येथे खाण्यापिण्याचे (म्हणजे माझे फक्त खाण्याचेच) थोडे फार हाल होतात.शिवाय अमेरिकेत चहापेक्षा कॉफीच जास्त टेंभा मिरवते.सर्वत्र कॉफी चेच वर्चस्व आहे.बरीस्ता प्रमाणे येथे स्टारबक कॉफी भाव खाऊनआहे.बाकी सर्वच अन्नछत्रामधून' कत्तलखाना ' शोकेसेसमध्ये मांडलेला असतो.त्यामुळेआमच्यासारख्या शंभर टक्के पूर्ण शाकाहारी माणसाचे येथे काही खरे नसते.सारांश येथे कॉफीपान आणि घरून आणलेली अमेरिकन भाकरी म्हणजे sandwich खाऊन मी जवळच्याच एका अमेरिकन दुकानातील शोकेसेस पाहण्यास गेलो.येथेही ग्राहकांसाठी विविध स्कीम्स,लॉटरी,बक्षिसे असले प्रकार आहेत.तासाभरात"ग्रेट अमेरिका ही बस no. 60 स्टोपवर पकडून मी सकाळी आलेल्या मार्गानीच परत येथे आलो.

ग्रेट अमेरिका येथे VTA लाईट रेलने Mountain view ह्या शेवटच्या स्टेशनकडे निघालो.बाहेर पडल्यावर इथला माझा दुसरा जानी दोस्त कॅमेरा बरोबर होताच.अधून मधून फोटो काढणे सुरु होतेच.YAHOO बिल्डिंग दिसल्यावर click केलेच.शेवटच्या स्टेशनला उतरल्यावर परतीची दुसरी गाडी जणू काही आमचीच वाट पाहत होती अशा अवस्थेत होती.काही वेळातच गाडीची दारे बंद झाली.समोरच स्वेटर,मफलर असलेला एकजण पान चघळत होता.अमेरिकेत "असा " माणूस प्रथमच पाहिला.मनात म्हटलं नक्कीच हा भारतीय "भैय्या "असणार.यथावकाश क्लू मिळाल्यावर मी त्यांना विचारले
"भैसाब कहा के हो?"नैनिताल उत्तरांचलसे आया हु"आपका शुभनाम?"माझ्या सर/उलट तपासणीला उत्तर मिळाले "उपरती " काही कळेना.गमंत म्हणजे मला त्यांना शुभनाम विचारण्याची 'उपरती' झाली आणि योगोयोगाने त्यांचे आडनावही "उपरती"च निघाले.हे ग्रहस्थ तेथील एका बँकेत होते आणि निवृत्ती नंतर अमेरिकेत असलेल्या आपल्या श्रावणबाळाकडे (आमच्याप्रमाणेच)आले होते.प्रवासात गप्पा मारत असतानाच आम्ही एकत्र फोटो काढले आणि सेंट जेम्स स्टेशनला उतरुन मी परत Old Ironside ह्या स्टेशनला आलो.लगेच तेथे सनीवेल मार्गे DANZA कॉलेज बस मिळाली आणि घराकडे प्रवास सुरु झाला.

ही बस Lawrence ex.way ने LAKEWOOD village मार्गे जाते.वाटेत LAKEWOOD
BIRD ह्या रस्त्यातून/मोठ्या गल्लीतून जातानाच बसमधूनच मला येथील तथाकथित ग्रामीण(?) भागाचे दर्शन झाले.रस्त्याच्या दुतर्फा अनेक छोटी छोटी टुमदार घरे/अमेरिकन पद्धतीचे बंगले दिसले.प्रत्येक बंगल्यापुढे लहान का होईना पण बाग होती.त्यात फुलझाडे,रंगीत दिवे,रेखीव कॉम्पौंड.पुतळे,पाण्याचे कारंजे,पोष्टपेटी इ.इ. दिसले.प्रत्येक घरापुढे चार चाकी गाडीची' खिलारी जोडी 'दिसत होती.तेथेच garage का गोठा असतो.पेट्स म्हणजे कुत्री अनेक घरांची राखण करतात.रस्त्यावर सुद्धा दोन्ही बाजूला चार चाकी गाड्यांची वेलबुट्टी/रांगोळी दिसते.सर्वच रस्त्यावर माणसे आणि मोकाट जनावरे सोडून सारे काही असते.त्यामुळे नेहमी "बंद " किंवा " कर्फ्यू"आहे असेच वातावरण असते. ह्याला कोणाचाच दोष नाही.येथील रूढी,परंपराच अशी आहे.

परत घरी पर्यंत संध्याकाळ झाल्याने समोरच्या तुफान रस्त्यावर मात्र अनेक गाड्यांचे पांढरे/पिवळे/लाल दिवे झळकत होते.जणू काही लिंबाची आणि डाळींबाची बागच.......

शुभप्रभात:
See More
PUNYASMARAN 8TH NOVEMBER 2013 Maze SBI madhil sahakari aani khas dosta Shri Sridhar Sahasrabudhhe (Shirubhau) yanna hya jagacha nirop gheun aaj ek varsha zale.Tyanchi aathavan mazyapramane anya mitrannhi sarakhi hot aasate.Mala tyani nehamich protsahan dile mhanuntar Punyat mi ACHARYA ATRE SAHITYA DARSHAN aayojit karu shakalo.Aata tar tyanchi univ sarakhich janavate.Aasa dildar,aanandi,dusryache kautuk Karun tyala protsahit karnara manus milnar nahi.Tyanna mazi vinamra / sashrupurna sradhhanjali

शिरुभाऊ का हो इतकी घाई केलीत?
(कै.श्रीधर व्ही.सहस्रबुद्धे -अनावृत्त पत्र)

माझे बँकेतील एक सहकारी,आमच्या'संवाद' ह्या मासिक पत्रकाचे एक संपादक,माझे जिवलग स्नेही आणि माझे पुण्यातील साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील "जामीनदार"श्री.श्रीधर सहस्रबुद्धे हे दिनांक ८ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन पावले ह्या दुनियेचा इतक्या लवकर निरोप घेतील असे कोणालाच वाटत नव्हते.पण हे घडले खरे.अत्यंत दु...:खाची बाब म्हणजे गेले त्या दिवशी दुपारीच बँकेला त्यांनी लाईफ सरटीफीकेट दिले होते.आणि त्याच रात्री इतरांना त्यांचे डेथ सरटिफीकेट घ्यावे लागले........माझ्या त्यांच्या विषयीच्या भावना ते वाचू न शकणा-या पत्रातून व्यक्त करत स्मृतींच्या फुलांची ही ओंजळ त्यांच्या चरणी अर्पण करीत आहे.
******,*****************************************************
प्रिय शिरुभाऊ,

नमस्कार

मला न भेटता इतक्या लवकर जाण्याची का हो एवढी घाई केलीत? तुम्हाला भेटायला मी तुमच्या घरी आणि हॉस्पिटल मध्येही आलो होतो त्यावेळी तुम्ही आम्हाला पत्ताही लागू दिला नाही इतक्या घाईने तुम्ही बाय बाय करणार आहात म्हणून.काय हे?अहो नोव्हेबरला मी पु.ल.देशपांडेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात असतानाच मला SMS आला "SVS is no more"म्हणून.लगेच मी कार्यक्रम सोडून तसाच हॉस्पिटलमध्ये धावलो. शिरुभाऊ थोडावेळ आधीच तुम्ही "उंच माझा झोका "ही मालिका पाहत होता म्हणून मला कळले.पण'' हा' झोका मात्र तुम्ही इतका उंच घेतला कि तो पुन्हा खाली आलाच नाही.माझ्या डोळ्यासमोर १९९१/९२ सालापासूनच्या आठवणींची रिळे भराभर उलगडत होती.तशी तुमची माझी फार जुनी ओळख नव्हतीच.पण" साहित्यप्रेम " हे गोत्र आपले असल्याने आपले जमले इतकेच. त्या पूर्वी तुम्ही गोरे असूनही तुम्ही काळे की गोरे हेही मला माहित नव्हते.पिंपरी ब्रान्चला आपली कर्मभूमी होती.त्याच वेळी "दोन ओंडक्यांची" झाली भेट.
१९९३ साली झालेल्या सातारच्या मराठी साहित्य संमेलनातील अत्रे प्रदर्शनांचे फोटो पाहूनच आपल्या मैत्रीची नाळ जुळली. बरोबर आहे ना? आणि तेंव्हा पासून अत्र्यांची आठवण राहावी म्हणून त्यांच्याप्रमाणेच तुम्ही मला "बाबुराव "म्हणू लागलात.पुण्यासारख्या साहित्य - संस्कृतीच्या राजधानीत केवळ तुमच्या सारखा मित्र किंवा जामीनदार मिळाला म्हणून मी काहीतरी साहित्य क्षेत्रात चळवळ नाही पण वळवळ करू शकलो.बालगंधर्व कलादालनातील माझे अत्रे साहित्य दर्शन हे पुण्यातील पहिले प्रदर्शन तुमच्या प्रोत्साहनामुळेच झाले.प्रमुख पाहुणे म्हणून शरद तळवलकर ह्यांना तुम्हीच आणले होते.ह्यानंतर तुम्ही माझ्यावर सदैव कौतुकाचा प्रोत्साहनाचा वर्षाव करीत होता.तुमच्या साहित्य निष्टा,साहित्याचा सखोल अभ्यास ह्याला तोडच नव्हती.त्यामुळे आपल्या बँकेचा एक ग्राहक आपला उल्लेख नेहमी "अत्रे फडके" असा करायचा.
अनेक मान्यवर साहित्यिकांची व असामींची ओळख तुम्ही मला करून दिलीत.प्राचार्य राम शेवाळकर,शरद तळवलकर,डॉक्टर रा. चि. ढेरे . जयंतराव टिळक,अनेक पुस्तक प्रकाशक इ.इ.

आज मी अमेरिकेत असून रोज काहीतरी लिहित असतो तेंव्हा तुमची प्रकर्षाने आठवण येते.तुमचा नेहमी मला आग्रह असे "बाबुराव आता लिहायला सुरवात करा,अत्र्यावर भाषण करायला लागा " पण तुमच्या हयातीत हा योग आला नाही तरी आता आला आहे.विविध विषयावर मी थोडेबहुत आपल्या कुवतीप्रमाणे लिहित आहे.अनेकांनी त्याची प्रशंसाही केली आहे.पण तुमची सर कोणाला येणार नाही तुमचे कौतुक प्रोत्साहन काही वेगळेच असायचे.तुमचा आनंदी स्वभाव, दुर्दम्य उत्साह, पत्र लेखन ,खवय्येगिरी, गप्पा चेष्टा- मस्करी हे सगळं वेगळेच रसायन होते. "बादशाहीत "आपल्या किती बैठका गप्पाष्टके झाली ह्याला सीमाच नाही.तेथेसुद्धा डिश मध्ये तिखटमीठ कमीजास्त झाले की वेटर मार्फत तुम्ही आचा-याला निरोप द्यायचा.पिंपरी ब्रान्चला दुपारी भोजनाच्या वेळी आपण एकमेकांना"काकबळी आणि गोग्रास" देत असायचो. तो अर्धा तास म्हणजे काव्य शास्त्र विनोदाची मैफलच असायची. तुमचे हस्तक्षरहि तुमच्या लिखाणाइतकेच सुंदर होते.त्यामुळे पोस्टकार्ड लिहिण्याचे तुमचे व्यसन निवडक मित्रांना माहित होते.तुमच्या आग्रहामुळेच मी माझी डायरी तुम्हाला दाखवून मी "अत्रे भेट पहिली आणि शेवटचीच "हा लेख लिहिला..मी मुंबईला असताना अधूनमधून तुम्ही माझ्याघरी राहायला यायचा तेंव्हा तो एक आनंदसोहोलाच असे.नाही का?"संवाद "मध्ये तुम्ही माझ्या अत्रे भक्तीप्रेमावर कितीवेळा लिहिलेत.दुसर्याचे मनापासून कौतुक करून त्याला प्रोत्साहन देणारा तुमच्यासारखा माणूस विरळाच.शिरुभाऊ कितीही लिहिले तरी कमीच आहे. माझा वाढदिवस ३० एप्रिल असल्याने तुम्ही एप्रिल फुल न म्हणता फुल एप्रिल म्हणायाचत. लंडनहून मी चिरूट ओढणा-या चुर्चीलची एक किचेन तुमच्यासाठी आणली होती ती सर्वांना मोठ्या उत्साहात तुम्ही दाखवत फिरायाचा.सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आनंद होत असे.आज माझे मन हलके झाले.मला माहित आहे हे पत्र तुम्ही वाचणार नाहीये पण एका वेगळ्याच समाधानात आनंदात भविष्यकाळ मी घालवणार आहे.
कळावे. तुमचा

बाबुराव

शुभप्रभात:
See More